
पश्चिम बंगालमधील येत्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापत असताना रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची मुंबईत अचानक भेट घेतली. मिथुन यांच्या मुंबईतील निवासस्थानी मंगळवारी सकाळी सरसंघचालक गेले आणि त्यांनी मिथुन यांच्याशी दीड तासाहून अधिक वेळ चर्चा केल्याने पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. त्याचसोबत मिथुन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांचे पेव पसरले आहे.
मिथुन यांना पक्षात आणण्याचे भाजपचे प्रयत्न
मोहन भागवत यांच्या भेटीनंतर मिथुन चक्रवर्ती पुन्हा राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 2011 मध्ये मिथुन यांनी ममता बॅनर्जी यांच्या विनंतीवरून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तृणमूलने त्यांना राज्यसभेवर पाठवल होते. मात्र 2016 मध्ये मिथुन यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत राजकीय संन्यास घेतला होता. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मिथुन यांच्यासारख्या लोकप्रिय व्यक्तीला भाजपमध्ये घेऊन ममतांच्या गडाला सुरुंग लावण्याचे जोरदार प्रयत्न भाजप करीत असल्याची चर्चा आहे.

























































