रशियाची अणुयुद्धाची तयारी, न्यूक्लिअर डेटरंट फोर्सला सज्ज राहण्याचे पुतीन यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युक्रेनमध्ये घुसलेल्या रशियन सैनिकांवर जोरदार प्रतिहल्ले होत आहेत. रशियन फौजा अधिक आक्रमक होत युक्रेनमध्ये घुसल्या आहेत. मात्र युक्रेनचे सैनिक मागे न हटता त्यांना प्रतिकार करत आहेत. युक्रेन लष्कराने छुपे हल्ले करून रशियन फौजांना हैराण केले आहे. रशियाचे अनेक रणगाडेही नष्ट केले आहेत. रशियाची चर्चेची ऑफरही युक्रेनने आज फेटाळून लावली. दुसरीकडे जर्मनी व अन्य देशांनी रशियावर निर्बंध लादायला सुरुवात केली आहे. त्यामुळे रशिया अधिकच संतापला आहे. रशियाने आता अणुहल्ल्याची तयारी केली आहे. पुतीन यांनी आपल्या न्यूक्लिअर डेटरन्स फोर्सला ‘ऍलर्ट’ राहण्याचे आदेश दिले आहेत. अणुहल्ला झाल्यास त्याचे भयंकर परिणाम युक्रेनलाच नक्हे तर आशिया खंडाला भोगावे लागणार आहेत.

युक्रेनने रशियासोबत चर्चा करण्यास सहमती दर्शवली असल्याचा मोठा दावा रशियाच्या स्टेट मीडियाने केला आहे. युक्रेनचे एक शिष्टमंडळ बेलारूसला रवाना झाले आहे. झेलेन्स्की यांनी बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे समजते.

यापूर्वी ‘‘आम्ही रशियासोबत चर्चेसाठी तयार आहोत; पण बेलारूसमध्ये चर्चा करण्याची आमची तयारी नाही. वॉर्सा, ब्रातिस्लाव्हा, बुडापोस्ट, इस्तंबूल, बाकू यापैकी कोणत्याही ठिकाणी चर्चेस तयार आहोत,’’ असे झेलेन्स्की यांनी एका व्हिडीओ मेसेजमध्ये म्हटल्याचे वृत्त आले होते.

पाठ दाखवणार नाही, धैर्य दाखवू!

युक्रेनमध्ये आता जनताच लढाईसाठी रस्त्यावर उतरली आहे. महिला, वृद्ध आणि डॉक्टरांनीही खांद्यावर बंदूक घेतली आहे.
युक्रेनी सैन्याने रशियाला मोठा हादरा दिला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना टिपण्यासाठी रशियाने चेचन स्पेशल फोर्सला धाडले होते. मात्र या फोर्सच्या एका मोठय़ा तुकडीचा युक्रेनी सैन्याने वेध घेतल्याचे वृत्त आहे. कीव्ह शहराच्या ईशान्येकडील होस्टोमेल या शहराजवळ युक्रेनी सैन्याने मिसाइल डागले असून त्यात 56 टँक नष्ट झाले व तुकडीतील मोठय़ा प्रमाणात सैनिक मारले गेल्याचे वृत्त ‘डेली मेल’ने दिले आहे.

पुतीन यांना हादरा

रशियामध्ये युद्धाच्या विरोधात लोकांचे आंदोलन तीव्र झाले आहे. रशियाची राजधानी मॉस्को, सेंट पीटर्सबर्ग आणि इतर शहरांमध्ये शनिवारी लोक रस्त्यावर उतरले आणि घोषणाबाजी केली. यावेळी 460 जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यात मॉस्कोमधील 200 हून अधिक लोकांचा समावेश आहे.

इंटरनॅशनल ज्युडो फेडरेशनने पुतीन यांना अध्यक्षपदावरून हटवले आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे महासंघाने हा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी पोलंड आणि स्वीडनच्या फुटबॉल संघांनी फिफा विश्वचषक 2022 क्वालिफायर सामना रशियाविद्ध खेळण्यास नकार दिला आहे.

4 विमानांतून 1147 जण हिंदुस्थानात परतले

युद्धाच्या चौथ्या दिवशी आज 490 हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना विमानाने रोमानिया आणि हंगेरी मार्गाने मायदेशी सुखरुप परत आणण्यात आले. रोमानियातून शनिवारी रात्री साडेनऊ वाजता एक विमान विद्यार्थ्यांना घेऊन निघाले होते. आज पहाटे तीन वाजता ते दिल्ली येथे पोहोचले. हंगेरीच्या बुडापेस्ट येथूनही एक 240 विद्यार्थ्यांना घेऊन निघालेले विमान रविवारी पहाटे पोहोचले. आतापर्यंत 1147 विद्यार्थ्यांना युक्रेनमधून हिंदुस्थानात परत आणले गेले आहे. विमानात या विद्यार्थ्यांनी ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा दिल्या.

युक्रेनचा दावा

4000 रशियन सैनिक मारले
146 रणगाडे
27 लढाऊ विमाने
26 हेलिकॉप्टर नष्ट