सामना अग्रलेख – आता चक्रीवादळाचे संकट

अवकाळी आणि महाचक्रीवादळाचे संकट यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी हतबल झाला आहे. मात्र देशाचा अन्नदाता असा हतबल होऊ देऊन कसे चालेल? त्याला खंबीर आधार देऊन उभे करावेच लागेल. काल अवकाळीने त्याच्या तोंडचा घास हिरावून घेतला. आता महाचक्रीवादळाचे संकट राज्यावर घोंघावत आहे. सर्वांचा पोशिंदा अस्मानी आणि सुलतानीच्या कोंडीत गुदमरणार नाही याची काळजी घ्यावीच लागेल.

अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील शेती उद्ध्वस्त झाली असतानाच आता ‘महा’ चक्रीवादळामुळे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हे चक्रीवादळ बुधवारी गुजरातमधील दीव ते पोरबंदरच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. ते थेट महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आदळणार नसले तरी त्यामुळे राज्याच्या बऱ्याच भागांत अतिवृष्टी होण्याची भीती आहेच. त्यादृष्टीने आता नेहमीचे ‘सरकारी ऍलर्ट’ देण्यात आले आहेत. किनारपट्टीवरील लोकांना सावधगिरीचे इशारे दिले गेले आहेत. आपत्ती निवारण यंत्रणेसह इतर प्रशासकीय यंत्रणांनाही सज्ज वगैरे राहण्यास सांगण्यात आले आहे. हे सगळे ठीक असले तरी जे काही थोडेफार पीक, भाजीपाला आणि फळबागा अवकाळीपासून बचावल्या आहेत त्यांचे ‘महा’ चक्रीवादळामुळे नुकसान झाले तर कसे व्हायचे? राज्यातील शेतकरी अवकाळी पावसाच्या तडाख्यातून स्वतःला कसेबसे सावरत रब्बी हंगामाची तयारी करीत आहे. मात्र आता पुन्हा चक्रीवादळाचे आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या अतिवृष्टीचे संकट त्याच्यासमोर उभे ठाकले आहे. म्हणजे आधी

कोरड्या दुष्काळाने

मारले, आता ओला दुष्काळही तेच करीत असेल तर कसे व्हायचे? पश्चिम महाराष्ट्रात अडीच लाखांपैकी सुमारे 62 हजार हेक्टरवरील ऊसपीक शेतातच कुजले आहे. कांदा, टोमॅटो, सोयाबीन, ज्वारी, भात आदी पिकांचीही स्थिती त्यापेक्षा वेगळी नाही. भाजीपाला आणि फळबागा तर उद्ध्वस्तच झाल्या आहेत. त्यात ‘महा’ चक्रीवादळामुळे येणाऱ्या अतिवृष्टीची भर पडणार असल्याने बळीराजापुढील संकटांची मालिका थांबण्याची चिन्हे नाहीत. आम्ही स्वतः राज्यातील अवकाळीग्रस्त शेतकऱयांच्या भेटी घेत आहोत. त्यांना धीर देत आहोत. सरकारी पंचनामे, केंद्रीय पथकाकडून होणारी पाहणी, निकषांच्या त्रांगड्यात अडकलेली तुटपुंजी मदत या गोष्टी तर होतच राहतील, पण बळीराजाला ‘रडायचे नाही तर लढायचे’ असा खंबीर आधार देण्याची गरज आहे. निसर्गावर आपले नियंत्रण नसते हे खरे असले तरी अवकाळीने शेतकऱयांचे झालेले नुकसान लवकर भरून काढणे आणि ‘महा’ चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी त्याला

खंबीर आधार

देणे गरजेचे आहे. त्यासाठी पिकांच्या नुकसानभरपाईचे निकषही बदलण्याची गरज आहे. सध्याच्या नियमांनुसार दोन हेक्टरपर्यंत प्रति हेक्टर 6 हजार 800 रुपये एवढीच मदत दिली जाते. म्हणजे जास्तीत जास्त साडेतेरा हजार रुपयेच अवकाळीग्रस्त शेतकऱ्याला मिळू शकतात. आधीच खरीप हंगामासाठी झालेला सगळा खर्च अवकाळीमुळे वाया गेला आहे. त्यासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे ही चिंता सामान्य शेतकऱ्याला भेडसावते आहे. त्यात रब्बी हंगामासाठी तजवीज कशी करायची हा प्रश्नही आहेच. नाशिक जिह्यातील दोन शेतकऱयांनी याच काळजीतून मागील दोन दिवसांत आत्महत्या केल्या. अवकाळी आणि ‘महा’ चक्रीवादळाचे संकट यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी हतबल झाला आहे. मात्र देशाचा अन्नदाता असा हतबल होऊ देऊन कसे चालेल? त्याला खंबीर आधार देऊन उभे करावेच लागेल. काल अवकाळीने त्याच्या तोंडचा घास हिरावून घेतला. आता ‘महा’ चक्रीवादळाचे संकट राज्यावर घोंघावत आहे. सर्वांचा पोशिंदा अस्मानी आणि सुलतानीच्या कोंडीत गुदमरणार नाही याची काळजी घ्यावीच लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या