
सामना प्रतिनिधी, मुंबई
नेरुळ ते खारकोपरपर्यंतचा नवा मार्ग, हार्बरचा गोरेगावपर्यंतचा विस्तार यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवासी संख्येत अचानक वाढ झाली असून उत्पन्नातदेखील वाढ झाली आहे. मध्य रेल्वेच्या एप्रिल ते नोव्हेंबर 2018 दरम्यान दररोजच्या प्रवासी संख्येत 74 हजार प्रवाशांची भर पडली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची दररोजची प्रवासी संख्या आता 42 लाख 74 हजार इतकी झाली असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.
मध्य रेल्वेच्या लोकलमधून रोजची गर्दी वाढली आहे. गेल्या वर्षी नव्या वेळापत्रकात वाढलेल्या लोकल फेऱ्या, हार्बरचा गोरेगावपर्यंत विस्तार आणि त्यातच नुकत्याच सुरू झालेल्या नेरुळ-खारकोपर लोकल सेवेमुळेही प्रवाशांच्या संख्येत भर पडली आहे. मध्य रेल्वेचे उपनगरीय जाळे सीएसएमटी ते कर्जत, कसारा आणि वाशी-पनवेल-अंधेरी-गोरेगावपर्यंत आहे. या मार्गावर गेल्या काही वर्षांत झालेल्या नागरीकरणामुळे लोकलची गर्दी वाढतच चालली आहे. त्यामुळे लोकल गाडय़ा व फेऱ्यांची संख्या वाढविण्याची कसरत मध्य रेल्वेला करावी लागत आहे.
लोकल फेऱयांत वाढ
मध्य रेल्वेने ऑक्टोबर 2017 मध्ये 46 नव्या लोकल फेऱ्या वाढविल्या. त्यानंतर जानेवारी 2018 मध्ये आणखी 26 फेऱयांची भर पडली. या फेऱयांमध्ये मध्य रेल्वेवरील मुख्य मार्गाबरोबरच हार्बर, ट्रान्स हार्बरचाही समावेश होता. हार्बरचा गोरेगावपर्यंत विस्तार केल्यानंतर 42 फेऱयांचा विस्तारही करण्यात आला. त्यानंतर 1 नोव्हेंबरपासून पश्चिम रेल्वेने त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या हार्बरवरील अंधेरीपर्यंत असलेल्या लोकल फेऱ्यांचाही गोरेगावपर्यंत विस्तार केला. मध्य रेल्वेच्या नेरुळ-उरण मार्गावरील पहिला टप्पा बेलापूर-नेरूळ-खारकोपर मार्गही 12 नोव्हेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत आला. सध्या मध्य रेल्वेच्या एकूण फेऱयांची संख्या 1772 इतकी झाली आहे.
उत्पन्नात 22 कोटींची वाढ
एप्रिल ते नोव्हेंबर 2018 पर्यंत मध्य रेल्वेच्या एकूण प्रवासी संख्येत 1 कोटी 68 लाख प्रवाशांची भर पडली आहे. गेल्या वर्षी याच काळात 95 कोटी 73 लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. हीच संख्या यंदा आठ महिन्यांत 97 कोटी 41 लाखांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे दररोजची प्रवासी संख्या जवळपास 74 हजारांनी वाढली. वाढलेल्या प्रवासी संख्येमुळे मध्य रेल्वेच्या महसुलातही भरघोस वाढ झाली. गेल्या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत 700 कोटी रुपयांपर्यंत असलेल्या महसुलात यंदा 22 कोटी रुपयांनी वाढ झाली. म्हणजे मध्य रेल्वेचे उत्पन्न सव्वातीन टक्के वाढले आहे.




























































