SA Vs AUS – दक्षिण आफ्रिकेचा ‘लुंगी’ डान्स! ऑस्ट्रेलियाचा फडशा पाडत पाकिस्तानचा विक्रम केला उद्ध्वस्त, पहिला क्रमांक पटकावला

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 84 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने 2-0 अशा फरकाने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने केलेल्या घातक गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाची भंबेरी उडालेली पाहायला मिळाली. पठ्ठ्याने ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत धाडला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ आव्हानाचा पाठलाग करताना 193 धावांवरच बाद झाला.

दक्षिण आफ्रिकेचा हा विजय ऐतिहासिक ठरला आहे. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने ही मालिका सुद्धा आपल्या खिशात घातली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका आता ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक वेळा वनडे मालिका जिंकणारा विदेशी संघ ठरला आहे. यापूर्वी पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेने 2-2 वेळा मालिका विजय साजरा केला होता. परंतु आता दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला पिछाडीवर टाकत तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियामध्येच ऑस्ट्रेलियाचा वनडे मालिकेत पराभव केला आहे.