रायगड झेडपीच्या ठेवींवर सत्ताधारी भाजपचा डोळा, जिल्हा परिषदेचा १७५ कोटी ७५ लाखांचा अर्थसंकल्प सादर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रायगड जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा ठेवींवरून गाजली. जिल्हा परिषदेच्या कोट्यवधींच्या ठेवी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आहेत. या ठेवी राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवाव्यात असा ठराव घेण्यात यावा, अशी सूचना विषय समिती सभापती वैकुंठ पाटील यांनी मांडली. मात्र सत्ताधारी भाजपचा या ठेवींवर डोळा असून ठेवी मोडून विकासकामांच्या नावावर उधळपट्टी केली जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान २०२६ – २७ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषदेचा १७५ कोटी ७५ लाख २२ हजार रुपयांचा अर्थसंकल्प जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी सादर केला.

जिल्हा नियोजन भवन येथे शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. अर्थसंकल्पात इमारत व दळणवळण कामांसाठी ३६ कोटी ७२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून सामान्य प्रशासन १ कोटी ७९ लाख, शिक्षण ११ कोटी ३५ लाख, पाटबंधारे ७ कोटी ३६ लाख, सार्वजनिक आरोग्य ५ कोटी ११ लाख, ग्रामीण पाणीपुरवठा २६ कोटी ७० लाख, कृषी ४ कोटी ५ लाख, पशुसंवर्धन ४ कोटी १० लाख, समाजकल्याण ३१ कोटी ३५ लाख, दिव्यांग सक्षमीकरण ७कोटी ८४ लाख, महिला व बालविकास १५ कोटी ६८ लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे.

… आणि ठराव बारगळला
अर्थसंकल्प सभेत विकासावर चर्चा करण्याऐवजी सत्ताधारी भाजपला ठेवीतच अधिक स्वारस्य असल्याचे पहायला मिळाले. रायगड जिल्हा सहकारी बँकेत असलेल्या जिल्हा परिषदेच्या ठेवी राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवाव्यात असा ठराव घेण्यात यावा, असा भाजप सदस्यांचा आग्रह होता. मात्र ही अर्थसंकल्पीय विशेष सभा असून आयत्या वेळचे विषय घेता येत नाहीत असे प्रशासनाकडून स्पष्ट केले. त्यामुळे हा ठराव बारगळला.
निधीची माहिती द्या !
जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राजवट असल्याने किती निधी रायगडच्या विकासासाठी व किती निधी इतरांच्या विकासासाठी वापरण्यात आला याची माहिती जिल्हा परिषद सदस्य गीता जाधव यांनी प्रशासनाकडून मागितली आहे.
Mumbai Edition Mar 28, 2026 Page No. 6 Powered by: erelego.com