
वाहतुकीचा नियमभंग करणाऱ्या मोटरचालकावर दंड आकारताना ई-चलानद्वारे व्हॅनवरील ड्रायव्हरला फोटो काढायला सांगणे आरटीओ इन्स्पेक्टरला चांगलेच महागात पडले असून गृह विभागाने एका आरटीओ इन्स्पेक्टरच्या विरोधात थेट निलंबनाची कारवाई केली आहे. अशा प्रकारे झालेली ही पहिलीच कारवाई असल्याचे सांगण्यात येते.
हल्ली ई-चलानद्वारे दंड आकारण्यापूर्वी मशीनद्वारे मोटरचा फोटो काढला जातो. हा फोटो वाहतूक विभागाकडे ‘अपलोड’ केला जातो. मग दंडाचे चलान दिले जाते. मात्र ई-चलानद्वारे फोटो काढण्याचे अधिकार फक्त वाहतूक विभागाच्या अधिकाऱयांनाच दिले आहेत. मोटार वाहन निरीक्षक सचिन पाटील हे देवनारमध्ये डय़ुटीवर होते. त्यांनी त्यांच्याकडील ई-चलान मशीन त्यांच्या वाहन चालकाच्या ताब्यात दिली. वाहन चालकाने ई-चलान मशीनवरून फोटो काढतानाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला होता.
खासगी मोबाईलने फोटो काढले तरी कारवाई
हल्ली अनेकदा वाहतूक पोलीस खासगी मोबाईलमधून मोटरचे फोटो काढतात आणि दंड न आकारता परस्पर तडजोड करतात. अशा पोलिसांवरही कारवाई करण्याचे आदेश गृह विभागाने जारी केले आहेत.
ठपका काय ठेवला
गृह विभागाने याची गंभीर दखल घेतली. या प्रकारामुळे शासनाची प्रतिमा मलिन झाली असून महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तवणूक) नियमांचा भंग करणारी आहे असा ठपका ठेवत मोटर वाहन निरीक्षक सचिन पाटील यांच्यावर परिवहन आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली


























































