
सामना ऑनलाईन, मुंबई
मुंबईभर सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या कामांमुळे अनेक गणेश मंडळांचे विसर्जनाचे आणि आगमनाचे मार्ग मेट्रोच्या कामांनी अडवून ठेवले आहेत. सर्वाधिक गणेश मंडळे असलेल्या गिरगाव, दादर, माहीम या भागांतच मेट्रोची कामे मोठय़ा प्रमाणावर सुरू आहेत. त्यामुळे येथील मंडळांना मेट्रोच्या कामांचा मोठा फटका बसणार आहे. मेट्रोमुळे नक्की किती गणेश मंडळांना मार्ग बदलावे लागणार याचा उद्यापासून आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर गणेशमूर्ती या मार्गावरून जाऊन शकतील की नाही की मार्ग बदलावे लागतील हे ठरवण्याची मागणी गणेशोत्सव समन्वय समितीने वारंवार केली होती. या पार्श्वभूमीवर आज पालिका अधिकाऱ्यांनी गणेशोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत मेट्रोच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेतली. यावेळी गणेशोत्सव समितीच्या वतीने ऍड. लीलाधर डाके, विनोद घोसाळकर, नरेश दहीबावकर, गिरीश वालावलकर, कुंदन आगासकर उपस्थित होते.
अनेक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्ती १५ ऑगस्टपासून यायला सुरुवात होते. आगमनाचे आणि विसर्जनाच्या मार्गांचा आढावा घेण्यासाठी उद्या पालिकेचे, मेट्रोचे अधिकारी, ट्रफिक पोलीस आणि समन्वय समितीचे पदाधिकारी शहर मार्गातील मार्गांची पाहणी करणार आहेत. गिरगाव, शिवाजी पार्क, माहीम, लालबाग, सातरस्ता, ना. म. जोशी मार्ग या मार्गांचा उद्या आढावा घेण्यात येणार आहे. या विभागातीतल मंडळांचे आधीचे मार्ग कोणते होते, त्यावर आता कामे सुरू आहेत काय? असतील तर त्यांना कोणते मार्ग बदलून द्यावे लागतील याचा आढावा घेतला जाणार आहे.
अग्निशमन दलाच्या जाचक अटी कमी करा
यंदा मंडपांना परवानगी देण्यासाठी अग्निशमन दलाने अनेक जाचक अटी घातल्या आहेत. अनेक वर्षांपासून छोटय़ा छोटय़ा गल्ल्यांमध्ये गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना या अटी पूर्ण करणे शक्य नाही. त्यामुळे या अटी शिथिल कराव्या अशी मागणी समन्वय समितीने केल्या आहेत. ज्या रस्त्यांवर खड्डे आहेत अशा रस्त्यांची यादी गणेश मंडळांनी दिल्यास ते खड्डे ताबडतोब बुजवले जातील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.





























































