आरपीएफमध्ये रॉयल एनफिल्ड मोटार सायकली दाखल, आणीबाणीच्या प्रसंगी वेगाने घटनास्थळी पोहचणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकात गस्तीसाठी तसेच आणीबाणी प्रसंगी घटनास्थळी वेगाने पोहचण्यासाठी रॉयल एनफिल्ड मोटार सायकली दाखल करण्यात आल्या आहेत. मुलुंड आरपीएफ पोस्टच्या या नऊ मोटारसायकली आणि कर्मचार्‍यांचे निवासस्थान ‘वैतरणा’ चे उद्घाटन बुधवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांच्या हस्ते झाले. यावेळी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल उपस्थित होते.

मुलुंड पोस्टमध्ये बांधलेल्या बॅरेकमध्ये 226 कर्मचार्‍यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली असून येथे मनोरंजन कक्ष, व्यायामशाळा, आधुनिक स्वयंपाक घर आणि जेवणाचा हॉल यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. येथे अतिरिक्त कर्मचार्‍यांना सामावून घेण्याची व्यवस्था देखील आहे. या सुविधेचे उद्घाटन महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी केले आहे. गस्त घालण्यासाठी तसेच आणीबाणीच्या प्रसंगी किंवा अपघातात लवकर घटनास्थळी पोहचविण्यासाठी आरपीएफ जवानांना रॉयल एनफिल्ड मोटारसायकली पुरविण्यात आल्या असून त्यास लाहोटी यांच्या हस्ते हिरवा झेंडाही दाखविण्यात आला. यामुळे वे साईड स्टेशनवर दिवसाचे 24 तास गस्त घालणे देखील शक्य होणार आहे.