
खोपोली परिसरातील झेनिथ धबधब्यावर येणाऱ्या अतिउत्साही पर्यटकांना रोखण्यासाठी प्रशासनाने धबधब्याकडे येणाऱ्या रस्त्यावर रोप बॅरिकेडिंग केले आहे. खोपोली नगरपालिका, खोपोली पोलीस ठाणे, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था आणि स्थानिकांच्या माध्यमातून पावसाळ्याच्या सुरुवातीलाच प्रयत्न केले जात आहेत.
रायगड जिल्हाधिकारी आणि रायगड पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून पावसाळ्यात धबधब्यावर येण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात येते. या बंदीहुकूमानंतरही काही अतिउत्साही पर्यटक कायदा पायदळी तुडवून हुल्लडबाजी आणि निसर्गाचा अतिरेकी आनंद घेण्यासाठी दाखल होतात. यंदाही पर्यटकांचे हे कारनामे गृहित धरूनच खोपोली नगर परिषदेच्या अग्निशमन दलाकडून झेनिथ वॉटरफॉलच्या वाटेवर ठिकठिकाणी रोप बॅरिकेडिंग केले आहेत. अन्य उपाययोजनाही केल्या जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. पंकज पाटील यांनी दिली आहे. खोपोली पोलीस ठाण्याच्या माध्यमातून हौशी पर्यटकांवर करडी नजर ठेवली जाणार आहे आणि कोणीही नशापाणी करून त्या ठिकाणी जाणार नाही याकडे काटेकोरपणे लक्ष ठेवले जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी सांगितले.


























































