सामना अग्रलेख – देवदिवाळी!

5020

हिंदूंची श्रद्धा आणि विश्वास यामुळे श्री प्रभू रामांचा जन्म अयोध्येत झाला हे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले. पुरातत्व विभागाचे सर्व दावे कोर्टाने मान्य केले. मशिदीची निर्मिती मंदिर उद्ध्वस्त करून करण्यात आली हे पुरातत्व खात्याला सिद्ध करता आले नाही हे खरेच, पण मशीद अयोध्येत रिकाम्या जागी बांधली होती, तसेच मशिदीखालची संरचना इस्लामिक नव्हती तर हिंदू होती हे न्यायालयाने स्वीकारले. राम अयोध्येत पोहोचले तेव्हा दिवाळी साजरी झाली. आज रामास त्याचे जन्मस्थान पुन्हा मिळाले म्हणून देवदिवाळी साजरी करूया!

प्रभू श्रीराम अयोध्येतच जन्मले का हो? या खटल्याचा ऐतिहासिक निकाल लागला आहे. प्रभू श्रीराम अयोध्येतच जन्मास आले. तेच अयोध्येचे स्वामी आहेत व जिथे ते जन्मास आले त्या जागेवरच रामाचे भव्य मंदिर उभारले जाईल, असा निर्णय देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेच दिला आहे. पांडवांनी कौरवांवर विजय मिळवला त्याच प्रकारचा हा विजय आहे. अयोध्येत राममंदिर व्हावे यासाठी ज्या शेकडो रामभक्तांनी, करसेवकांनी बलिदान दिले त्यांच्या संघर्षाचा हा विजय आहे. संपूर्ण देशाचेच लक्ष या निर्णयाकडे लागले होते. सर्वोच्च न्यायालयाचे खास खंडपीठ अयोध्या प्रकरणासाठी स्थापन झाले. त्यांनी गेले काही महिने याप्रकरणी सर्व पक्षकारांच्या बाजू रोजच्या रोज ऐकल्या व शेवटी निर्णय दिला की, ‘अयोध्येतील वादग्रस्त जागा हिंदूंचीच.’ या एका वाक्याने गेली अनेक दशके सुरू असलेल्या रामजन्मभूमी व बाबरी वादावर कायमचा पडदा पडला आहे. मुस्लिमांना अयोध्येत पाच एकर वेगळी जागा मिळेल. त्यावर त्यांनी मशीद उभारावी, असेही सुप्रीम कोर्टाने सांगितले. हा निकाल सगळय़ांनी स्वीकारावा. देशात शांतता राखावी हेच राष्ट्रहित आहे. मुसलमानांनी शांतता राखावी असे जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा हिंदूंनीही संयम पाळावा आणि विजयाचा उन्माद दाखवू नये असेही आम्हाला अपेक्षित असते. या प्रश्नासाठी सातत्याने रक्तरंजित संघर्ष झाला. हिंदू-मुसलमान अशा दोन्ही बाजूंनी शेकडो जणांनी प्राण दिले आहेत. आज हे सर्व थांबायला हवे. भूतकाळ विसरावा, उज्ज्वल भविष्याचा विचार

दोन्ही बाजूंनी

करावा. एक मोठा कालखंड या संघर्षात निघून गेला. अयोध्या निर्विवाद प्रभू श्रीरामाचीच हे अधोरेखित असताना परक्या आक्रमणकारी बाबरासाठी हे सर्व घडले. कोण हा बाबर? त्याचा हिंदुस्थानशी संबंध काय? हे प्रश्न सध्याच्या मुस्लिम धर्मांधांनी स्वतःलाच विचारायला हवे होते. बाबर हा अफगाणिस्तानातून येथे आक्रमक म्हणून आला व हिंदू संस्कृतीचा विध्वंस करीत सुटला. त्यात त्याने रामजन्मभूमीचाही विध्वंस केला. तेथे काही लोकांनी बाबराच्या नावाने मशीद उभारली. अर्थात याच बाबराचे जे थडगे आज अफगाणिस्तानात आहे त्या थडग्याची अवस्था बिकट आहे. त्या बाबराच्या मशिदीसाठी येथील मुसलमान वाद घालतात हे आश्चर्यकारक आहे. बाबर हा कुणी मुल्ला, मौलवी, सूफी संत नव्हता. तो एक रक्तपिपासू आक्रमक होता. तेव्हा त्याच्या नावाने एखादे धार्मिक स्थळ ज्यांनी निर्माण केले ते सैतानच असावेत. बाबरी मशीद म्हणजे अजमेर शरीफ दर्गा नव्हे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील मशिदीसाठी जी पाच एकर जागा दिली आहे त्यावर उभ्या राहणाऱया मशिदीची ओळख बाबराच्या नावाने असू नये. या देशात अनेक मुसलमान संत, नेते होऊन गेले. त्यांच्या नावाने हे नवे प्रार्थनास्थळ उभे करा. हेच राष्ट्रीय कार्य ठरेल. बाबराच्या खुणा आधी शिवसैनिकांनी मिटवल्या. आता राष्ट्रीय मुसलमानांनीही मिटवाव्यात. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अत्यंत नम्रपणे या निर्णयाचे

स्वागत

केले आहे. अयोध्येचा निकाल देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे, त्या निर्णयाचा आदर करू, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. हा समंजसपणा आहे. हा समंजसपणा ओवेसीसारख्या नेत्यांनी दाखवायला हरकत नव्हती. ‘पाच एकर जमिनीची खैरात नको’ असे ते म्हणतात. आक्रमक बाबराच्या नावाने पाच एकर जमिनीची खैरात देण्याची दिलदारी फक्त हिंदुस्थानच दाखवू शकतो. हा श्रद्धेचा सत्यावर विजय असल्याची बांगही ओवेसी देत आहे. हा श्रद्धेचाच निवाडा आहे व ओवेसी यांच्या तथाकथित ‘सत्या’चे थडगे अफगाणिस्तानात पडले आहे. हिंदूंची श्रद्धा आणि विश्वास यामुळे श्री प्रभू रामांचा जन्म अयोध्येत झाला हे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले. पुरातत्व विभागाचे सर्व दावे कोर्टाने मान्य केले. मशिदीची निर्मिती मंदिर उद्ध्वस्त करून करण्यात आली हे पुरातत्व खात्याला सिद्ध करता आले नाही हे खरेच, पण मशीद अयोध्येत रिकाम्या जागी बांधली होती, तसेच मशिदीखालची संरचना इस्लामिक नव्हती तर हिंदू होती हे न्यायालयाने स्वीकारले. कोणी तिथे नमाज पढत होते हा पुरावा नाही. उलट 1856 पूर्वी त्या वादग्रस्त जागेवर एक चौथरा होता व त्यावर हिंदूंकडून पूजा नियमित होत असून यावर न्यायालयाने पुरावा म्हणून पाहिले. अयोध्येचा राजा राम होता व राम प्रभूस कोर्टाने एक प्रकारे मानले. रामाच्या बाजूने देश उभा राहिला. आज देश जिंकला व अयोध्येत श्रीरामाचे आगमन झाले. राम अयोध्येत पोहोचले तेव्हा दिवाळी साजरी झाली. आज रामास त्याचे जन्मस्थान पुन्हा मिळाले म्हणून देवदिवाळी साजरी करूया!

आपली प्रतिक्रिया द्या