रशियाची कोरोना लस दोन दिवसात येणार…असा करणार कोरोनाचा मुकाबला

1833

कोरोनावर लस बनवण्यासाठी अनेक देशांचे प्रयत्न सुरू असताना रशियाने त्यात आघाडी घेतली आहे. येत्या दोन दिवसात रशियाच्या कोरोना लसीची नोंदणी होणार आहे. या आठवड्यात कोरोनाच्या लसीची नोंदणी करण्यात येईल, असे रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. ही जगातील कोरोनावरील पहिलीच लस आहे. कोरोनाविरोधातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ही लस रशियातील प्रत्येक नागरिकाला देण्यात येणार आहे. सप्टेंबरपासून या लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू होणार आहे. तसेच ऑक्टोबरमध्ये ही लस रशियात सर्वांना देण्यासाठी सुरुवात होणार आहे.

मास्कोतील गामलेया रिसर्च इन्स्टिट्यूटने ही लस एडोनोव्हायरसच्या आधारे बनवली आहे. त्याचे पार्टिकल या लसीत वापरण्यात आले आहे. या लसीतील पार्टिकल स्वतःची कॉपी बनवू शकत नाही, असे या लसीच्या संशोधनात असलेल्या डॉ. अलेक्झांर यांनी स्पष्ट केले. ही लस संशोधनात असलेल्या सर्व संशोधकांनाही देण्यात आली असून त्याचे कोणतेही दुष्परिणाम नसल्याचे अलेक्झांडर यांनी सांगितले. ही लस दिल्यानंतर काही जणांना ताप येऊ शकतो, असेही ते म्हणाले. लस दिल्यानंतर शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याने काही जणांना ताप येण्याची शक्यता असल्याने त्यावर पॅरासिटामॉल घेण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. लस दिल्यानंतर शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने कोरोनापासून बचाव होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आता संशोधकांना ही लस देण्यात आली असून या महिन्यापासून आरोग्य सेवकांनाही लस देण्यात येणार आहे, असे रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराशको यांनी म्हटले आहे. कोरोनाविरोधातील जगातील पहिली लस बनवल्याचा दावा रशियाने केला असला तरी जागतिक आरोग्य संघटना आणि काही संशोधकांनी लसीच्या प्रभावाबाबत साशंकता व्यक्त केली आहे. तसेच लसीबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा डेटा पुरवण्यात आला नसल्याचेही डब्लूएचओने म्हटले आहे. त्यामुळे या लसीच्या प्रभावाबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या