सामना अग्रलेख – हे वर्ष कधी मावळेल? ‘टेबल टॉप’ अपघात; कॅ.साठेंचे बलिदान!

3956

2010 साली एअर इंडिया एक्प्रेसच्या दुबईतून आलेल्या आणि मंगलोर येथील विमानतळाच्या ‘टेबल टॉप’ धावपट्टीवर ‘लॅण्ड’ करणाऱ्या विमानाच्या पायलटचा रनवेच्या लांबीचा अंदाज चुकला होता व ते भिंत ठोकरून दरीत कोसळले होते. हा भयंकर अपघात होता. त्याच पद्धतीचा अपघात आता कोझिकोडे धावपट्टीवर झाला. मंगलोरचे विमानही दुबईतूनच आले व कोझिकोडेचे विमानही दुबईतूनच आले हा एक विचित्र योगायोग ठरला. कॅ. दीपक साठे यांनी शर्थ केल्यामुळे ‘मंगलोर’प्रमाणे मोठी मनुष्यहानी झाली नाही. कॅ. साठे यांचा त्याग व शौर्य विसरता येणार नाही. 2020 साल हे माणसांचे बळी घेणारे, समाजाला, देशाला वेदना देणारे वर्षे आहे. त्या वेदनेत कोझिकोडे अपघाताची भर पडली. हे वर्ष लवकरात लवकर मावळले तर बरे होईल!

केरळमधील विमान अपघात सुन्न करणारा आहे; पण विमानाचे कॅप्टन दीपक साठे यांचे शौर्य थक्क करणारे आहे. कोझिकोडे विमानतळावर शुक्रवारी संध्याकाळी दुबईहून आलेले एअर इंडियाचे विमान कोसळले नाही तर धावपट्टीवर उतरताना घसरले व अपघात झाला. विमान अपघात हा नेहमी भयंकरच असतो. अनेकदा आकाशात विमानांची टक्कर होते, आकाशात विमानास आग लागते व ते कोसळते. कोझिकोडे धावपट्टीवर एअर इंडियाचे विमान फक्त 30 फूट उंचावरून पडले. त्यात दोन वैमानिकांसह 18 प्रवाशांना प्राण गमवावे लागले. विमानात एकूण 170 प्रवासी होते. वंदे भारत अभियानादरम्यान दुबईत अडकलेल्या हिंदुस्थानींना घेऊन हे विमान आले व प्रत्यक्ष भारतभूमीचे दर्शन खिडकीतून घेत असतानाच हा अपघात झाला. इतक्या भयंकर अपघातात 18 जण मरण पावले; पण बहुसंख्य प्रवाशांचे प्राण वाचले ते विमानाचे पायलट कॅ. दीपक साठे यांच्या समयसूचकतेमुळे. किमान दीडशे प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. वैमानिक साठे यांनी प्राणाची बाजी लावून जीवितहानी कमीत कमी केली. साठे हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. त्यांचे एक बंधू कारगिल युद्धात देशाच्या कामी आले. वडील ब्रिगेडियर साठे यांनीसुद्धा लष्करात राष्ट्रसेवा केली. स्वतः कॅ. साठे हे हवाई दलात होते व त्यांनी राष्ट्राच्या सुरक्षेसंदर्भात अनेक अवघड जबाबदाऱया पार पाडल्या आहेत. अशा वैमानिकाचा कर्तव्य बजावताना मृत्यू व्हावा याचे दुःख सगळय़ांनाच झाले आहे. साठे हे अनुभवी पायलट होते. त्यांचा हवाई सेवेतील अनुभव दांडगा होता व त्याबद्दल राष्ट्रपतींनी सुवर्णपदक देऊन त्यांचा गौरव केला होता. तरीही ते विमान अपघातात बळी पडले. कारण केरळात

निसर्ग कोपला

आहे. मुसळधार पाऊस, वादळाचा तडाखा बसला आहे. ठिकठिकाणी भूस्खलन सुरू आहे. अशा वादळात कॅ. साठे विमान धावपट्टीवर घेऊन आले. सुरक्षित विमान उतरवण्याचा त्यांचा प्रयत्न दोन वेळा फसला. तिसऱ्या वेळी आत्मविश्वासाने त्यांनी ‘लॅण्डिंग’ केले. विमान उतरत असताना धावपट्टीवरून घसरले. विमानाने धावपट्टी सोडली आणि कुंपणाच्या भिंतीवर आदळून 30 फूट दरीत कोसळले. आता असेही समोर आले की, विमानात तांत्रिक बिघाड झाले होते. विमानाचे लॅण्डिंग गिअर बंद पडले होते. त्यामुळे मोठा अनर्थ टाळण्यासाठी विमानाच्या तीन फेऱ्या मारून विमानात असलेले इंधन संपवून मगच ‘लॅण्डिंग’चा निर्णय कॅ. साठे यांनी घेतला. त्यामुळे विमानाने अपघात झाल्यावर पेट घेतला नाही. कॅ. साठे यांनी हे सर्व अत्यंत कौशल्याने व चातुर्याने केले. विमान तीन वेळा आपटले, दोन तुकडे झाले, पण आग लागली नाही. ज्या विमानतळावर अपघात झाला ती कोझिकोडेची धावपट्टी ‘सपाट’ जागेत नाही. ज्याला ‘टेबल टॉप’ म्हणावे लागेल अशा उंच जागेवर या धावपट्टीचे निर्माण केले आहे. त्यामुळे धावपट्टीसाठी विस्तीर्ण मोकळी जागा नाही. येथून विमान उडवणे व उतरवणे हे विशेष कौशल्याचे आहे. त्यात पाऊस, वादळ वगैरेंचा फटका बसला तर कठीण होते. शुक्रवारी संध्याकाळी नेमके तेच घडले. काही वर्षांपूर्वी मंगलोरच्या विमानतळावर झालेला अपघात याच प्रकारचा होता. विमान उतरताना ते घसरून पुढे गेले व सुरक्षा कठडा तोडून दरीत कोसळले. त्यात 190 प्रवासी मरण पावले. मंगलोरची धावपट्टीही ‘टेबल टॉप’ प्रकारचीच होती.

कोझिकोडेची धावपट्टीसुद्धा

‘टेबल टॉप.’ जगभरातील अनेक विमानतळे अशा जागांवर आहेत. नेपाळ, भूतान, युरोपातील काही प्रदेशांत डोंगरदऱया, समुद्रात धावपट्टय़ा निर्माण केल्या आहेत. काही ठिकाणी भरसमुद्रात धावपट्टय़ा निर्माण केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय हवाई नियम कायद्यानुसार धावपट्टीची लांबी नऊ हजार फूट असायलाच हवी, पण आपल्या देशात अलीकडे जी विमानतळे, धावपट्टय़ा निर्माण केल्या त्या नऊ हजार फुटांपेक्षा कमी लांबीच्या आहेत. पाटणा, जम्मू, मंगलोर, कालिकत, ऐझवाल, कुलू, लेह, पोर्ट ब्लेअर, आगरतळा येथील धावपट्टय़ांच्या बाबतीत संशय आहे. महाराष्ट्रात लातुरातील विमान धावपट्टीवर तर सुरक्षा भिंतच नाही. लोकांच्या व राजकारण्यांच्या हट्टापायी धावपट्टय़ा बनवायच्या व नंतर रामभरोसे सोडून द्यायच्या. मंगलोर विमानतळातील धावपट्टी हे एक रहस्यच आहे. हासुद्धा ‘टेबल टॉप रनवे’ आहे. थोडीशी चूक झाली तरी अनर्थ ओढवू शकेल. रनवेच्या ‘लांबी’चे गणित चुकवून येथे टेकऑफ, लॅण्डिंग केले तर थेट स्वर्गाचा रस्ता असे या एअरपोर्टबाबत तज्ञांचे ठाम मत आहे. 2010 साली एअर इंडिया एक्प्रेसच्या दुबईतून आलेल्या आणि मंगलोर येथील विमानतळाच्या ‘टेबल टॉप’ धावपट्टीवर ‘लॅण्ड’ करणाऱया विमानाच्या पायलटचा रनवेच्या लांबीचा अंदाज चुकला होता व ते भिंत ठोकरून दरीत कोसळले होते. हा भयंकर अपघात होता. त्याच पद्धतीचा अपघात आता कोझिकोडे धावपट्टीवर झाला. मंगलोरचे विमानही दुबईतूनच आले व कोझिकोडेचे विमानही दुबईतूनच आले हा एक विचित्र योगायोग ठरला. कॅ. दीपक साठे यांनी शर्थ केल्यामुळे ‘मंगलोर’प्रमाणे मोठी मनुष्यहानी झाली नाही. कॅ. साठे यांचा त्याग व शौर्य विसरता येणार नाही. 2020 साल हे माणसांचे बळी घेणारे, समाजाला, देशाला वेदना देणारे वर्षे आहे. त्या वेदनेत कोझिकोडे अपघाताची भर पडली. हे वर्ष लवकरात लवकर मावळले तर बरे होईल!

आपली प्रतिक्रिया द्या