किती मुले असावी? सरकारने ठरवावे! सरसंघचालकांचे वक्तव्य

476

लोकसंख्येचा प्रश्न इतर देशांप्रमाणे आपल्याकडेही आहे. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणावर विचार व्हायला हवा. मात्र यावरून प्रत्येक दांपत्याला दोनच मुले असावीत असे संघाचे मत असल्याचा चुकीचा विचार पसरविला गेला. वास्तविक किती मुले असावीत? हे सरकारने ठरवावे, संघाने नाही, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे व्यक्त केले.

‘भविष्यातील हिंदुस्थानाबाबत संघाचा दृष्टीकोन’ या विषयावर भाषण करताना सरसंघचालक बोलत होते. लोकसंख्या वाढीवर नियंत्रण कायद्याअंतर्गत ‘दोनच मुले’ याबाबत सरसंघचालकांनी समर्थन व्यक्त केले होते. त्यावर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी आक्षेप घेतला होता. सरसंघचालक बेरोजगारी आणि आत्महत्यांवर बोलणार नाहीत. त्यांनी कितीजणांना नोकऱ्या दिल्या? असा प्रश्न ओवेसींनी उपस्थित केला होता. त्या टीकेला उत्तर देताना मोहन भागवत म्हणाले, मुले किती व्हावीत हे मी किंवा स्वयंसेवक संघ ठरवत नाही, ते ठरविण्याचे काम सरकार करेल.

हिंदुस्थान केवळ जमिनीचा तुकडा नाही

सरसंघचालक मोहन भागवत आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, हिंदुस्थान केवळ एक जमिनीचा तुकडा नाही. तो एक स्वभाव आहे. एक प्रवृत्ती आहे. हा देश जर फक्त जमिनीचा तुकडा असता तर त्याचे नाव केव्हाच बदलले असते. पण येथे जन्मणारा प्रत्येकजण हिंदू आहे. ज्यांना स्वतःला हिंदू म्हणवून घ्यायचे नसेल त्यांनी खुशाल दुसऱया देशात निघून जावे. हिंदुस्थानात अनेक भाषा, अनेक धर्म आणि अनेक देव – देवता आहेत. पण या वैविध्यामध्येही आम्ही एक आहोत, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या