आरपीएफच्या ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ मोहिमे अंतर्गत मध्य रेल्वेवर चार महिन्यात 504 मुलांची घरवापसी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेक छोट्या मोट्या कारणांमुळे घरातल्यांशी भांडून किंवा बॉलिवूडच्या आकर्षणामुळे लहान मुले आपल्या आई वडीलांचे घर सोडून मुंबईत नशीब आजमाविण्यासाठी येत असतात. अशा मुलांना त्यांच्याशी गोडबोलून त्यांचा पत्ता मिळवित रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी एनजीओ ‘चाईल्ड लाईन’ आणि ‘जीआरपी’ पोलीसांची मदत घेत पुन्हा त्यांच्या घरी पाठवित असतात. अशा पद्धतीने गेल्या चार महिन्यात 504 मुलांची मध्य रेल्वेच्या आरपीएफने सुखरूप सुटका करीत त्यांची पालकांशी भेट घडवून आणली आहे.

आरपीएफने ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत जानेवारी ते एप्रिल 2022 अशा गेल्या 4 महिन्यात 504 मुलांची सुटका केली आहे. यात 330 मुले आणि 174 मुलींचा समावेश आहे. या मुलांना त्यांच्या पालकांकडे सुखरूपपणे सोपविल्याने मुले व पालकांच्या चेहर्‍यावरील आनंदाचे भाव पाहून रेल्वे सुरक्षा बलाच्या शिपायांना समाधान मिळत आहे. गेल्या चार महिन्यात मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनने 285 मुलांची सुटका केली आहे, त्यात 206 मुले तर 79 मुली आहेत. पुणे डिव्हीजनने 71 मुलांची सुटका केली असून त्यात 50 मुले तर 21 मुली आहेत. भुसावळ डिव्हीजनने 92 मुलांची सुटका केली असून त्यात 47 मुले तर 45 मुलींचा समावेश आहे. नागपूर डिव्हीजनने 32 मुलांना शोधले असून त्यात 12 मुले तर 20 मुलींचा समावेश आहे. सोलापूर डिव्हीजनने 24 जणांची सुटका केली असून त्यात 15 मुले तर 9 मुलींचा समावेश आहे. गेल्यावर्षी जानेवारी ते डिसेंबर 2021 मध्ये 971 मुलांची आरपीएफने सुखरूपपणे सुटका करून त्यांना पुन्हा त्यांच्या पालकांकडे पाठविले आहे. त्यात 603 मुले तर 368 मुलींचा समावेश आहे.

मनुष्य तस्करीच्या विरोधात एल्गार

रेल्वेने देशातून मनुष्य तस्करीचा प्रकार नष्ट करण्यासाठी ‘असोसिएशन फॉर व्हॉन्लेटरी अ‍ॅक्शन’ या संघटनेशी करार केला आहे. या संघटनेला बचपन बचाओ आंदोलनही म्हणत ही संघटना नोबेल पारितोषिक विजेते वैâलाश सत्यार्थी यांच्या चिल्ड्रन फाऊंडेशनशी संलग्न आहे. आरपीएफने मुनष्य तस्करी विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी ‘अ‍ॅक्शन अगेन्स्ट ह्युमन ट्रॅफिकिंग’ ही मोहिमही उघडली आहे.