
कोरोना महामारीमध्ये पालकांना ब्लॅकमेल करून अवाचे सवा फी भरण्यासाठी त्यांच्यावर दडपण आणणाऱ्या सानपाडा येथील रायन इंटरनॅशनल स्कूल या खासगी शाळेला शिक्षण विभागाने जोरदार दणका दिला आहे. सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्या, अन्यथा कडक कारवाई केली जाईल, अशी नोटीस जिल्हा शिक्षण अधिकाऱयांनी या शाळेच्या व्यवस्थापनाला दिली आहे.
विद्यार्थी आणि पालकांची छळवणूक करण्यासाठी नेहमीच आघाडीवर असलेल्या सानपाडा येथील रायन इंटरनॅशनल स्कूलने फी न भरणाऱया विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद केले. सध्या कोरोना महामारीमुळे शाळेचे वर्ग भरत नाहीत. इतर ऍक्टिव्हिटीही बंद आहेत. तरीही शाळा व्यवस्थापनाने स्विमिंग टँक, प्रयोगशाळा, ग्रंथालय, स्पोर्ट आदींची फी भरण्यासाठी पालकांवर दबाव आणला. त्याला पालकांनी विरोध केल्यानंतर त्यांनी थेट विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद केले. हा प्रकार शिवसेना उपशहरप्रमुख सोमनाथ वास्कर आणि माजी नगरसेविका कोमल वास्कर यांना समजल्यानंतर त्यांनी शाळेवर कारवाई करण्याची मागणी केली. त्याची गंभीर दखल शिक्षण विभागाने घेतली असून जिल्हा शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी याप्रकरणी शाळेला खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षण विभागाच्या या कारवाईमुळे अवाचे सवा फी उकळणाऱया खासगी शिक्षण संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे.
शाळेची मनमानी सुरूच
शिक्षण विभागाने आदेश काढल्यानंतरही शाळेने आपली मनमानी सुरूच ठेवली आहे. फी भरल्याशिवाय विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण चालू करायचे नाही, या भूमिकेवर शाळेचे व्यवस्थापन अडून राहिले आहे. त्यामुळे पालकांनी पुन्हा आंदोलन करून व्यवस्थापनाच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवली.





























































