
कालपर्यंत शेतकऱ्यांना शत्रूसारखी वागणूक देणारे मोदी सरकार आता मात्र अमेरिकेच्या टॅरिफ बॉम्बनंतर शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. याला पुतनामावशीचे प्रेम नाही तर काय म्हणायचे? कालपर्यंत मुस्कटदाबी करणाऱ्या मोदी सरकारला शेतकऱ्यांच्या आठवणीची उचकी आताच का लागावी? ‘‘शेतकऱ्यांच्या हितासाठी मी व्यक्तिगत किंमत चुकवायलाही तयार आहे,’’ असे पंतप्रधान म्हणतात याचा अर्थ मोदी यांना नक्कीच कुठली तरी अनामिक भीती सतावीत आहे. ‘‘सगळे प्रयत्न संपले म्हणजे जनता आठवते,’’ असे सरसंघचालक मोहन भागवत यांचे ताजे विधान प्रसिद्ध झाले आहे. मोदी यांना शेतकऱ्यांची झालेली आठवण नेमके तेच सांगते!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अचानक देशातील शेतकऱ्यांची आठवण झाली आहे. मोदी यांची सध्या देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही चौफेर कोंडी झाली आहे व या संकटकाळातून बाहेर पडण्यासाठी ढाल म्हणून शेतकऱ्यांचा वापर करायचा मोदी यांचा इरादा दिसतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व मोदी यांचे खासमखास दोस्त डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 50 टक्क्यांचा ‘टॅरिफ बॉम्ब’ फोडल्यामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा, या पेचात मोदी सापडले आहेत. ट्रम्प यांचा ‘टॅरिफ बॉम्ब’ म्हणजे एका तऱ्हेने महासत्तेने हिंदुस्थानवर आणलेली आपत्तीच आहे व याचा सर्वात मोठा फटका कृषी क्षेत्राला, पर्यायाने शेतकऱ्यांना बसणार आहे. आधीच देशातील शेतकरी विरोधात असताना त्यात ही नवी आफत आल्यामुळे कधी नव्हे ते शेतकऱ्यांना चुचकारण्याचे प्रयत्न मोदी यांनी सुरू केले आहेत. ‘‘मी कुठलीही व्यक्तिगत किंमत चुकवायला तयार आहे, पण भारतातील शेतकऱ्यांच्या हिताशी मी कधीही तडजोड करणार नाही,’’ असे विधान पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी केले व त्यावरून देशात, खास करून समाज माध्यमांवर उलटसुलट प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला. प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित वैश्विक संमेलनाच्या उद्घाटन समारंभात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, ‘‘देशातील शेतकऱ्यांच्या हिताला आमचे
सर्वोच्च प्राधान्य
आहे. आपल्या देशातील शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमार बंधू-भगिनींच्या हितांशी मी कदापि समझोता करणार नाही.’’ अमेरिकेने भारतीय कृषी उत्पादनांवर 50 टक्क्यांपर्यंत आयात शुल्क वाढवल्यामुळे उभय देशांत जी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे, त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी शेतकऱ्यांविषयी हा कळवळा प्रकट केला. मोदी यांच्या अचानक उफाळलेल्या या शेतकरी प्रेमावरून संशय निर्माण झाला आहे. मुळात कालपर्यंत देशातील शेतकऱ्यांना शत्रूसारखी वागणूक कोण देत होते, शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारे तीन काळे कायदे कोणत्या सरकारने आणले, आपल्याच देशातील शेतकऱ्यांना आंदोलनासाठी राजधानीत येण्यापासून कोणी रोखले, शेतकऱ्यांना शत्रू समजून त्यांच्या मार्गावर खिळे कोणी ठोकले, हे काय देशातील शेतकऱ्यांना ठाऊक नाही? पण ज्या शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. रबरी गोळ्यांचा वर्षाव केला, त्याच शेतकऱ्यांच्या हिताची व हक्कांची आठवण आता पंतप्रधान मोदी यांना व्हावी हे आश्चर्यच नव्हे काय? ज्या स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी समारंभात पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे हवाबाण सोडले; त्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचे आश्वासन 2014 मध्ये मोदींनीच दिले होते ना? शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव देऊ, संपूर्ण खर्च आणि त्यावर 50 टक्के नफा याप्रमाणे सर्व शेतमालाच्या आधारभूत किमती ठरवू, या
‘मोदी वचना’चे काय झाले
हे पंतप्रधानांनी स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात सांगितले असते तर बरे झाले असते. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे मोदी यांचे स्वप्न तर प्रत्यक्षात आले नाहीच; उलट खते व बियाणे यांच्या किमती दुपटीने व तिपटीने वाढल्या आणि शेतमालाचे भाव मात्र आहे तेवढेच राहिले. पुन्हा युरियासारख्या खतांची टंचाई व त्यांचा काळाबाजार, निकृष्ट बियाण्यांमुळे होणारे नुकसान या संकटांशीही शेतकऱ्यांना दोन हात करावे लागत आहेत. शेती पूर्ण तोट्यात गेली व शेतकरी नागवला गेला. मोदी राजवटीतच देशातील शेतकऱ्यांसमोर सर्वाधिक संकटे निर्माण झाली किंवा निर्माण केली गेली, पण कालपर्यंत शेतकऱ्यांना शत्रूसारखी वागणूक देणारे मोदी सरकार आता मात्र अमेरिकेच्या ‘टॅरिफ बॉम्ब’नंतर शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. याला पुतनामावशीचे प्रेम नाही तर काय म्हणायचे? कालपर्यंत मुस्कटदाबी करणाऱ्या मोदी सरकारला शेतकऱ्यांच्या आठवणीची उचकी आताच का लागावी? ‘‘शेतकऱ्यांच्या हितासाठी मी व्यक्तिगत किंमत चुकवायलाही तयार आहे,’’ असे पंतप्रधान म्हणतात याचा अर्थ मोदी यांना नक्कीच कुठली तरी अनामिक भीती सतावीत आहे. ‘‘सगळे प्रयत्न संपले म्हणजे जनता आठवते,’’ असे सरसंघचालक मोहन भागवत यांचे ताजे विधान प्रसिद्ध झाले आहे. मोदी यांना शेतकऱ्यांची झालेली आठवण नेमके तेच सांगते!