रोखठोक : येथे युद्ध तुंबळ आहे!

108

rokhthok‘युक्रेन’च्या सार्वत्रिक निवडणुकीत तेथील लोकांनी राष्ट्रपती पेत्रो यांचा दारुण पराभव केला व कॉमेडियन जेलेंस्की याला निवडून दिले. हिंदुस्थानात काय होईल हा प्रश्न राहिलेला नाही. निवडून येणार मोदीच! पण युद्ध तुंबळ आहे. पवारांना बारामती सोपी राहिलेली नाही व नितीन गडकरी नागपूरच्या चक्रव्यूहात अडकले.

दुसऱया टप्प्यातील निवडणुकांसाठी राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. 11 एप्रिलला देशातील 91 आणि महाराष्ट्रातील सात जागांवर मतदान झाले. 18 तारखेस आणखी 10 जागांवर मतदान झाले. 11 तारखेस मतदान झालेल्या सर्वच जागा विदर्भातील होत्या. 18 एप्रिल रोजी दुसऱया टप्प्यासाठी विदर्भातील उर्वरित तीन मतदारसंघांत मतदान झाले. इथे एक गोष्ट गांभीर्याने लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे विदर्भातील दहाही जागांवर भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीला काँग्रेस-राष्ट्रवादीशी कडवट झुंज द्यावी लागली. 2014 मध्ये विदर्भात मोदी यांच्या नावाने परिवर्तनाची लाट दिसली. त्या लाटेचे पाणी उतरले आहे, पण मोदी यांची लोकप्रियता घसरलेली नाही. नागपुरातून पुन्हा नितीन गडकरी उभे राहिले. 2014 साली सुमारे तीन लाखांच्या मताधिक्याने श्री. गडकरी निवडून आले. मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यक्षम व परखड मंत्री म्हणून त्यांची ख्याती. मोदी यांना पंतप्रधानपदाचा पर्यायी उमेदवार म्हणून गडकरी यांचे नाव चर्चेत असते, पण कालची निवडणूक गडकरी यांना सोपी गेली नाही. निवडणुकीपूर्वी गडकरी यांचे म्हणणे होते की, मी फक्त उमेदवारी अर्ज भरून देशात सर्वत्र प्रचारास बाहेर पडेन. प्रत्यक्षात काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी गडकरींभोवती असे कुंपण टाकले की, ते मतदान संपेपर्यंत नागपुरातच अडकून पडले. महाराष्ट्राच्या 48 पैकी 42 मतदारसंघांत व देशात 540 मतदारसंघांत आज हीच स्थिती आहे. सर्वत्र तुंबळ युद्ध आहे. मोदी यांच्या तुलनेत दुसरा नेता आज देशात नाही. भाजपइतके मोठे संघटन व सर्वच प्रकारची ताकद असलेला दुसरा पक्ष नाही, हे मान्य केले तरी या वेळचे मैदान सोपे नाही.

गाढवांचा पक्ष
श्री. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचा उल्लेख ‘गाढवांचा पक्ष’ असा केला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसला जळक्या घराची उपमा दिली होती; पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सगळेच अनुयायी त्या जळक्या घरात साठ वर्षे घुसले होते. प्रकाश आंबेडकर हे सध्याच्या राजकारणातील एक बुद्धिमान राजकारणी आहेत, पण ते हेकेखोर आहेत. त्यांच्यावर एक गंभीर आरोप असा की, ते दलित संघटनांचे ऐक्य घडू देत नाहीत. रामदास आठवले हे आज भाजपसोबत आहेत, पण काँग्रेसच्या तंबूत तेसुद्धा अनेक वर्षे होते व प्रकाश आंबेडकर शेवटचे लोकसभेत निवडून गेले ते काँग्रेसच्याच पाठिंब्यावर. आजही इतकी पीछेहाट होऊनही काँग्रेस पक्ष संपलेला नाही व देशातील बहुसंख्य मतदारसंघांत भाजप आघाडीची लढत काँग्रेस पक्षाशी आहे. मोदी यांच्या टीकेचे प्रमुख लक्ष्य राहुल गांधी हेच आहेत. काँग्रेस पक्षाचे संघटनात्मक अपयश असे की, गेल्या 25 वर्षांत हा पक्ष एकही नवा कार्यकर्ता घडवू शकला नाही. तरीही प्रियंका गांधींच्या रोड शोला प्रचंड गर्दी होते व मुंबईत उर्मिला मातोंडकर काँग्रेसची उमेदवार म्हणून फिरू लागते तेव्हा प्रस्थापितांच्या पोटात भीतीचा गोळा येतो. उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांत ज्या प्रमुख भाजप नेत्यांनी पक्ष सोडला त्या शत्रुघ्न सिन्हांपासून कीर्ती आझादपर्यंत सगळय़ांनी काँग्रेसचा रस्ता पकडला. हे कसले लक्षण? गाढवांच्या पक्षात भाजपचेच दिग्गज लोक गेले.

मोदींची भूमिका
कोणाचेही राजकारण आज मूल्याधिष्ठत नाही. देशाचे म्हणवून घेणारे सर्वच नेते सत्तेवर येतात ते स्वतःसाठी. जनतेच्या नावाने ते सत्तेवर येतात, परंतु जनतेसाठी ते येत नाहीत. या घडीस देशाचा विचार नक्की कोण करीत असेल काय? मोदी हे महाराष्ट्रातील प्रचार सभांतून शरद पवार यांच्यावर हल्ले करीत आहेत. पवारांचा उल्लेख ते शरदराव किंवा पवारसाहेब असा करतात; पण तेच मोदी पवार कुटुंबीयांच्या मालकीच्या ‘सकाळ’ वृत्तपत्रास ऐन निवडणुकीत मोठी मुलाखत देतात व खुलासा करतात की, ‘मी व्यक्तिशः शरद पवार यांच्या विरोधात नाही. शरद पवार अत्यंत चाणाक्ष राजकीय निरीक्षक आहेत, असं मला वाटतं. म्हणूनच जेव्हा ते काँग्रेसच्या अध्यक्षांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देतात तेव्हा काही प्रश्न उभे राहतात. त्यांच्या पक्षाचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. एखादा राष्ट्रवादी राष्ट्रद्रोहाचा कायदा रद्द करण्याचं समर्थन करू शकतो का? कोणी कश्मिरी नेता म्हणतो की, देशात दोन पंतप्रधान असायला हवेत आणि ते तुमचे सहकारी असतील तर मग प्रश्न पडतो, शरदराव तुम्हीसुद्धा? म्हणून मला त्यांच्याविरुद्ध बोलावे लागते?’ मोदी यांचे हे वक्तव्य रहस्यमय आहे. पवार हे काँग्रेसची साथ सोडून भाजपच्या बाजूने आले तर ते मोदी यांना हवे आहेत असा त्याचा दुसरा अर्थ होतो. पण श्री. मोदी यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, राज ठाकरे हे आज मोदी-शहा जोडीवर सगळय़ात जास्त टीका करीत आहेत व महाराष्ट्रात मोठय़ा सभा ते घेत आहेत. राज ठाकरे यांचा एकही उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या मैदानात नाही. त्या राज ठाकरे यांना हे नवे व्यासपीठ निर्माण करून देणारे राजकारण श्री. पवार यांचेच आहे. पवारांचे हे ‘चाणाक्ष’ राजकारण मोदी व शहा यांना मान्य आहे काय? मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत हे पवारांचे भाकीत आहे व त्यासाठी ते कामास लागले आहेत. कारण संधी मिळाली तर स्वतः पवारांना पंतप्रधान व्हायचे आहे.

सगळेच कठीण
महाराष्ट्राचे उरलेले मतदान 23 आणि 29 एप्रिल रोजी होईल. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातले मतदान 23 एप्रिल रोजी संपेल. मुंबई, ठाणे, कोकण, उत्तर महाराष्ट्रातील मतदान 29 तारखेला आहे. या वेळी एखाद् दुसरा अपवाद वगळता कोणत्याही मतदारसंघातील लढत सहज सोपी नाही. बारामती हासुद्धा शरद पवारांचा हमखास गड राहिलेला नाही व चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत मोठी जमवाजमव सुरू केली आहे. याचे कारण असे की, ‘व्यक्तीच्या नावाने गड निर्माण झाला की गुलामी व लाचारी सुरू होते व गुलामांची पिढी बदलली की गडाला सुरुंग लागतात.’ महाराष्ट्रात सध्या तेच चित्र आहे. बारामती पूर्णपणे पवारांचा राहिलेला नाही. साताऱयास उदयनराजे भोसले यांना नरेंद्र पाटील या माथाडी नेत्याने आव्हान दिले. सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांना झुंजावे लागले. विखे-पाटील व मोहिते-पाटील घराणी सत्त्व हरवून बसली. नागपुरात गडकरींना पंधरा दिवस अडकून पडावे लागले. कारण आज कोणताही विचार व लाट नसलेली निवडणूक लढवली जात आहे. टोलेबाजी व टोलवाटोलवीचीच भाषणे सुरू आहेत. जात व मतविभागण्या यावर भवितव्य ठरणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावरील एक चित्रपट ऐन निवडणुकीत येणार होता तो आलाच नाही. या चित्रपटामुळे भाजपची मते वाढतील अशा भ्रमात अनेकजण होते, पण हा चित्रपट मोदी यांनी पाहिला व ते स्वतःच निराश झाले. हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी मोदी यांचीच इच्छा असल्याचे समजते. भक्तमंडळ अतिउत्साहात सर्वोच्च नेत्यांचे पाय खेचते, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘मोदी’ यांच्यावरील चित्रपट. हा चित्रपट रोखला तरी मोदी यांची प्रतिमा राष्ट्रीय लोकशाही आघाडीस विजयाचा मार्ग दाखवेल. राफेलसह महागाईपर्यंत सगळे विषय मागे पडले व प्रत्येक मतदारसंघाचा स्वतंत्र विषय असे चित्र उभे राहिले.

युक्रेनचा धडा!
निवडणुका कमालीच्या निरस झाल्या आहेत. निवडणुकांची भाषणे आणि चर्चा ही एकेकाळी मेजवानी ठरत असे. आज वैयक्तिक आरोप व स्वतःच्याच आरत्या यापलीकडे प्रचार दिसत नाही. समाजमाध्यमांवर आता मतदारही सक्रिय झाले. कानपूरच्या एका मतदाराने स्वतःचा एक व्हिडीओ टाकला. त्यात तो म्हणतो, ‘‘सर्वच राजकीय पक्षांनी किमान निराश व रडवे चेहरे असलेल्यांना तरी उमेदवारी देऊ नये. मतदारांना हसवणारा व स्वतः हसणारा उमेदवार जिंकावा; कारण शेवटी सामान्यांची कामे तर कोणीच करीत नाही. मग हे ‘रडके’ उमेदवार का माथी मारता?’’ कानपूरच्या या मतदाराची भावना ‘युक्रेन’च्या जनतेपर्यंत पोहोचलेली दिसते. ‘युक्रेन’च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत तेथील जनतेने त्या देशाचा प्रख्यात कॉमेडियन वोलोदिमिर जेलेंस्की याच्या बाजूने कौल दिला आहे. या विनोदसम्राटाने देशातील भल्याभल्या नेत्यांना मागे टाकले व त्याने 30.34 टक्के मते मिळवली. विद्यमान राष्ट्रपती पेत्रो पोरोशेंको यांना फक्त 15.95 टक्के मते मिळाली. हा भूकंप युक्रेनमध्ये का झाला? 2013 च्या निवडणुकीत विकास, पारदर्शक कारभार, भ्रष्टाचार आणि युद्धसदृश स्थिती संपविण्यासाठी तत्कालीन सरकारविरुद्ध जबरदस्त आंदोलन त्या देशात झाले होते. मावळते राष्ट्रपती पेत्रो पोरोशेंको अनेक आश्वासने आणि भूलथापा देत सत्तेवर आले. गेल्या चार वर्षांत त्यातला एकही वादा पूर्ण झाला नाही. उलट पारदर्शकतेचे बारा वाजले. आता असे समोर आले की, राष्ट्रपतीच्या जवळच्या मित्राने देशाच्या संरक्षण व्यवहारात मोठा घोटाळा केला. सर्वोच्च न्यायालयात भ्रष्ट व लाचार न्यायाधीश नेमले गेले. त्यामुळे पुन्हा विद्यमान सरकारविरुद्ध संतापाचा वणवा पेटला. आता युक्रेनियन लोकांनी कोणतीही राजकीय पृष्ठभूमी नसलेल्या कॉमेडियन जेलेंस्कीला कौल दिला. राजकारणी नकोच ही भावना वाढीस लागली व बदल झाला. जेलेंस्कीकडे कोटय़वधीची संपत्ती आहे. त्यामुळे ते भ्रष्टाचार करणार नाहीत असे लोकांना वाटले. राजकारणी सर्वच देशांत बदनाम होत आहेत. नेत्यांची भाषणे व आश्वासने यांना विरोध होत आहे. युक्रेनचा धडा सगळय़ांनीच घ्यावा. पेत्रोपेक्षा कॉमेडियन जेलेंस्की बरा. अमेरिकेत कॉमेडियन ट्रम्प आणि युक्रेनमध्ये जेलेंस्की!

हिंदुस्थान आहे तेथेच आहे. जग कोठे चालले आहे? आमच्या निवडणुका म्हणजे कॉमेडियन्सची सर्कस झाली आहे हे राजकीय नेत्यांची भाषणे ऐकून पटते. मोदी यांचे नेतृत्व शिखरावर आहे, पण तरीही गोंधळलेल्या निवडणुकीचे असे भरकटलेले चित्र सत्तर वर्षांत दिसले नाही. पण देशाचा मतदार कधीच गोंधळत नाही. काही झाले तरी ही निवडणूक एकतर्फी होत नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या येणाऱया सरकारसमोर एक मजबूत विरोधी पक्ष निवडून येत आहे. एकंदरीत युद्ध तुंबळ आहे हे मान्य करावे लागेल.

Twitter – @rautsanjay61
Gmail – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या