रोखठोक : या आणीबाणीचे करायचे काय? इंदिराद्वेषाचे जहर!

556

rokhthok४३ वर्षांनंतरही आणीबाणीच्या नावाने ‘भाजप’ परिवार शंख फुंकतो तेव्हा आश्चर्य वाटते. इंदिरा गांधींचे सर्व कर्तृत्व विसरून आणीबाणीवर बोलायचे म्हणजे सरकारकडे बोलण्यासारखे दुसरे काही उरलेले नाही. आणीबाणी हा काळा दिवस म्हणून साजरा करणारे १९७१ चा पाकिस्तानचा पराभव हा इंदिराजींच्या नावानं विजय दिन म्हणून साजरा करतील काय?

२६ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली. त्यास ४३ वर्षे झाली. मोदी सरकारने हा दिवस देशभरात ‘काळा दिवस’ म्हणून आता साजरा केला. स्वतः नरेंद्र मोदी हे २६ जून रोजी मुंबईत आले व आणीबाणीवरील एका चर्चेत सहभागी झाले. त्यांच्या टीकेचा रोख इंदिरा गांधींवर होता. याच दरम्यान अरुण जेटली यांनी इंदिरा गांधी यांची तुलना हिटलरशी केली आहे. इंदिरा गांधी या जणू कोणी भयंकर क्रूरकर्मा होत्या अशा तऱ्हेचे भाष्य भाजप मंडळींनी या निमित्ताने केले. आणीबाणीत जे जन्मास आले नव्हते किंवा त्या वेळी जे गोधडीत रांगत होते तेच लोक इंदिरा गांधी व आणीबाणीवर बोलत आहेत. मी स्वतः आणीबाणीचा विरोधक किंवा समर्थक नाही. ‘देशाला शिस्त लागणार असेल तर आणीबाणीची गरज आहे,’ असे श्री. बाळासाहेब ठाकरे तेव्हा म्हणाले होते. त्यांच्याप्रमाणे अनेकांचे तेच मत होते. शिवसेनाप्रमुखांनी आणीबाणीस समर्थन दिले होते तरीही ‘मार्मिक’च्या छापखान्यास सरकारने टाळे लावले होते. हासुद्धा त्यागच म्हणावा लागेल, पण दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्याचे ‘सेनानी’ म्हणून बाळासाहेबांनी ‘ताम्रपट’ किंवा पेन्शन मागितले नाही व त्याचे भांडवल केले नाही.

असे अनेक काळे दिवस
इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली तो दिवस काळा दिवस मानला तर देशात गेल्या चारेक वर्षांतील अनेक दिवस काळे दिवस म्हणून साजरे करावे लागतील. ‘नोटाबंदी’ जाहीर केली तो दिवसही काळा दिवस आहे. या निर्णयाने देशात आर्थिक अराजक निर्माण केले. गरीबांचा रोजगार गेला. लहान व्यापारी साफ मेला. श्रीमंतांचा काळा पैसा पांढरा झाला. ‘नोटबंदी’ जाहीर करताना पंतप्रधानांनी दोन गोष्टी सांगितल्या. सगळा काळा पैसा लगेच बाहेर येईल. भ्रष्टाचारास लगाम बसेल. यापैकी काहीच झाले नाही. उलट बँकांच्या रांगेत उभे राहिलेल्या शंभरावर लोकांना जीव गमवावा लागला. दुसरे असे सांगितले की, कश्मीरातील दहशतवाद नोटबंदीमुळे खतम होईल. मात्र या बाबतीत नेमके उलटे घडले. कश्मीरात दहशतवाद जास्तच वाढला. श्री. अमित शहा संचालक असलेल्या बँकेत पाच दिवसांत ५७५ कोटी रुपये (जुन्या नोटा) जमा झाले. असे सर्वत्र घडले. आजही निपचित पडलेली अर्थव्यवस्था उभी राहू शकलेली नाही. आणीबाणीप्रमाणे हासुद्धा काळा दिवसच आहे. आणीबाणीत न्यायव्यवस्थेचे व वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले असे सांगतात. मग आज वेगळे काय चालले आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी सरळ बंड केले. उत्तराखंडच्या हायकोर्ट न्यायाधीशांनी स्वतंत्र बाण्याने निकाल देऊन राज्यपाल शासन हटवले म्हणून न्या. जोसेफ यांना सर्वोच्च न्यायालयात येण्यापासून रोखले गेले, हे जर सत्य असेल तर ही एकप्रकारे मनमानी व अघोषित आणीबाणीच आहे.

आडवाणी कोठे आहेत?
लालकृष्ण आडवाणी यांच्यासह अनेक मोठे नेते आणीबाणीत तुरुंगात होते, पण आज आडवाणी यांचा आवाज संपूर्ण बंद आहे. वाजपेयी कोमात, आडवाणींच्या तोंडावर बंदी. इतरही अनेकजण अचानक मूक व बधिर झाले ते काय त्यांच्या मर्जीने? २६ जूनला तरी श्री. आडवाणी यांनी बोलायला हवे होते, पण जे तेव्हा आईच्या गर्भातही नव्हते ते आणि जे फक्त ‘आणीबाणी’त तुरुंगात गेले ते बोलत आहेत. ज्यांनी इंदिरा गांधींची राजवट सशस्त्र मार्गाने उलथवून टाकण्याचा ‘कट’ रचला व त्यासाठी ‘डायनामाईट’ बॉम्बचे स्फोट केले ते जॉर्ज आज विस्मृतींनी ग्रासले व कोमात आहेत. जॉर्ज फक्त तुरुंगवारी करीत नव्हते, तर भूमिगत राहून क्रांतिकारी कट रचीत होते. त्यांना व त्यांच्या भावांना अटक झाली व पोलिसांच्या भयंकर यातनांना सामोरे जावे लागले. इंदिरा गांधींची राजवट ही हुकूमशाही होती असे बोलण्याचा अधिकार फक्त आणीबाणीत जॉर्जप्रमाणे यातना भोगणाऱ्यांना आहे. बाकी सारे सामुदायिक कारवाईत पकडले गेले व सुटले. अयोध्येतील राममंदिराचे भांडवल झाले. ते पुन्हा उभे करता आले नाही. आणीबाणीचा चोथा झाला तरी तो ‘काळा’ दिवस ठरत आहे. मला याचे आश्चर्य वाटते.

सगळे तुरुंगात
आणीबाणीत काय झाले? स्मगलर, काळाबाजारवाले, भ्रष्टाचारी, दरोडेखोर, झोपडीदादा यांना इंदिरा गांधी यांनी ‘मिसा’खाली अटक केली. सरकारी कर्मचारी शिस्तीत कामावर जाऊ लागले. सामान्य जनता याचे स्वागत करीत होती. उत्तर प्रदेशात आणीबाणीच्या नावाखाली ‘नसबंदी’ कार्यक्रमाचा अतिरेक झाला, पण मुसलमानांचे सक्तीचे कुटुंब नियोजन करावे हा तर ‘संघ’ परिवाराचा कार्यक्रम आहेच. हाजी मस्तान, करीम लाला, युसूफ पटेल, वरदा राजन तुरुंगात गेले. आज नीरव मोदी, चोक्सी, विजय मल्ल्यासारखे अनेक जण सरकारच्या डोळ्यांसमोरून देश लुटून पळून गेले. इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. जनतेच्या पैशाला सुरक्षा कवच दिले. आज रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला ‘पोपट’ बनवून लोकांवर नोटाबंदी लादली गेली. वृत्तवाहिन्यांचे मालक व संपादकांनी गुडघ्यावर रांगत बोलावे असे आज अनेकांना वाटते. त्यामुळे आणीबाणी म्हणजे नक्की काय हे समजून घेतले पाहिजे.

हे का झाले?
श्री. मोदी यांना वाटते देशात त्यांच्या विरोधात कटकारस्थान सुरू आहे. इंदिरा गांधी यांनाही तसे वाटत होते. १९७१ च्या बांगलादेश युद्धानंतर देश आर्थिक संकटात सापडला होता. देशात भयंकर दुष्काळ पडला होता. देश संकटात असताना मतभेद विसरून विरोधकांनी सहकार्य करावे, अशी पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांची अपेक्षा चुकीची नव्हती; पण ‘संकटा’चा गैरफायदा घेत इंदिरा गांधींची कोंडी करण्याचे धोरण विरोधकांनी स्वीकारले. जयप्रकाश नारायण यांची भाषा चिथावणीची होती. ‘लष्कराने व पोलिसांनी सरकारचे आदेश पाळू नयेत,’ असे आवाहन त्यांनी केले. जॉर्ज फर्नांडिस संपाचे हत्यार वापरून रेल्वे बंद करीत होते. रेल्वेमंत्री ललित नारायण मिश्र यांना बॉम्बहल्ल्यात ठार मारण्यात आले. काँगेसच्या अनेक आमदार, खासदार व मंत्र्यांवर हिंसक हल्ले झाले. मुख्य न्यायाधीशांवरही हल्ला झाला. नक्षलवाद्यांना हाताशी धरून देशात हिंसाचाराचा वणवा पेटवू असे ठरत होते. देशातील लोकशाही स्वातंत्र्य, संविधान असे सर्व काही ‘खतम’ होईल व देशाचे अस्तित्व संपेल या धसक्याने इंदिरा गांधी यांनी घटनेच्या चौकटीत आणीबाणी जाहीर केली. त्याच घटनेच्या चौकटीत आणीबाणी उठवून त्या पुन्हा निवडणुकांना सामोऱ्या गेल्या. त्या लोकशाहीवादी होत्या म्हणून निवडणुका घेतल्या. त्या पराभूत झाल्या, पण लोकांनी त्यांना पुन्हा विजयी केले. त्या पराभूत झाल्या हा विजय दिवस, पण पुन्हा विजयी झाल्या हा जनतेने पाळलेला ‘काळा दिवस’ असे म्हणायचे काय?

भय कसले?
आज हिंदुस्थानची एक बंदीशाळा झाली आहे व प्रत्येकाच्या मनावर दडपण आणि भीती आहे. वातावरणातील खुलेपणा संपला आहे व कुणालाही देशद्रोही ठरवून तुरुंगात डांबले जाईल असे भय आजही अनेकांना वाटते. सत्तेचा इतका गैरवापर इंदिराजींच्या आणीबाणीतदेखील झाला नव्हता. निवडणुकीत भ्रष्ट मार्गाचा अवलंब केला म्हणून इंदिरा गांधींची निवडणूक रद्द करण्याचे स्वातंत्र्य तेव्हा सर्वोच्च न्यायालयास होते. आज फक्त ‘भ्रष्ट’ मार्गानेच निवडणुका जिंकल्या जात आहेत व पैसा हे साधन झाले आहे. आणीबाणीत ‘गुंड’ तुरुंगात गेले. आज ते सरळ राजकारणात आहेत. गुंड विरोधी पक्षाचा असेल तर तो ‘वाल्या.’ तो भाजपात आला की ‘वाल्मीकी’ असे नवे तत्त्वज्ञान मांडले गेले. ते मांडणाऱ्यांनी आणीबाणी लादली तो दिवस ‘काळा दिवस’ म्हणून साजरा केला. हा विनोद आहे.

रामनाथ गोएंका
लोकशाही मार्गाने निवडून यायचे व हुकूमशहासारखे वागायचे. जे विरोधक नको आहेत त्यांना सरळ नष्ट करायचे. ही प्रवृत्ती देशाला घातक असते. कश्मीरात काय चालले आहे याचा गुप्तचर संस्थांना पत्ता नसतो, पण सरकारच्या विरोधकांचे काय चालले आहे त्याची सर्व माहिती गोळा केली जाते. सीबीआय, आयकर विभाग, अंमलबजावणी संचालनालय आणि पोलीस दलाचा वापर जेव्हा राजकीय विरोधकांना संपविण्यासाठी केला जातो तेव्हा ‘लोकशाही’ मरण पावते असे समजायला हरकत नाही. आणीबाणीच्या घोषणेशिवाय हे घडू लागते तेव्हा हुकूमशाहीच्या जबड्यात आपण ढकललो जात आहोत याची पक्की खूणगाठ बांधावी. गेल्या तीन वर्षांत अनेकजण मला भेटले. सध्याचे सत्ताधीश प्रबळ आहेत. सगळेच जण जुळवून घेत आहेत. तुम्ही संकट कशाला अंगावर ओढवून घेता? असे मला ज्यांनी सांगितले त्यांना मी विचारले, ‘‘ते फार तर काय करू शकतील? एखादे खोटे प्रकरण तयार करून तुरंगात पाठवतील, नाही तर गोळ्या मारतील. म्हणून लिहिण्याचे आणि बोलण्याचे स्वातंत्र्य आपण भिरकावून द्यायचे काय? श्री. मोदी व त्यांचा पक्ष आणीबाणीतील स्वातंत्र्याच्या गळचेपीविरोधात बोलत असतात. त्यामुळे मागच्या दाराने आणीबाणी लादण्याचा प्रयत्न ते करतील काय? हा त्यावर माझा सवाल. सत्ताधारी पक्षाच्या दोन प्रमुख नेत्यांचे भय दाखवून त्यांच्याविरुद्ध बोलू नका, लिहू नका असे सांगणारे आणीबाणीचे समर्थक असतात. त्यांना न जुमानता अभिव्यक्ती स्वातंत्र्य टिकवायचे असते. इंदिरा गांधींच्या आणीबाणीचा पराभव जनतेने केला. आणीबाणी बरी की वाईट याचा निर्णय जनतेने घेतला आहे, एकदा इंदिराजींचा पराभव करून व दुसऱ्यांदा त्यांना विजयी करून. हे लक्षात घेतले पाहिजे. आणीबाणीत संप, आंदोलने, हिंसक निदर्शने यावर बंदी आली. वृत्तपत्रांना गुडघ्यावर उभे केले. प्रसारमाध्यमांवर सरकारचे नियंत्रण होते. विद्याचरण शुक्ल यांच्या नेतृत्वाखालील चांडाळचौकडीने अतिरेक केला. संजय गांधींची प्रसारमाध्यमांत दहशत होती व सर्वत्र फक्त ‘जी हुजुरी’च सुरू होती. (ती आज सुरू नाही असे कुणाला वाटते काय?) आणीबाणीत काही लोकांनी अतिरेक केला. त्याची माफी इंदिरा गांधी यांनी मागितली. त्यांना पश्चात्ताप झाला. लोकांनी त्यांना माफ केले व पुनः पुन्हा सत्तेवर आणले. म्हणून लोकांना गुन्हेगार ठरवायचे काय? काँग्रेस पक्षाला २०१४ साली ५० जागांचा पल्ला गाठता आला नाही. काँग्रेस पक्षाचा सांगाडा उरला. त्या सांगाड्याची भीती श्री. मोदी व त्यांच्या पक्षाला वाटत आहे व पुनः पुन्हा इंदिरा व राहुलला ते लक्ष्य करीत आहेत. हे भीतीचे तसेच कमकुवत मनाचे लक्षण आहे. सत्ताधाऱ्यांनी विकासावर बोलायला हवे. पण १९७५ साली पुकारलेल्या आणीबाणीवर बोलले जात आहे. ‘माध्यमांना थोडे झुकायला सांगितले तर ते रांगायलाच लागले!’ हे १९७५ सालच्या घोषित आणीबाणीवर आडवाणींनी केलेले भाष्य महत्त्वाचे आहे. जोपर्यंत कातडी वाचवणारी व्यापारी जमात आहे तोपर्यंत हे सुरूच राहील. त्या कठीण काळातही रामनाथ गोएंकासारखे माध्यमसम्राट इंदिरा गांधींसमोर ताठपणे उभे होते. आज पुनः पुन्हा त्याच रामनाथ गोएंकांची मला आठवण येत आहे.

जॉर्ज फर्नांडिस
४३ वर्षांनंतरही देशाचे पंतप्रधान व त्यांचे सहकारी आणीबाणीचे श्राद्ध घालण्याचा जाहीर कार्यक्रम करतात. श्री. मोदी यांना आज सर्वाधिक धोका आहे व त्यामुळे त्यांच्याजवळ मंत्रीही येऊ शकणार नाहीत अशी सुरक्षा व्यवस्था केली; पण शीख अतिरेक्यांपासून धोका आहे असे ‘गुप्तचर’ आणि सुरक्षा यंत्रणांनी बजावूनसुद्धा इंदिरा गांधी यांनी स्वतःचे शीख सुरक्षा रक्षक बदलले नाहीत व त्यांनीच इंदिराजींना मारले. श्री. मोदी यांच्यापेक्षा जास्त धोका इंदिरा गांधींना होता. देशात अस्थिरता व अंदाधुंदी माजवण्यासाठी परकीय शक्तींनी विरोधकांना हाताशी धरले होते व इंदिरा गांधी यांना बॉम्बस्फोटात मारायचेच हे तेव्हा नक्की झाले होते. या कटातील सर्वात भयंकर ‘प्रकार’ बडोदा डायनामाईट केस म्हणून ओळखला जातो. बडोद्यातील टीम्ब रोड येथील खाणीत डायनामाईट स्फोटाची प्रात्यक्षिके जॉर्ज फर्नांडिस यांच्या उपस्थितीत पार पडली. (मी जॉर्ज यांच्या हिमतीला दाद देतो.) जॉर्ज यांनी आपल्या खास साथीदारांना प्रशिक्षित केले. मुंबई, नाशिक सब जेल, दिल्ली, बिहार, गुजरात, कर्नाटकमधील रेल्वे स्टेशन, रेल्वे पूल, रेल्वे रूळ, मुंबईची एअर इंडिया बिल्डिंग, इंदिराजींचे समर्थन करणाऱ्या ‘ब्लिट्स’ साप्ताहिकासह ५०-७५ ठिकाणी डायनामाईटचे स्फोट करण्यास सांगितले होते. नक्षलवाद्यांना त्यासाठी हाताशी धरण्यात आले होते. देश व देशातील लोकशाही अशाप्रकारे खतम करण्याची संपूर्ण तयारी झालीच होती. हे सर्व बळाचा वापर करून थांबवले नसते तर पाकिस्तानप्रमाणे हा देश सतत अराजकाच्या खाईत ढकलला गेला असता. आणीबाणीत अतिरेक झाला हे खरे, पण म्हणून इंदिरा गांधी या क्रूरकर्मा आहेत हा प्रचार खोटा आहे. इंदिरा गांधी कुटुंबवत्सल होत्या. हळव्या होत्या. इंदिरा गांधी यांनी ४३ वर्षांपूर्वी लादलेली आणीबाणी हा आजही ‘काळा दिवस’ म्हणून पाळला जात असेल तर इंदिरा गांधी यांनी १९७१ साली पाकिस्तानचा केलेला दारुण पराभव हा ‘दिग्विजय दिवस’ म्हणून साजरा करावा लागेल.

इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. पाकिस्तानला कमजोर केले. १६ डिसेंबर १९७१ रोजी त्यांनी पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले. पाक लष्कराला शरणागती पत्करायला लावली. असा विजय आतापर्यंत एकाही पंतप्रधानाने मिळवला नाही. बोला, १९७१चा पाकिस्तानचा पराभव हा ‘विजय दिन’ म्हणून साजरा करायचा काय?

इंदिरा गांधींइतके कर्तृत्व या देशात कोणीच गाजवले नाही. एका आणीबाणीच्या निर्णयाने त्यांचे सारे कर्तृत्व झाकोळून जाणार नाही. पंडित नेहरू, महात्मा गांधी, सरदार पटेल, राजेंद्र प्रसाद, डॉ. आंबेडकर, नेताजी बोस, वीर सावरकर यांचे स्वातंत्र्यलढ्यातील व देश घडविण्याच्या प्रक्रियेतील योगदान नाकारणे म्हणजे देशाशी गद्दारी करण्यासारखं आहे. आणीबाणीपेक्षा भयंकर कृत्ये गेल्या २५ वर्षांत देशात झाली. त्यामुळे जो अंधःकार पसरला त्यातून प्रकाशकिरणे शोधण्याचा प्रयत्न आजही सुरूच आहे. पाकिस्तानी अतिरेक्यांना कश्मीरातून नष्ट करण्याचा आमचा वायदा होता. उलट रमझानच्या महिन्यात आपण लष्करास शस्त्रसंधीचे आदेश दिले व आपल्याच जवानांचे बळी घेतले. राजकारणात त्या-त्या परिस्थितीस योग्य असणारे निर्णय घ्यायचे असतात. इंदिरा ते मोदी यांनी ते घेतले. सगळेच बरोबर व सगळेच चूक हे ठरवायचे कोणी?

आणीबाणीला विसरायला हवे.

Twitter – @rautsanjay61
Email – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या