अकरा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, अल्पसंख्याक विभागातून उचलबांगडी झालेले रुचेश जयवंशींची शेती महामंडळात नियुक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाच्या दिवशी राज्यातील शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक संस्थेचा दर्जा देणारी प्रमाणपत्रे जारी केल्याप्रकरणी अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिव पदावरून उचलबांगडी करण्यात आलेले रुचेश जयवंशी यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. तर नाशिक महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची बदली जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी झाली आहे.

राज्य सरकारने आज 11 सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले. रंजन महिवाल यांची बदली महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या सदस्य सचिवपदी झाली आहे. लक्ष्मण राऊत यांची बदली महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली आहे. तर गीतांजली बाविस्कर यांची बदली मंत्रालयात नियोजन विभागात सह सचिव म्हणून झाली आहे.

डॉ. दिलीप जगदाळे यांची बदली मंत्रालयात पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागात सह सचिवपदी करण्यात आली आहे. पंकज देवरे यांची बदली महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सचिव म्हणून झाली आहे. मीनल करंवाल यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या प्रकल्प संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अमित रंजन यांची नियुक्ती नाशिक महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी केली.

श्वेता सिंघल महाराष्ट्र सदनात

श्वेता सिंघल यांची नियुक्ती नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनाच्या विशेष निवासी आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. कान्हुराज बगाटे यांना सह व्यवस्थापकीय संचालक महावितरण, कल्याण येथे नेमण्यात आले आहे.