सामना अग्रलेख – कोरोनाचे संकट; अहवालांचा फुफाटा!

4691

जागतिक आरोग्य संघटना काय किंवा इतर संस्था काय, त्यांचे अहवाल, निष्कर्ष जनतेच्या प्रबोधनासाठी जाहीर होतात हे गृहीत धरले तरी सध्याचे कोरोना हे ‘न भूतो’ असे संकट आहे. त्याला सामान्य माणूस प्रथमच तोंड देत आहे. त्यामुळे त्याच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम करणारे आणि कोरोना संसर्गापेक्षा भीतीचा प्रादुर्भावच समाजात फैलावणारे ‘तज्ञ’ अहवाल आता आवरा, त्यातील इशाऱयांचे नगारे वाजविणे थांबवा असे सांगण्याची वेळ आली आहे. ‘कोरोनाच्या आगीतून अहवालांच्या फुफाटय़ात’ अशी सामान्य जनतेची दूरवस्था होऊ नये इतकेच.

सध्या सर्वत्र फक्त कोरोना आणि कोरोनाचाच विषय सुरू आहे. जणू ही चराचरसृष्टी अणुरेणूंऐवजी ‘कोविड-19’ या विषाणूनेच व्यापली आहे! देश विकसित आणि श्रीमंत असोत, विकसनशील असोत किंवा अविकसित आणि गरीब, जगातील सुमारे 200 च्या वर देश कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. 46 लाखांपेक्षा जास्त लोकांना या रोगाची बाधा झाली आहे. दोन लाखांहून अधिक जणांचा त्यामुळे मृत्यू झाला आहे. आपल्या देशातही कोरोनाबाधितांची संख्या 90 हजारांच्या पलिकडे पोहोचली आहे. केंद्र आणि राज्यांची सरकारे त्यांच्यापरिने कोरोनाविरुद्धचे युद्ध लढत आहेत. कोरोनाला नियंत्रणात आणण्याचे सर्वतोपरी प्रयत्न महाराष्ट्र सरकारही करीत आहे. तथापि या भयंकर रोगाने ‘न भूतो’ असे भीतीचे सावट संपूर्ण जगावर आणले आहे. आज ‘जागतिक आरोग्य संघटने’पासून (WHO) इतर छोटय़ा-मोठय़ा संस्थांचे अहवाल आणि त्यांचे निष्कर्ष यांची भर पडत आहे. हे संशोधन, अभ्यास जनतेच्या भल्यासाठी केला जात आहे हे मान्य, पण त्यामुळे जर आधीच कोरोनाभयाने ठास्त असलेली जनता अधिक घाबरणार असेल तर कसे चालेल? जे अहवाल सद्यस्थितीत उपयुक्त आहेत ते ठीक, पण जे तसे नाहीत ते तूर्त गुंडाळून ठेवायला काय हरकत आहे? आताही ‘युनिसेफ’चा एक अहवाल जाहीर झाला आहे. कोरोनाच्या भयंकर साथीचा परिणाम म्हणून भविष्यात हिंदुस्थानातील बालमृत्यूचे प्रमाण वाढू शकते, असा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे. कोरोनामुळे सरकार आणि अर्थव्यवस्थेला बसलेल्या आर्थिक तडाख्याचा परिणाम अनेक महिला आणि बालकल्याण योजनांवर होणार आहे. लसीकरण, कुटुंबकल्याण यांसारख्या योजनांनाही फटका बसू शकतो. त्यामुळे हिंदुस्थानसारख्या देशात कुपोषित बालकांची संख्या वाढू शकते, बालमृत्यूचे प्रमाण वाढू शकते. विशेषत: आदिवासी आणि ग्रामीण भागातील बालकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. जगात दररोज असे सहा हजार बालमृत्यू होऊ शकतात, असे ‘युनिसेफ’ने म्हटले आहे. एक सर्वेक्षण म्हणून हे ठीक असले तरी सध्याच्या कोरोनाच्या वातावरणात असे भीतीदायक अहवाल प्रसिद्ध करायलाच हवेत काय? त्यामुळे सामान्य जनतेच्या मनावर होणाऱया

परिणामांचा विचार

कोणी करायचा? एकीकडे मानवी आरोग्यावरील आणि मानसिकतेवरील कोरोनाच्या दुष्परिणामांची चर्चा करायची, त्यासंदर्भात काळजी घ्या असे आवाहन करायचे आणि दुसरीकडे लोकांच्या भीतीत आणखी भर घालणारे अहवाल, निष्कर्ष, इशारे द्यायचे. सारे जग कोरोनामुक्त होण्यासाठी धडपडत असताना जागतिक आरोग्य संघटनेनेच मध्यंतरी ‘कोरोना विषाणू कदाचित कधीच नष्ट होणार नाही’, असा ‘दे धक्का’ दिला. या संघटनेचे आपत्कालिन समस्यांचे संचालक मायकेल रायन यांनीच जिनिव्हा येथे ऑनलाइन पत्रकार परिषदेत हा दावा केला होता. त्यासाठी त्यांनी एचआयव्ही विषाणूचा दाखला दिला. रायन यांचे म्हणणे खरे मानले तरी हे भयंकर दावे जाहीर करून त्यांना काय साध्य झाले? जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडन हॉम यांनीही ‘लॉक डाऊन शिथिल झाल्यावर कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढेल,’ अशी ‘भविष्यवाणी’ वर्तवली आहे. मुळात दीड-दोन महिन्यांच्या अनुभवानंतर कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव याबाबत जगभरातीलच जनता पुरेशी ‘सज्ञान’ झाली आहे. त्यामुळे लॉक डाऊन शिथिल झाल्यावर कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढेल हे सांगण्यासाठी ज्योतिषी किंवा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख कशाला हवेत? त्यात त्यांनी विशेष काय सांगितले? सामान्य माणसालाही आता या धोक्याची जाणीव झाली आहे. तेव्हा त्यांच्या भीतीत भर घालण्याऐवजी ती दूर कशी करता येईल याकडे लक्ष द्या. साधी शिंक आली तरी हल्ली माणूस कोरोनाभयाने थरथरतो. एवढे कोरोनाचे भूत सगळय़ांच्या मानगुटीवर बसले आहे. शिवाय वेगवेगळय़ा माध्यमांद्वारा जनतेवर सल्ले, सूचना, उपाययोजना, खबरदारी, दुष्परिणाम, सरकारी आवाहने याचा मारा होत आहे तो वेगळाच. वाढणारे कोरोना रुग्ण जनतेच्या भीतीत भर घालीत आहेत. सर्व व्यवहार ठप्प असल्याने भविष्याच्या चिंतेनेही सामान्य माणसाला ग्रासले आहे ते वेगळेच.

हातावर पोट असलेल्यांची

तर अवस्था किती भीषण असेल याची कल्पनाच न केलेली बरी. कोरोना संकटाने सामान्य माणसाला यापद्धतीने सर्व बाजूंनी घेरले आहे. त्यातून त्याला बाहेर काढण्याची धडपड सरकारे आणि इतर यंत्रणा करीत आहेत. अशावेळी तुमचे हे भीतीदायक अहवाल सामान्य माणसाचा कोरोनाच्या चक्रव्युहात अडकलेला ‘अभिमन्यू’ करणार असतील तर कसे व्हायचे? बरं, हे सगळेच अहवाल आणि त्यांचे निष्कर्ष काळाच्या कसोटीवर टिकतातच असे नाही. मध्यंतरी केंद्र सरकारच्याच एका यंत्रणेने 15 मार्चपर्यंत 6 लाख मुंबईकरांना कोरोना होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. आणखीही काही आकडेमोड केली होती. आज 15 मेनंतर मुंबईतील कोरोनाठास्तांचा आकडा किती आहे, हे सगळय़ांनाच माहीत आहे. तो कमी व्हायला हवा हे मान्य केले तरी 6 लाखांच्या ‘निष्कर्षा’ने त्यावेळी फक्त सनसनाटी आणि भीतीची लहरच पसरवली असेच आता म्हणावे लागेल. लोकांना कोरोनापेक्षाही अशा अहवालांची आणि इशाऱयांची आता जास्त भीती वाटू लागली आहे. जागतिक आरोग्य संघटना काय किंवा इतर संस्था काय, त्यांचे अहवाल, निष्कर्ष जनतेच्या प्रबोधनासाठी जाहीर होतात हे गृहीत धरले तरी सध्याचे कोरोना हे ‘न भूतो’ असे संकट आहे. त्याला सामान्य माणूस प्रथमच तोंड देत आहे. त्यामुळे त्याच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम करणारे आणि कोरोना संसर्गापेक्षा भीतीचा प्रादुर्भावच समाजात फैलावणारे ‘तज्ञ’ अहवाल आता आवरा, त्यातील इशाऱयांचे नगारे वाजविणे थांबवा असे सांगण्याची वेळ आली आहे. ‘कोरोनाच्या आगीतून अहवालांच्या फुफाटय़ात’ अशी सामान्य जनतेची दूरवस्था होऊ नये इतकेच

आपली प्रतिक्रिया द्या