सामना अग्रलेख – अमित शहांचे इतिहास, भूगोल आणि सामान्य ज्ञान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
saamana editorial on amit shahs statement about communist ideology

लोकशाहीत विरोधकांची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे, पण अमित शहा ही भूमिका मान्य करायला तयार नाहीत. ते अज्ञान पाजळत आहेत व सत्य लपवत आहेत. जगातून कम्युनिस्ट संपले हे त्यांचे विधानही अज्ञानाचा कडेलोट आहे. त्यांनी माओवादी (नक्षल) चळवळीवर हल्ला केला व त्यांना संपवले. याचा अर्थ जगातून कम्युनिस्ट संपले असे म्हणणे म्हणजे चीन, व्हिएतनाम, रशिया, क्युबा अशा देशांना नाकारणे. काँग्रेसला नाकारणे म्हणजे देशाचा स्वातंत्र्य लढा व विकासाच्या गतीला नाकारण्यासारखे आहे. अमित शहा यांची डिग्री तपासावी लागेल. भूगोल, इतिहास, सामान्य ज्ञान आणि राजकारण यांचे किमान वाचन त्यांनी करावे हीच अपेक्षा!

मोदी किंवा शहांचे राजकारण हे ‘याला संपवू’ आणि ‘त्याला संपवू’ याच खूनशी विचारधारेचे आहे. घडविण्यापेक्षा बिघडवणे हेच त्यांचे राजकीय ध्येय असते. पुन्हा ज्ञानाच्या बाबतीत वरचा मजला रिकामा असल्याने सत्याचा आधार, संदर्भ, इतिहास याबाबत ठणठण गोपालाच आहे. आताही गृहमंत्री अमित शहा हे केरळातील प्रचार सभेत गेले व म्हणाले, ‘‘जगातून कम्युनिस्ट आणि देशातून काँग्रेस जवळपास संपली आहे.’’ शहा यांचे विधान फसवे आहे. मोदी हे 12 वर्षे सत्तेत आहेत. ‘काँग्रेसमुक्त भारत’ ही त्यांची राजकीय घोषणा होती. प्रत्यक्षात मोदी यांना काँग्रेसला नष्ट करता आले नाही. उलट काँग्रेस पक्षातील अनेक नामचीन, भ्रष्टाचारी लोकांना स्वतःच्या पक्षात घेऊन ‘काँग्रेसयुक्त भाजप’ची निर्मिती या लोकांनी केली. गेल्या बारा वर्षांतील प्रत्येक निवडणुकीत मोदी-शहांना काँग्रेस विरोधातच बोंबा माराव्या लागतात. काँग्रेस जिवंत असल्याचेच हे लक्षण आहे. प्रत्येक निवडणुकीत ते काँग्रेसला उखडण्याची भाषा करतात, पण ते काही त्यांना जमलेले दिसत नाही. लोकसभेत काँग्रेसचे शंभरेक खासदार निवडून आले व राहुल गांधी विरोधी पक्षनेते म्हणून मोदींच्या अकार्यक्षमतेचे धिंडवडे काढत आहेत. राहुल गांधींच्या भीतीमुळे पंतप्रधान मोदी यांनी संसदेत येण्याचे टाळले आहे हे काय काँग्रेस संपल्याचे लक्षण आहे? काँग्रेस स्वातंत्र्य लढ्यातील संघर्ष करणारा पक्ष आहे. याबाबतीत काँग्रेसचे स्थान ऐतिहासिक आहे. काँग्रेसने मोठा काळ भारतावर राज्य केले व आज भाजप ज्या विकासाची फळे चाखत आहे ती सर्व फलदायी झाडे

काँग्रेसच्याच पंतप्रधानांनी

लावली. काँग्रेस आज सत्तेवर नाही व अनेक राज्यांत त्यांचा पराभव झाला. भाजप सध्या कशा प्रकारे विजय मिळवत आहे याचे सत्य कथन ‘सीतापती’ परकला प्रभाकर यांनी केले आहे. ईव्हीएम, निवडणूक आयोगाची साथ नसेल तर भाजपचा दारुण पराभव होईल. सध्याचे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी संपूर्ण निवडणूक आयोग भाजपच्या दावणीला बांधला आहे. हे चित्र लोकशाहीसाठी भयंकर आहे. कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तेलंगणा राज्यांत काँग्रेस सत्तेवर आहे व अन्य राज्यांत प्रभावी विरोधक आहे. त्यामुळे काँग्रेस जवळपास संपली हे विधान राजकीय अतिशयोक्तीचे आहे. असे विधान म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे. 2024 च्या निवडणुकीत भाजपने बहुमत गमावले ते काँग्रेसने दिलेल्या धक्क्यामुळे. 2029 च्या लोकसभा निवडणुकांत भाजपचे काय होईल ते सांगता येत नाही. एकेकाळी भाजप हा पक्षही संपलाच होता. त्यांचे देशभरातून फक्त दोन खासदार निवडून आले, पण श्रीरामाच्या कृपेने व ईव्हीएम, पैसा, सत्ता या माध्यमांतून ते सत्तेवर टिकून आहेत. भारतात काँग्रेस संपली असे कसे म्हणता येईल? उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी, प. बंगालात तृणमूल काँग्रेस, आंध्रात वाय.एस.आर. पक्ष, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, तेलंगणात बी.आर.एस. असे अनेक पक्ष काँग्रेसच्याच पोटातून बाहेर आले व भाजपविरोधी भूमिका घेऊन लढत आहेत. लोकशाहीत विरोधकांची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे, पण अमित शहा ही भूमिका मान्य करायला तयार नाहीत. ते

अज्ञान पाजळत

हेत व सत्य लपवत आहेत. जगातून कम्युनिस्ट संपले हे त्यांचे विधानही अज्ञानाचा कडेलोट आहे. जगात भारतीय जनता पक्ष हा केवळ एकाच देशात आहे, पण अजूनही सहा देश पूर्णपणे कम्युनिस्ट आहेत. कम्युनिस्ट विचारधारेशी आमचे मतभेद असू शकतात, पण मार्क्स, माओ, लेनीन या डाव्या विचारसरणीचा मोठा प्रभाव जगावर आहे. चीन ही जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. तेथे कम्युनिस्ट पक्ष 90 वर्षांहून अधिक काळ सत्तेत आहे. व्हिएतनाम, क्युबा, लाओस, उत्तर कोरिया येथे कम्युनिस्ट राजवटी आहेत व रशियातही कम्युनिस्ट क्रांती संपलेली नाही. युरोप, लॅटिन अमेरिका, आशियातील अनेक देशांत, नेपाळातही कम्युनिस्टांची सरकारे येत-जात असतात. भारतातील केरळात बराच काळ कम्युनिस्ट राजवट आहेच. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात असंख्य कम्युनिस्ट क्रांतिकारक होते, पण या संग्रामात आजच्या भाजप विचारसरणीचे लोक कोठेच नव्हते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ‘कॉम्रेड’ मंडळी सहभागी होती, पण भाजपचे पूर्वज नव्हते. अमित शहांचे ज्ञान तोकडे आहे. त्यांनी माओवादी (नक्षल) चळवळीवर हल्ला केला व त्यांना संपवले. याचा अर्थ जगातून कम्युनिस्ट संपले असे म्हणणे म्हणजे चीन, व्हिएतनाम, रशिया, क्युबा अशा देशांना नाकारणे. काँग्रेसला नाकारणे म्हणजे देशाचा स्वातंत्र्य लढा व विकासाच्या गतीला नाकारण्यासारखे आहे. अमित शहा यांची डिग्री तपासावी लागेल. भूगोल, इतिहास, सामान्य ज्ञान आणि राजकारण यांचे किमान वाचन त्यांनी करावे हीच अपेक्षा!