
भारतात लोकशाही, निवडणूक आयोग, न्याय व्यवस्था पूर्णपणे नग्न करण्याचे काम मोदींच्या अमृत काळात झाले आहे. देशाच्या प्रतिष्ठेला खरा धक्का बसतोय तो इथे. भारत मंडपममधील राजकीय आंदोलन ही लोकशाहीतली एक अर्धनग्न क्रांती आहे. ‘हमाम में सब नंगे होते है’ या म्हणीचा अर्थ पंतप्रधान मोदी यांनी समजून घेतला तर भारत मंडपममधील अर्धनग्न आंदोलनावर ते फुसके फूत्कार सोडणार नाहीत. येथे सगळेच नंगे आहेत. सत्ताधारी, विरोधक, मीडिया, विद्यापीठे वगैरे वगैरे. एकंदरीत प्रे. ट्रम्प यांच्या बरोबर भारताला गुलाम करणारा व्यापार करार करून मोदी सरकार नंगे झाले तरी त्यांना काँगेसवर टीका करावीशी वाटते. ‘कुणी निंदा, कुणी वंदा, काँगेसवर टीका करणे हाच आमचा धंदा.’ मोदीजी, भारताचे वस्त्रहरण सुरू असले तरी इतरांच्या नंगेपणावर बोलत रहा!
पंतप्रधान मोदी यांनी अत्यंत कठोर शब्दांत काँग्रेसवर टीका केली आहे. काँगेसवर टीका करणे हा मोदींचा छंदही आहे आणि धंदाही आहे. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय एआय सोहळ्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन केले. यावर मोदी यांनी काँगेसला ‘नंगे’ वगैरे शब्द वापरले. काँग्रेसकडून हीन दर्जाचे राजकारण सुरू असल्याचे सांगितले. एआय परिषदेत काही जणांनी भारताची बेअब्रू होईल अशा पद्धतीने कृती केली. म्हणजे भाजपसंबंधित गलगोटिया विद्यापीठाने चीनने बनवलेला एआय कुत्रा आपलाच म्हणून दाखवला व त्याचे बिंग चीनने फोडले. त्यामुळे या एआय परिषदेचा नूर बदलला. भारताचे हसे झाले. यासंदर्भात युवक काँग्रेसने सरकारचा निषेध करणारे आंदोलन केले. मोदी म्हणतात, ‘‘हे कृत्य देशविरोधी आहे. काँग्रेसने आता सर्व सीमा ओलांडल्या आहेत.’’ पंतप्रधान म्हणून मोदी यांची तळमळ व तडफड समजून घ्यायला हवी, पण काँग्रेसने केलेले अर्धनग्न आंदोलन चुकीचे ठरवले तरी मोदींची ‘तळमळ’ खरी आहे काय, हा प्रश्न उरतोच. भारतात याआधीही नग्न आणि अर्धनग्न आंदोलने झाली आहेत व त्यावर पंतप्रधान मोदी यांनी कधीच मतप्रदर्शन केले नाही. काही वर्षांपूर्वी भारतीय सैन्याच्या एका रेजिमेंटच्या कार्यालयासमोर भारतीय महिलांनी नग्न आंदोलन केले होते. महिलांचा सरळ आरोप होता की, लष्कराने त्यांच्या बाबतीत घृणास्पद वर्तन केले होते, पण ‘नग्न’ आंदोलन करूनही त्या महिलांचा आक्रोश कोणी ऐकला नाही. खरे म्हणजे मोदी काळात सगळय़ात
भयंकर नग्नतेचे प्रदर्शन
घडले ते मणिपूरमध्ये. मणिपूरमधील वर्ग संघर्षात महिलांची नग्न परेड करण्यात आली. संपूर्ण जगाने हे भयंकर दृश्य पाहिले. संपूर्ण सैन्य, पोलिसांच्या साक्षीने महिलांना एका जमावाने नग्न केले व सरकारचे शस्त्रधारी रक्षक महिलांच्या अब्रूचे धिंडवडे पाहत बसले. मणिपुरात महिलांवर बलात्कार झाले. इतके सारे होऊनही या ‘नग्न’तेवर पंतप्रधान मोदींनी मगरीचे अश्रूही ढाळले नाहीत. मणिपुरात जाऊन पंतप्रधानांनी त्या मायभगिनींना आधार द्यायला हवा होता. त्या पीडित महिलांच्या वेदनेवर आधाराची व अब्रूची शाल ओढायला हवी होती, पण मोदी त्या प्रकरणात जणू मूकबधिर झाले. भारत मंडपममधील युवक काँग्रेसच्या अर्धनग्न आंदोलनाने देशाची प्रतिष्ठा गेली. मग मणिपूरमधील महिलांच्या नग्न परेडने प्रतिष्ठेचे अत्युच्च टोक गाठले होते काय? भाजपच्या एका मोदीभक्त महिला ‘नेत्री’ने तर सर्वच मर्यादा सोडल्या होत्या. विरोधकांना आव्हान देण्यासाठी ‘एकेकाला नंगे’ वगैरे करण्याची भाषा ही भाजपाई ‘नेत्री’ करत होती, पण अमेठीच्या जनतेने त्या ‘नेत्री’स तिची खरी जागा दाखवून पराभूत केले. महात्मा गांधींचा उल्लेख इंग्लंडचे चर्चिल हे ‘नंगा फकीर’ असा करत होते. ‘अर्धनंगा फकीर’ असे बोलून चर्चिल गांधींची चेष्टा करीत होते, पण त्याच अर्धनंग्या फकिराने ब्रिटिश साम्राज्याला भारतातून ‘चले जाव’चा संदेश दिला व ब्रिटिशांना भारतातून गाशा गुंडाळावा लागला. भारताच्या पंतप्रधानांना नग्नतेचे इतके वावडे का? देशातील मोठा वर्ग
आजही गरिबी रेषेखाली
आहे व त्यातील अनेकांच्या अंगावर अब्रू झाकण्याइतकेही वस्त्र नाही. ते एकतर नग्न आहेत किंवा अर्धनग्न आहेत. प्रयागराजच्या कुंभ पर्वात हजारो नागा साधू ‘नग्न’ अवस्थेत उघडपणे वावरत होते. हिंदुत्व व संस्कृती म्हणून भाजपने त्याचा स्वीकार केला आणि ‘हाच आपला भारत देश’ असे सांगितले. मग भारत मंडपममधील अर्धनग्न आंदोलनामुळे इतका जळफळाट का व्हावा? अशा प्रकारची आंदोलने याआधी अनेकदा झाली आहेत. मंडल कमिशन लागू झाल्यावर आरक्षणाविरुद्ध तेव्हा अनेक गावांत, शहरांत ‘अर्धनग्न’ आंदोलकांनी गोंधळ घातला होता. अन्न, वस्त्र, निवारा या जीवनाच्या मूलभूत गरजा आहेत, पण या गरजा पूर्ण होत आहेत काय? भारतात लोकशाही, निवडणूक आयोग, न्याय व्यवस्था पूर्णपणे नग्न करण्याचे काम मोदींच्या अमृत काळात झाले आहे. हा नंगानाच भारतात सुरू आहे व त्या नंगानाचावर मोदीभक्त फुले उधळत आहेत. देशाच्या प्रतिष्ठेला खरा धक्का बसतोय तो इथे. भारत मंडपममधील राजकीय आंदोलन ही लोकशाहीतली एक अर्धनग्न क्रांती आहे. ‘हमाम में सब नंगे होते है’ या म्हणीचा अर्थ पंतप्रधान मोदी यांनी समजून घेतला तर भारत मंडपममधील अर्धनग्न आंदोलनावर ते फुसके फूत्कार सोडणार नाहीत. येथे सगळेच नंगे आहेत. सत्ताधारी, विरोधक, मीडिया, विद्यापीठे वगैरे वगैरे. एकंदरीत प्रे. ट्रम्प यांच्या बरोबर भारताला गुलाम करणारा व्यापार करार करून मोदी सरकार नंगे झाले तरी त्यांना काँगेसवर टीका करावीशी वाटते. ‘कुणी निंदा, कुणी वंदा, काँगेसवर टीका करणे हाच आमचा धंदा.’ मोदीजी, भारताचे वस्त्रहरण सुरू असले तरी इतरांच्या नंगेपणावर बोलत रहा!

































































