
अमेरिका, जपानसह अनेक प्रगत देश ‘कोरोना’च्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र प्रत्येक वेळी असे जीवघेणे विषाणू चीनमध्येच कसे निपजतात याचाही शोध घेणे आवश्यक आहे. ज्या वुहान प्रांतात हा विषाणू आढळला तिथेच चीनची जैविक प्रयोगशाळा आहे. विविध प्राण्यांवर प्रयोग करण्याचे काम तिथे चालते. पुढच्या युगातील महासंहारक जैविक अस्त्रे बनवण्याच्या प्रयत्नातून तर असे काही विषाणू तयार होत नसावेत ना याचाही शोध जागतिक समुदायाने घेतला पाहिजे!
कोरोना नावाच्या जीवघेण्या विषाणूने जगभरात दहशत निर्माण केली आहे. चीनच्या वुहान प्रांतातून कोरोनाच्या संसर्गाची सुरुवात झाली आणि हा हा म्हणता या विषाणूचा संपूर्ण चीनमध्ये फैलाव झाला. आता तर हा विषाणू हिंदुस्थानातही पोहचला आहे. वुहानमध्ये वटवाघळाच्या मांसाची मोठय़ा प्रमाणावर विक्री होत़े त्यातून या विषाणूचा प्रसार झाला असे सांगितले जाते. चीनमध्ये आतापर्यंत 170 लोकांचे बळी कोरोनाच्या विषाणूने घेतले आहेत. या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी कुठलीच उपचार पद्धती अस्तित्वात नसल्यामुळे कोरोनाचा हा व्हायरस वेगाने पसरत माणसांचे बळी घेत सुटला आहे. भयंकर डोकेदुखी, खोकला, सर्दी, ताप या प्राथमिक लक्षणांनी कोरोनाचा विषाणू शरीराचा ताबा घेतो आणि फुप्फुसांत संसर्ग होऊन श्वास घेण्यासाठी माणसाची तगमग सुरू होते. वैद्यकीय शास्त्र्ााकडे आज तरी या विषाणूशी लढण्यासाठी कुठलेही औषध नाही. कुठलेही ऍण्टीबायोटिक त्यावर काम करत नाही. त्यामुळे कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग झाला की मृत्यूची टांगती तलवारच रुग्णावर लटकू लागते. चीनमध्ये थैमान घालणाऱया या प्राणघातक विषाणूने चीनमध्ये तर हाहाकार उडवलाच, पण आता चीनच्याही सीमा ओलांडून सुमारे 20 देशांमध्ये हा जीवघेणा विषाणू पोहचला आहे. हिंदुस्थानातही कोरोनाच्या पहिल्या रुग्णाची नोंद केरळमध्ये झाली आहे. केरळच्या ज्या तरुणाला कोरोनाची बाधा झाली आहे तो नुकताच चीनमधून परतला होता. जिथे सर्वप्रथम या विषाणूचा प्रादुर्भाव झाला त्या वुहान येथील विद्यापीठात हा तरुण शिकतो.
कोरोनाच्या महामारीने चीनमध्ये हजारो लोकांना आपल्या विळख्यात घेतल्यानंतर जगभरातील विदेशी नागरिक, पर्यटक, विद्यार्थी चीन सोडून आपापला देश गाठत आहेत. तसाच हा केरळी विद्यार्थी चीनमधून परत आला तो हा विषाणू सोबत घेऊनच. वैद्यकीय चाचण्यांमध्ये या तरुणाच्या शरीरात कोरोनाचे विषाणू असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हिंदुस्थानातील आरोग्य यंत्रणाही हादरली आहे. महाराष्ट्रातही मुंबई, पुणे आणि नांदेड येथील आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याच्या संशयावरून रुग्णालयात दाखल करावे लागले. हे सर्वच जण अलीकडेच चीनमधून परतले आहेत. राजधानी दिल्लीतही चीनमधून परतलेल्या तीन तरुणांना रुग्णालयात दाखल करावे लागले, मात्र तपासण्यांमध्ये सुदैवाने कोरोनाचा विषाणू न आढळल्यामुळे या रुग्णांना घरी पाठवण्यात आले. गेल्या काही दिवसांत चीनमधून आलेल्या सर्वच प्रवाशांची विमानतळांवरच वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या विषाणूला अटकाव करणारे कुठलेच औषध अथवा प्रतिजैविके उपलब्ध नसल्याने कोरोनाचा हा विषाणू अनिर्बंध झाला आहे. सर्दी, खोकल्याद्वारे वेगाने संक्रमण होऊन पसरणारा हा संसर्गजन्य आजार चीनमधून संपूर्ण जगभरात पसरण्याचा धोका वाढल्याने हिंदुस्थानसह अनेक देशांनी चीनसोबतची विमानसेवा स्थगित केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल योग्य असले तरी अनेक देशांतील लोक चीनमध्ये अडकून पडले आहेत. त्यांना या विषाणूची बाधा होण्यापूर्वी आपापल्या देशात सुरक्षित परत आणणे हे सर्वच देशांसाठी मोठे आव्हान आहे.
लोकसंख्येचे प्रचंड प्रमाण, दाटीवाटीची लोकवस्ती यामुळे चीनमध्ये हा व्हायरस वेगाने पसरला चीनपाठोपाठ लोकसंख्येच्या बाबतीत जगात दुसऱया क्रमांकावर असलेल्या हिंदुस्थानातही त्यामुळेच या विषाणूचा फैलाव होण्यासाठी तशी पोषकच परिस्थिती आहे. शिवाय ईशान्येकडील राज्यांच्या चीनलगत असलेल्या सीमावर्ती भागांतूनही या विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केवळ विमानतळांवरच उद्घोषणा आणि तपासण्या करून न थांबता चीनच्या सीमेवरील राज्यांतही विशेष आरोग्य पथके नेमून काळजी घेणे आवश्यक आहे. अमेरिका, जपानसह अनेक प्रगत देश ‘कोरोना’च्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र प्रत्येक वेळी असे जीवघेणे विषाणू चीनमधेच कसे निपजतात याचाही शोध घेणे आवश्यक आहे. ज्या वुहान प्रांतात हा विषाणू आढळला तिथेच चीनची जैविक प्रयोगशाळा आहे. विविध प्राण्यांवर प्रयोग करण्याचे काम तिथे चालते. पुढच्या युगातील महासंहारक जैविक अस्त्रे बनवण्याच्या प्रयत्नातून तर असे काही विषाणू तयार होत नसावेत ना याचाही शोध जागतिक समुदायाने घेतला पाहिजे!






























































