रोखठोक – मोडकळीस आलेले बेट

3924
mumbai rains Western Railway helpdesk

rokhthokमुंबईची स्थिती बिघडत आहे. एका पावसाच्या तडाख्यात हे शहर मोडून पडते. मुंबईची भौगोलिक स्थिती ज्यांना माहीत आहे त्यांना शहर तुंबण्याचे आश्चर्य वाटणार नाही. दोनशे वर्षांपूर्वी मुंबई मोडकळीस आलेले बेटच होते. आज सोन्याने मढवलेल्या मुंबईची स्थितीही बदललेली नाही.

गेल्या काही वर्षांपासून मुंबईचे गणित बिघडलेले आहे. एका दिवसाच्या मुसळधार पावसात मुंबईची कशी दैना होते, मुंबई ठप्प होते ते महिनाभरात चार वेळा अनुभवले. ज्यांचे मुंबईच्या जडणघडणीत काहीच योगदान नाही असे सर्व लोक मुंबई महापालिका, सरकार, राजकारण्यांच्या नावाने ठणाणा करू लागले. एक महिन्याचा पाऊस चार तासांत पडतो. त्या चार तासांत मुंबईचे रस्ते, रेल्वे, बैठी घरे, विमानतळ पाण्याखाली जाते. मुंबईत पावसाचा उपसा होतोय, पण निचरा होत नाही. कारण मुंबईचे अनेक रस्ते मेट्रोवाल्यांनी खणून, अडवून ठेवले. पाणी जागच्या जागी थांबले. लोकांना सुविधा हव्यात, पण त्या निर्माण करताना होणाऱ्या यातना नकोत. मातृत्व हवे, पण बाळंतपणाच्या कळा नकोत. मुंबईच्या भौगोलिक रचनेचा इतिहास ज्यांना माहीत आहे त्यांनाही आश्चर्य वाटेल. मुंबईवर इतकी आक्रमणे आणि अतिक्रमणे होऊनही हे शहर आपले वैभव राखून आहे. ते मुंबईसाठी झटणाऱ्या सामान्य लोकांमुळेच.

अशी ही मुंबई

गोविंद नारायण माडगावकर यांनी जुन्या मुंबईचे जे संशोधन करून ठेवले ते जगावेगळे आहे. सात बेटांची बनलेली मुंबई समुद्राने वेढली आहे व ही भौगोलिक रचना बदलणे कोणालाही शक्य नाही. या बेटांवर समुद्राची पर्वा न करता जी अफाट बांधकामे झाली व त्या भव्य इमारतीमध्ये जे लोक राहत आहेत त्यांचे मुंबईच्या विकासात योगदान नाही. पण तेच लोक मुंबईचे मालक झाल्यासारखे बोलतात आणि वागतात. समुद्राची भरणी करून ज्यांनी तेथे इमारती बांधल्या तेथे राहणाऱ्यांना मुंबईवर बोलण्याचा अधिकार नाही. मुंबई तुंबते हे त्याच लोकांचे पाप आहे. मुंबई शे-दोनशे वर्षांपूर्वीही तुंबत होती, पण चित्र आजच्यासारखे नव्हते. माडगावकर सांगतात, ‘‘म्हातारपाखाडी, उमरखाडी, माझगाव, माहीम ही बेटे असून त्यांच्यामधून खाऱ्या पाण्याच्या खाडय़ा होत्या. जिला आम्ही पायधुणी म्हणत असतो तेथून ही सलग खाऱ्या पाण्याची खाडी होती आणि भरती आली म्हणजे भेंडीबाजारापासून चिंचबंदरपर्यंत पाणी भरून जाई. या जागेस पायधुणी असे नाव पडण्याचे कारण काय? तर पूर्वी माहीम, वरळी व माटुंगा येथून जे लोक येत असत ते या खाडीत पाय धुऊन मुंबईस येत असत म्हणून तिला ‘पायधुणी’ असे नाव पडले. त्या काळात समुद्राचे पाणी शहरभर पसरले होते ते वरळीचा बांध बांधून बंद केले गेले. इतकेच नाही तर मूळच्या खाडय़ा होत्या त्यात नळ बांधून शहरातील पावसाचे, मोऱ्यांचे व न्हाण्यांचे सगळे पाणी त्या नळात सोडून ते वरळीच्या खाडीस मिळविले आहे. हा नळ सुमारे पुरुष दीड-पुरुष उंच असून चार हात रुंद आहे. हा थेट मार्केटच्या मागून डोंगरीच्या खालून काढला आहे तो भेंडीबाजाराच्या मागच्या बाजूने रस्त्याच्या मधून सलग वरळीच्या खाडीस नेऊन मिळविला आहे.’’ गोविंद माडगावकरांनी हे वर्णन 1863 साली केले. हे लक्षात घेतले तर मुंबईची भौगोलिक स्थिती लक्षात येते.

कुलाबा आणि पायधुणी

पाणी तुंबते ते खाडय़ा, नाले व समुद्र बुजवून त्यावर इमारती बांधल्यामुळे. कुलाबा ही आज धनिकांची वस्ती आहे. कफ परेड हा कुलाब्याचा भाग. तो तर समुद्र बुजवून आत घेतला. त्यामुळे भरती येताच समुद्र तडाखा देतो. कुलाबा हे एक मुंबईच्या दक्षिणेच्या शेवटास लहानसे ओसाड बेट असून ढोरे चरण्याचे ठिकाण होते. तेथे फक्त कोळी लोकांची वस्ती होती. ते लोक भाजीपाला पिकवीत व मासळी विकून निर्वाह चालवीत. तेथे जाण्यास लहानशी तर लागत असे. ही खाडी कंपनी सरकारने सन 1838 मध्ये पूल बांधून व भर घालून मुंबईस जोडली. पण आज हाच जोडलेला भाग म्हणजे मुख्य मुंबई झाली. मुंबईचीच नव्हे, देशाची बहुतेक संपत्ती याच भागात राहणाऱ्या लोकांकडे आहे. मुंबई तुंबते तेव्हा या मंडळींचे काहीच वाकडे होत नाही, पण मुंबई तुंबण्यात आपला हातभार आहे याचीही त्यांना खंत वाटत नाही.

धोरणे कोणासाठी?

मुसळधार पावसात मुंबईत जलप्रलय होतो तेव्हा मध्येच अडकत असलेला नोकरदार वर्ग रेल्वेच्या फलाटावर, बस स्टॉपवर, एखाद्या आडोशाला उभा राहून दोन दोन दिवस काढतो. घराशी, कुटुंबाशी त्याचा संपर्क तुटतो. पावसाचा अंदाज येताच सरकारतर्फे आवाहन केले जाते की, गरज असेल तरच घराबाहेर पडा, पण मुंबईची निम्मी लोकसंख्या कष्टकरी, मजूर वर्गात मोडते. घराबाहेर पडणे ही त्यांची मजबुरी आहे. घराबाहेर पडले नाहीत तर त्यांची चूल पेटणार नाही. मात्र या वर्गासाठी धोरणे निर्माण होत नाहीत तर समुद्र व खाडय़ा बुजवून त्यावर घरे बांधणाऱ्यांसाठी धोरणे आखली जातात. सामान्य माणसांचा मोठा वर्ग राममंदिर व 370 कलम हटवले यावरच खूश असतो. उद्या जमिनीखालून ‘मेट्रो’ धावेल तेव्हा त्या मेट्रोचे तिकीट त्याला परवडणार नाही. तो भरपावसात ‘लोकल’ पकडायला धावेल. मुंबईच्या फुटपाथवरील फेरीवाल्यांना सहज हाकलले जाते, पण ज्यांनी मिठी नदी गिळली व समुद्राची भरणी करून मुंबई तुंबवली त्यांच्यावर कायद्याचा बडगा कमी पडतो. मेट्रोसाठी गिरगावातील मराठी चाळकऱ्यांना सहज दूर केले गेले. पण मुंबईच्या सोयीसाठी निर्माण होणारा ‘कोस्टल’ रोड पर्यावरण आणि कायद्याच्या जोखडात अडकला. मुंबईतल्या कष्टकऱ्यांचा आवाज रोज क्षीण होत आहे. तुंबणाऱ्या मुंबईस आपली मानणारा हा वर्ग आहे. मुंबई गेल्या पन्नास वर्षांत सोन्याने मढवली, अलंकारांनी सजवली तरीही ती एका पावसात मोडून पडते. सन 1700 मध्ये जेव्हा गव्हर्नर सर निकोलास वेट या मुंबई बेटावर अधिकार ग्रहण करण्यासाठी प्रथम उतरला तेव्हा मुंबईची स्थिती पाहून सुरतच्या अंमलदारास त्याने लिहिले होते, ‘हे अतिदरिद्री मोडकळीस आलेले असे एक बेट आहे.’

आजही मला ही सुवर्णभूमी मोडकळीस आलेले बेटच वाटत आहे. एका पावसाच्या तडाख्यात ते मोडून पडते. चांद्रयान आपण उडवले. बुडणाऱ्या मुंबईस कोणी वाचवेल काय?

Twitter – @rautsanjay61
Email – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या