रशियन सैन्यात एचआयव्ही संसर्ग 20 ते 40 टक्के वाढला;  युक्रेन युद्धादरम्यान रशियासमोर नवे संकट

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान आता एक नवीन बातमी समोर येत आहे. रशियन सैन्यात एचआयव्ही संसर्ग दिवसागणिक वाढत आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासाठी ही फार चिंतेची बाब ठरत आहे. रशियामध्ये जगातील सर्वाधिक एचआयव्ही बाधितांचे प्रमाण जास्त आहे. त्यात आता युक्रेन युद्धामुळे ही परिस्थिती आणखी भयावह झाली आहे. अहवालांनुसार युद्ध सुरू झाल्यापासून रशियन सैनिकांमध्ये एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण 20 ते 40 पट वाढले आहे.

एचआयव्ही ग्रस्त सैनिकांच्या वाढीची अनेक कारणे असू शकतात. पहिले म्हणजे युद्धाच्या तणावपूर्ण वातावरणात सैनिकांची मानसिक स्थिती अत्यंत दबावाखाली असते. सध्याच्या घडीला सैनिकांमध्ये वाढत असलेले असुरक्षित लैंगिक संबंध, तसेच ड्रग्जचे वाढते व्यसन यामुळे संसर्गाचा धोका हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

युक्रेन सीमेवर असलेल्या रशियन लष्करी तळांमध्ये आरोग्य सेवांची मोठी कमतरता आहे. कंडोमसारख्या मूलभूत साधनांचा अभाव, कोणत्याही सुरक्षा उपायांशिवाय फील्ड हॉस्पिटलमध्ये संक्रमित सैनिकांवर उपचार आणि निर्जंतुकीकरणाचा अभाव हे एचआयव्ही संसर्ग वेगाने पसरण्यास कारणीभूत आहे.

फर्स्टपोस्टच्या दाव्यानुसार, अनेक संक्रमित सैनिकांना आपत्कालीन परिस्थितीत उपचारांसाठी दाखल केले जाते. परंतु वेळ आणि संसाधनांच्या कमतरतेमुळे तेथे खबरदारी घेतली जात नाही. यामुळे संसर्ग आणखी वेगाने पसरत आहे. अहवालात आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. रशिया तुरुंगांमधून थेट सैनिकांची भरती करत आहे. यामध्ये अनेक एचआयव्ही पॉझिटिव्ह कैदी देखील आहेत.

लष्करी संख्या वाढवण्याच्या प्रयत्नात हे पाऊल उचलले गेले आहे. परंतु त्याचे दीर्घकालीन परिणाम गंभीर असू शकतात. युक्रेनियन अधिकाऱ्यांच्या मते, रशियन सैनिकांमध्ये नवीन भरती होणाऱ्यांपैकी किमान 20% एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत. त्याचा परिणाम केवळ लष्करी क्षेत्रापुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण आरोग्यसेवा व्यवस्थेवर परिणाम करण्याची शक्ती आहे. युद्धकाळातील रणनीती आणि मानवी हक्कांमधील हा एक नवीन संघर्ष आहे.