विठूमाऊलीच्या ऑनलाईन दर्शन नोंदणीसाठी 100 रुपये मोजावे लागणार

40

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

श्री विठ्ठल-रुक्मिणीचे ऑनलाइन नोंदणीने दर्शन हवे असेल तर आता 100 रुपये मोजावे लागणार आहे. आतापर्यंत ही सुविधा मोफत होती. या नव्या देणगी आकारणीमुळे मंदिर समितीला वर्षाला 15 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. या निधीतून भाविकांना अधिक सेवासुविधा पुरवण्यास मदत होईल असा विश्वास मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी व्यक्त केला. हभप औसेकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी मंदिर समितीची बैठक झाली. या बैठकीत औसेकर महाराज यांनी ऑनलाईन दर्शन नोंदणी सुविधेसाठी 100 रुपये आकारण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सर्वांनी संमती दिली. वर्षभरात 14 ते 15 लाख भाविक ऑनलाईन नोंदणी करून दर्शनाचा लाभ घेतात.

आतापर्यंत या दर्शन सुविधेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. ऑनलाईन नोंदणी केलेल्या भाविकांना तासाभरात देवाच्या दर्शनाचा लाभ मिळत आहे. तर इतर भाविकांना तीन ते चार तासानंतर दर्शनाचा लाभ मिळतो. मंदिर समितीचे वार्षिक उत्पन्न अत्यल्प असल्याने उत्पन्नात वाढ करुन सर्वसामान्य भाविकांना अधिक सेवासुविधा देणे आर्थिकदृष्ट्या शक्य नव्हते. आता या नव्या धोरणामुळे समितीच्या उत्पन्नात 15 कोटींची वाढ होणार असल्याने भाविकांना सुलभ व तत्पर दर्शन, महाप्रसाद आणि राहण्याची माफक दरात सुविधा उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे.

ऑनलाईन दर्शन नोंदणी सुविधेसाठी देणगी आकारण्याची मागणी भाविकांकडून होत होती. मात्र काहीजणांचा याला विरोध असल्याने हा निर्णय लांबणीवर पडला होता. शनिवारी झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. या निर्णयाचे भाविकांनी स्वागत केले आहे. या बैठकीला मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पदुलवाड, सदस्य संभाजी शिंदे, शकुंतला नंडगिरी, हभप ज्ञानेश्वर जळगावकर आदी उपस्थित होते. मात्र समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले अनुपस्थित होते. त्यांच्या गैरहजेरीत सहअध्यक्षांनी हा धाडसी निर्णय घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या