सहा वर्षांच्या रियान कुमारचा जागतिक विक्रम; नॉनस्टॉप 100 किलोमीटर सायकलिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेन्नईच्या रियान कुमार या सहा वर्षीय मुलाने थक्क करणारी कामगिरी केली आहे. रियानने ‘नॉनस्टॉप’ 100 किलोमीटरचे अंतर सायकलवरून पार करून वर्ल्ड सायकलिंग रेकॉर्ड केला आहे. सलग पाच तास 17 मिनिटे आणि 6 सेकंद एवढय़ा वेळात 108.09 किलोमीटर अंतर पार करणारा रियान सर्वात वेगवान आणि सर्वात लहान वयाचा सायकलपटू ठरला.

रियानचे आईवडील नौदलात अधिकारी आहेत. अलीकडेच ते दिल्लीहून चेन्नईत राहायला आले. रियानने आई कमांडर गौरी शर्मा (सेवानिवृत्त) यांच्याकडून प्रेरणा घेतली. रियान सांगतो, सायकलिंग करताना मला सर्वाधिक आवडणारी गोष्ट म्हणजे वेग. मी आठवडय़ातून तीन दिवस त्याचा सराव करतो. अन्य दिवशी स्थिर सायकलिंग करतो आणि व्यायाम करतो.

चेन्नईतील सराईत सायकलस्वारांमध्ये रियान खूप लोकप्रिय आहे. त्याच्या सायकलिंग वेडाचे आणि मेहनतीचे सर्वच कौतुक करतात.  इयत्ता दुसरीत शिकणाऱया रियानला फ्रान्सच्या 200 किलोमीटर ब्रेवेट्स डी रॅन्डोन्यूर्स स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. ते त्याचे स्वप्न आहे. रियानची आई गौरी म्हणाल्या, आम्हाला लॉकडाऊनच्या काळात सायकलिंगकडे अधिक लक्ष देता आले. रियानमुळे मी सकाळी लवकर उठायला लागले. अर्थात आम्ही आठवडय़ातून तीन दिवस फक्त सायकलिंग करायचो. रियान यू टय़ूबवर कार्टून नव्हे तर ग्लोबल सायकलिंग नेटवर्क बघतो.