आष्टीत कुजलेला मृत बिबट्या सापडला

आष्टी तालुक्यातील मातावळी परिसरात कुजलेल्या अवस्थेत मृत बिबट्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती आष्टी वन विभागाला समजताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. शुक्रवारी सकाळी गुरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला तालुक्यातील मातावळी परिसरातील डोंगराळ भागात मृत बिबट्या कुजलेल्या अवस्थेत दिसला.

या घटनेमुळे वन्य प्राण्यांचे कुजून सांगडे तयार होतात. यावर वन विभागाचे कर्मचारी करतात तरी काय ? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तालुक्यामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्याने अनेकांवर हल्लेही केले होते. त्यामुळे या नरभक्षक बिबट्यास वन विभागास गोळ्या घालून ठार मारावे लागले होते. ही घटना करमाळा तालुक्यात घडली होती, पण आष्टीच्या वन विभागाला मात्र लोकांना त्रास देणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करता आला नाही.

तसेच मृत बिबट्याचा सांगडा तयार होईपर्यंत आष्टीच्या वनविभागाला त्याचा थांगपत्ताही लागला नाही. वन विभागातील कर्मचारी डोंगराळ भागात, वनक्षेत्र परिसरात कर्तव्य बजावतात. तरीही कित्येक दिवस कुजलेल्या अवस्थेतील बिबट्याची माहिती त्यांना कशी मिळत नाही, असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत. बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या