सामना अग्रलेख : बिग बझार!

3372
voter-line-maharashtra

आमदारकीच्या खुर्च्यांसाठी अनेकांचे गाजेवाजे बंद झाले व चुपचाप ‘सेल’साठी ते लोकशाहीच्या बिग बाजारमध्ये सध्या उभे राहिले आहेत. बिग बाजारात ज्याप्रमाणे विविध दुकाने व स्टॉल्स असतात तसे निवडणुकीत आता दिसू लागले आहेत. मुख्यमंत्र्यांनी बिग बाजारात फक्त काँग्रेस-राष्ट्रवादीलाच धक्के दिले असे नाही तर स्वकीयांनाही धक्के देऊन धक्क्याला लावले. महासंग्रामचा बिग बाजार झाल्यावर दुसरे काय होणार?

विधानसभा निवडणुकांचा महासंग्राम सुरू झाला आहे. कुणी त्यास रणधुमाळीदेखील म्हणत असतात, पण जे सध्या चालले आहे तो संग्राम वगैरे नसून त्यास ‘बिग बझार’च म्हणावे लागेल. निवडणुकांचा मोठा होलसेल बाजार भरला आहे. इतका मोठा सेल महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच लागला नव्हता. आता तो लागला याचे श्रेय कोणाला द्यावे? मात्र सब घोडे बारा टके आणि हमाम में सब नंगे असेच असल्याने तेरी भी चूप आणि मेरी भी चूप असेच सगळे सुरू आहे. काल ज्यांच्यावर टीकेचा भडिमार केला त्यांच्याच पालख्या उचलणारे भोई या बिग बाजारात आज दिसत आहेत. कोकणातील नेत्यांनी घाईगडबडीत ‘भाजप’चे अर्ज भरले. नवी मुंबईत मुलाने स्वतःची उमेदवारी पिताश्रींना देणगीदाखल बहाल केली. हे पितृप्रेम भाजपच्या सहवासामुळे मिळाले. एकनाथ खडसे यांना घरी बसवत त्यांच्या कन्येस तिकीट दिले गेले आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे का? ते रहस्यच आहे. तिकडे कुलाब्यात भाजपचे जुनेजाणते राज पुरोहित यांना डावलून कालपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यपालनियुक्त आमदारकी भूषवणारे नार्वेकर हे भाजपचे सन्माननीय उमेदवार बनले आहेत. त्यांचे ‘ससुर’ राष्ट्रवादीत व आता जावई भाजपात म्हणजे बिग बाजारात

दोन्ही बोटे तुपात

असेच चित्र निर्माण झाले आहे. चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर- सांगलीच्या महापुरातून वाहत आले व त्यांचे गलबत पुण्यातील कोथरूड मतदारसंघाला लागले. त्यावरून भाजपच्या विद्यमान आमदारांच्या अश्रूंना महापूर आला. आमदारकीच्या खुर्च्यांसाठी अनेकांचे गाजेवाजे बंद झाले व चुपचाप ‘सेल’साठी ते लोकशाहीच्या बिग बाजारमध्ये सध्या उभे राहिले आहेत. हे चित्र केविलवाणे आहे. गोपीचंद पाडळकर हे आता बारामतीमधून भाजपचे उमेदवार झाले. त्याबद्दल त्यांच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच. धाडस आम्ही या अर्थाने म्हणतो की, कालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपविरुद्ध जोरदार प्रचार केला. ‘‘माझ्या घरातून माझी आई जरी भाजपच्या तिकिटावर उभी राहिली तरी तिला मत देऊ नका. भाजपने धनगरांना फसवलंय,’’ अशी टोकाची भाषा करणारे गोपीचंद हेसुद्धा लोकशाहीच्या बिग बाजारमध्ये घुसले आहेत. बिग बाजारात ज्याप्रमाणे विविध दुकाने व स्टॉल्स असतात तसे निवडणुकीत आता दिसू लागले आहेत. एकनाथ खडसे यांचा स्टॉल या बिग बाजारमध्ये किमान पस्तीस वर्षे होता. यावेळी ते नाहीत. मुख्यमंत्र्यांना प्रत्येक पक्षांतर्गत विरोधक खडय़ासारखा बाजूला काढण्यात यश आले आहे. खडसे यांची

वेदना

समजून घेतली पाहिजे. 2014 साली महाराष्ट्रात ‘युती’ तुटल्याची घोषणा करून शौर्यपदक छातीवर लटकवणारे हेच खडसे होते. 2019 मध्ये खडसे कोठेच नाहीत व त्यांना पूर्णपणे दूर केले गेले आहे. ‘‘मी का नको ते अगोदर सांगा,’’ असा व्याकुळ करणारा सवाल श्री. खडसे यांनी विचारला आहे. राजकारण हे किती बेभरवशाचे आहे याचा अनुभव खडसे घेत आहेत. 2014 मध्ये खडसे यांच्या हातात बरेच काही होते. आज वेदना, संताप, हतबलता व जळफळाटाशिवाय त्यांच्याजवळ काहीच नाही. ‘युती’ तोडण्याची घोषणा करणारे खडसे यांच्यावर आज संन्यास घेण्याची वेळ आली, पण 2019 ला ‘युती’ झाली आहे. या युतीत खडसे नाहीत. पाय जमिनीवर ठेवा व शिवसेनेच्या बाबतीत आडवे-तिडवे जाऊ नका हाच राजकारणातील या ‘उलटपुलट’चा धडा आहे. शेवटी जे शिवसेनेला आडवे गेले ते आतले असोत नाही तर बाहेरचे, त्यांना शेवटी स्वाभिमान गुंडाळून लाचारीचेच जिणे जगावे लागले. ही श्रद्धा म्हणा नाही तर अंधश्रद्धा, पण सत्य तर आहेच. मुख्यमंत्र्यांनी बिग बाजारात फक्त काँग्रेस-राष्ट्रवादीलाच धक्के दिले असे नाही तर स्वकीयांनाही धक्के देऊन धक्क्याला लावले. महासंग्रामचा बिग बाजार झाल्यावर दुसरे काय होणार?

आपली प्रतिक्रिया द्या