हिंदू कधीही देशद्रोही असू शकत नाहीत! सरसंघचालक मोहन भागवतांचे उद्गार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एखादी व्यक्ती हिंदू असेल तर ती आपोआप देशभक्तच असते, कारण ही बाब त्याचे चरीत्र आणि स्वभाव असते असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे.   महात्मा गांधी यांनी म्हटले होते की त्यांची देशभक्ती ही त्यांच्या धर्मातून निर्माण झाली आहे. त्यांच्या याच विधानाचा आधार घेत सरसंघचालकांनी हे विधान केले आहे.  जे.के.बजाज आणि एम.डी.श्रीनिवास यांनी लिहिलेल्या ‘मेकिंग ऑफ अ हिंदू पॅट्रीअट’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्या निमित्ताने सरसंघचालकांनी हे उद्गार काढले आहेत.

मोहन भागवतांनी या कार्यक्रमात बोलताना म्हटले की पुस्तकाचे नाव आणि या पुस्तक प्रकाशनाला ते हजर राहिल्याने तर्क लढवले जात होते की महात्मा गांधींना आपल्या पद्धतीने परिभाषित करण्याचा हा एक प्रयत्न आहे, मात्र महापुरुषांना आपल्या पद्धतीने कोणीही परिभाषित करू शकत नाही असं ते म्हणाले.  हे पुस्तक व्यापक शोधावर आधारीत असल्याचं त्यांनी म्हटलंय.  ज्या व्यक्तींची या पुस्तकातील मतांपेक्षा वेगळी मते आहेत,  ते देखील शोध लावून पुस्तकरुपाने मते मांडू शकतात असे त्यांनी सांगितले.

‘माझ्या धर्माला नीट समजून घेतलं तर मी चांगला देशभक्त बनेन. मी इतरांनाही असेच करायला सांगेन’  असं महात्मा गांधी यांनी म्हटले होते असं मोहन भागवतांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले. स्वराज्य समजून घेण्यासाठी स्वधर्म समजून घेणं आवश्यक  असल्याचं गांधींचं म्हणणं होतं असंही भागवतांनी सांगितले.  स्वधर्म आणि देशभक्तीचा धागा पकडत मोहन भागवत पुढे म्हणाले की हिंदू असेल तर तो देशभक्तच असतो कारण त्याचं मूळच ते आहे.  जर कोणी निद्रेत असेल तर त्याला उठवावं लागेल मात्र कोणताही हिंदू देशद्रोही असू शकत नाही.

महात्मा गांधींनी ‘हिंद स्वराज’मध्ये मांडलेल्या विचारांबाबत बोलताना  त्यांनी  धर्म आणि देशभक्ती यांच्या परस्पर संबंधांवर भाष्य केले आहे.  महात्मा गांधी हे हिंदू देशभक्त होते अशी मांडणी ‘मेकिंग ऑफ अ हिंदू पॅट्रीअट’ या पुस्तकात करण्यात आली आहे. त्यासाठी लेखकांनी गांधीजींचे विचार, लिखाण, भाषणे यांची मदत घेतली आहे.  या पुस्तकामध्ये एका ठिकाणी म्हटलंय की 1893-1894 दरम्यान महात्मा गांधींना काही मुसलमानांनी तसेच ख्रिस्ती परिचितांनी धर्म परिवर्तनाचा सल्ला दिला होता. महात्मा गांधींनी हा सल्ला मानण्यास नकार दिला होता आणि 1905 उजाडेपर्यंत ते समर्पित हिंदू बनले होते.