सामना अग्रलेख – भारतीय ‘रेव्ह’ पार्टी!

पुण्यात कधीकाळी संस्कार, संस्कृती व नैतिकतेचे ‘अजीर्ण’ झाले होते. आज नेमके उलटेच घडत आहे. सर्वच बाबतीत वाटोळे झाल्याचे दिसते. भारतीय गुंडा, बलात्कारी पार्टीला नैतिकतेची उबळ आली की, विरोधकांवर धाडी टाकायच्या व आपला नैतिकतेचा कंडू शमवायचा. ज्या प्रकारचे गुंड, भ्रष्ट, अनैतिक लोक भाजपमध्ये घेतले जात आहेत ते पाहता भाजप हीच एक रेव्ह पार्टी बनली आहे व या रेव्ह पार्टीचे सूत्रधार गिरीश महाजन आहेत. देवेंद्र फडणवीस यांना हा माणूस गोत्यात आणू शकतो. सत्तेचे, पैशांचे, अनैतिकतेचे बेफाम वारे या माणसाच्या डोक्यात शिरले आहे. हे घातक आहे!

पुण्यात सध्या सगळेच वाटोळे झाल्याची कबुली पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. हिंजवडीतले ‘आयटी’ पार्क हैदराबाद वगैरे भागात हलवले जात आहे ते सरकारच्या नाकर्तेपणामुळे. त्या विषयावर स्वतंत्रपणे लिहिता येईल, पण दोन दिवसांपूर्वी पुण्यातील एका खासगी जागेत सुशिक्षित, सधन लोकांच्या खासगी पार्टीत पोलीस घुसले व ही पार्टी ‘रेव्ह’ पार्टी असल्याचे जाहीर केले. पुण्याची संस्कृती पूर्ण बदलली आहे. म्हणजे वाटोळे झाले आहे. त्यामुळे कोयता गँग, रेव्ह पार्ट्या, बारमधले धिंगाणे, भररस्त्यावर गुंडागर्दी हे सर्व त्यात आलेच, पण पुण्यातल्या नव्याकोऱ्या रेव्ह पार्टीत ज्या अटका झाल्या, त्यात एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांचा समावेश असल्याने या धाडसत्रास राजकीय महत्त्व प्राप्त झाले. खराडीतल्या एका हॉटेलमधील खोलीत डॉ. खेवलकर व त्यांची मित्रमंडळी जमून पार्टी करीत होते व पोलिसांना त्याबाबत खबर मिळताच पोलीस आत घुसले. या पार्टीत नशेचे पदार्थ, दारू, हुक्का वगैरे सापडले असून डॉ. खेवलकर यांना अटक केली असे एकंदरीत कथानक आहे. खडसे यांच्या जावयास अशा पद्धतीने अटक झाल्याने मंत्री गिरीश महाजन यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहताना दिसला. एव्हरेस्ट शिखर सर करून त्याच्या टोकावर भाजपचा झेंडा लावल्याची खुशी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. यास एक प्रकारची विकृतीच म्हणायला हवी. खडसे हे गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील हनी ट्रॅपवर जोरात बोलत होते. त्यांचा हल्ला थेट महाजन यांच्यावर होता. हनी ट्रॅपचे सूत्रधार महाजन आहेत व त्यांच्या ‘हनी’ प्रकरणाची सीडी ज्यांच्याकडे आहे तो भाजपचा कार्यकर्ता व महाजनांचा दोस्त प्रफुल्ल लोढा सध्या अटकेत आहे. ‘लोढा-महाजन यांच्यातील नाजूक व्यवहाराची चौकशी करा, अनेक धक्कादायक बाबी बाहेर येतील, असे खडसे सांगत असतानाच फडणवीस यांच्या शूर पोलिसांनी वेगळाच ट्रप लावला व खडसे यांच्या जावयांना पकडले. हनी ट्रॅपसारख्या गंभीर प्रकरणावरील

लक्ष उडविण्यासाठी

व खडसे यांना धडा शिकविण्यासाठीच हे नवे प्रकरण घडवले काय? अशी शंका घेण्यास त्यामुळे जागा आहे. गिरीश महाजन हा एक पाताळयंत्री व राक्षसी महत्त्वाकांक्षेचा माणूस आहे. महाजन यांच्या सर्व करामती अमित शहांना माहीत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात महाजन यांना घेऊ नये, असे शहांचे म्हणणे होते. पण हे असले उद्योग करण्यासाठी फडणवीस यांना महाजनांसारखे लोक लागतात. त्यामुळे फडणवीस यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतले, पण त्यांना कोणतेही महत्त्वाचे खाते दिले नाही. महाजन यांनी उत्तर महाराष्ट्रातील सर्व गुंड, भ्रष्टाचारी, बलात्कारी लोकांना भाजपमध्ये सामील करून घेतले. आता भाजप ‘हाऊसफुल्ल’ झाल्याचे त्यांनी जाहीर केले. भाजपची ही अशी दयनीय अवस्था झाली. सर्व गुंडांना, दलालांना घेऊन त्यांना भाजप चालवावा लागतोय. पुन्हा हे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जाऊन नैतिकतेवर प्रवचने देतात. खडसे, भाऊसाहेब फुंडकर, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी अशा लोकांनी महाराष्ट्रात भाजप वाढवला. त्यांनी इतरांचे पक्ष न फोडता, गुंड, बलात्काऱ्यांसाठी लाल गालिचे न अंथरता पक्ष वाढवला; पण महाजन, फडणवीस, रवींद्र चव्हाण वगैरे लोकांना नैतिकतेचे वावडे आहे व पक्ष ‘हाऊसफुल्ल’ करण्यासाठी ते कोणत्याही थराला जात आहेत. स्वतः खडसे यांना मंत्रिमंडळातून नैतिकतेच्या मुद्द्यावरून जावे लागले. भोसरीचे जमीन प्रकरण त्यासाठी उभे केले गेले, पण फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आज जे लोक बसले आहेत, त्यांच्या बाबतीत काय मोठी नैतिकता ओसंडून वाहत आहे? भाजपमध्ये ज्या प्रकारचे लोक आले त्यांचे उद्योग पाहता महाराष्ट्राच्या नैतिकतेची ऐशी की तैशीच झाली आहे. गिरीश महाजन यांच्या कारनाम्यांविषयी काय श्री. फडणवीस यांना माहीत नाही? पोलिसांचा मस्तवाल वापर करून त्यांचे राजकारण सुरू आहे. हाताशी

पोलीस आहेत म्हणून

महाजनसारख्यांचे राजकारण टिकले आहे. खडसे यांच्या जावयास रेव्ह पार्टी प्रकरणात अटक केली. त्याच पद्धतीने नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अमली पदार्थांचा व्यापार करतो म्हणून अटक केली व अनेक महिने तुरुंगात टाकले, पण ज्यास फडणवीसांचे पोलीस व ईडीवाले ‘अमली पदार्थ’ समजत होते, तो सुगंधी तंबाखू होता व त्यावर भारतात बंदी नाही हे उघड झाले. मलिक यांचे जावई नंतर सुटले. शाहरुख खानचा मुलगा आर्यन यालाही अशाच प्रकरणात अडकवून मोठा गाजावाजा केला. हे सर्व प्रकरण खोटे, बनावट ठरले. फडणवीस यांच्या राज्यातील पोलीस व तपास यंत्रणांचे हे प्रताप डोळ्यांसमोर आहेत. भारतातील तपास यंत्रणांना पहलगाममध्ये 26 जणांचा बळी घेणारे अतिरेकी सापडत नाहीत, पण खडसे यांच्या जावयावर चार दिवस ‘वॉच’ ठेवून तथाकथित रेव्ह पार्टी उद्ध्वस्त केली जाते. पोलिसांचे म्हणणे असे की, 41 लाखांच्या मुद्देमालासह अटक झाली. हा मुद्देमाल कोणता, तर संबंधितांचे मोबाईल, त्यांनी वापरलेली वाहने असे धरून हा मुद्देमाल व किंमत दाखवली, पण अमली पदार्थ किती ग्रॅम मिळाले? हे सांगत नाहीत. ही खरेच ‘रेव्ह पार्टी’ असेल तर त्यावर कठोर अशी कायदेशीर कारवाई व्हायला हवी. त्याबाबत दयामाया नाही, पण बनावट प्रकरण निर्माण केले असेल तर काय? पुण्यात अशा पार्ट्यांची स्पर्धा सुरू असते. पुण्यात कधीकाळी संस्कार, संस्कृती व नैतिकतेचे ‘अजीर्ण’ झाले होते. आज नेमके उलटेच घडत आहे. सर्वच बाबतीत वाटोळे झाल्याचे दिसते. भारतीय गुंडा, बलात्कारी पार्टीला नैतिकतेची उबळ आली की, विरोधकांवर धाडी टाकायच्या व आपला नैतिकतेचा कंडू शमवायचा. ज्या प्रकारचे गुंड, भ्रष्ट, अनैतिक लोक भाजपमध्ये घेतले जात आहेत ते पाहता भाजप हीच एक रेव्ह पार्टी बनली आहे व या रेव्ह पार्टीचे सूत्रधार गिरीश महाजन आहेत. देवेंद्र फडणवीस यांना हा माणूस गोत्यात आणू शकतो. सत्तेचे, पैशांचे, अनैतिकतेचे बेफाम वारे या माणसाच्या डोक्यात शिरले आहे. हे घातक आहे!