
सध्या सर्वांची प्राथमिकता महापुरात फसलेल्यांना सर्व प्रकारच्या किमान सुविधा उपलब्ध करून देणे आणि पूरस्थिती ओसरल्यावर उद्ध्वस्त कुटुंबांना पुन्हा उभे राहण्यासाठी आधार देणे हीच असली पाहिजे. विरोधकांनीही फक्त टीकेच्या पाण्यात आपल्या राजकीय स्वार्थाच्या बोटी वल्हवू नयेत. ही वेळ महाप्रलयाने उद्ध्वस्त झालेल्या कोल्हापूर-सांगलीतील लाखो लोकांना मदत करण्याची आहे.
निसर्ग कोपला की काय हाहाकार होतो याचा प्रत्यय सध्या कोल्हापूर, सांगली जिल्हय़ात येत आहे. या दोन्ही जिल्हय़ांना महापुराने जणू गिळंकृतच केले आहे. जिथे पाहावे तिथे पाणीच पाणी आहे. त्यात हजारो संसार होत्याचे नव्हते झाले आहेत. गावेच्या गावे जलमय झाली आहेत. शेतातील उभी पिके तर पाण्याखाली गेलीच आहेत, पण जनावरे, घरातील किडुकमिडुकदेखील या प्रलयाने स्वाहा केले आहे. मागील 50-55 वर्षांतील सर्वात भीषण संकट सध्या येथील जनतेसमोर उभे ठाकले आहे. पूरग्रस्तांच्या चेहऱयावरची घालमेल, त्यांचा आक्रोश, आकांत, महापुराच्या पाण्यात वाहून जाणारे त्यांचे अश्रू, पुढे काय? या प्रश्नाचे कुठलेच उत्तर समोर नसल्याने दिसणारी हतबलता, सुटका आणि मदतीसाठी चातकासारखी वाट पाहणारे डोळे, ज्यांची सुटका झाली आहे त्यांच्या डोळय़ात गावाकडे अजूनही अडकलेल्या व्यक्ती आणि जनावरांबाबत दिसणारी काळजी… हे चित्रं प्रत्येकाला अस्वस्थ करणारे, हेलावून टाकणारे आहे. पाण्याला ‘जीवन’ असे म्हटले जाते, पण हेच ‘जीवन’ सध्या कोल्हापूर, सांगलीकरांसाठी ‘मरण’ बनले आहे. आजूबाजूला पसरलेले पाणी यमदूताच्या रूपाने आपला घास घेण्यासाठीच पुढे सरसावते आहे की काय, अशी भयंकर अवस्था त्यांची झाली आहे. मदतीसाठी आलेली बोटदेखील सांगली जिल्हय़ातील
पलूस तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी
यमदूतच ठरली. ही मदतबोट उलटली आणि 14-15 पूरग्रस्तांना जलसमाधी मिळाली. बुडत असतानाही कवेतील चिमुकल्याला उराशी घट्ट धरून ठेवलेल्या आजीचे छायाचित्र हृदय पिळवटून टाकणारे आहे. आता या बोटीत क्षमतेपेक्षा जास्त लोक बसले वगैरे म्हणणे ठीक असले तरी त्या प्रत्येकाची धडपड स्वतःचा जीव वाचविण्यासाठीच होती हे कसे विसरता येईल? अशा आणीबाणीच्या प्रसंगी घाईगडबड, रेटारेटी, अशांतता करू नये. संयम आणि किमान शिस्त पाळावी हे खरेच; पण साक्षात मृत्यू ज्यांच्यासमोर उभा आहे त्यातील प्रत्येकाला ते शक्य होईलच असे नाही. सरकारतर्फे पूरग्रस्तांच्या सुटकेचे आणि बचावाचे हरतऱहेचे प्रयत्न सुरू असले तरी येथे आभाळच फाटले आहे. त्यामुळे खासगी बोट आली आणि त्यासाठी झुंबड उडाली तर तो गुन्हा कसा ठरवता येणार? या संपूर्ण भागात एनडीआरएफ, राज्य आपत्ती निवारण दल, हवाई दल, नौदल, कोस्ट गार्ड, लष्कर, आपत्ती निवारण व्यवस्था, स्थानिक प्रशासन, पोलीस अशा सर्व यंत्रणा या मदतकार्यासाठी कार्यरत आहेत. शिवाय ठिकठिकाणी नागरिकही उत्स्फूर्तपणे आपापल्या परीने
मदतकार्य
करीत आहेत. अर्थात मदतकार्य म्हणजे फक्त सुटका किंवा स्थलांतर नव्हे. या सर्व नागरिकांसाठी जेवण, पिण्याचे पाणी, कपडालत्ता, औषधे यांची व्यवस्था, साथीच्या रोगांचा फैलाव होऊ न देणे अशा अनेक पातळय़ांवर सरकार, प्रशासन, पोलीस आणि बचाव पथके लढतच आहेत. त्यामुळे हवामान खाते वेळोवेळी घाटमाथ्यावरील अतिवृष्टीचे इशारे देत होती. तेव्हा आपत्ती निवारण यंत्रणा काय करीत होती? त्यांनी वेळीच खबरदारी का घेतली नाही? वगैरे प्रश्न आता विचारण्यात हशील नाही. सध्या सर्वांची प्राथमिकता महापुरात फसलेल्यांना सर्व प्रकारच्या किमान सुविधा उपलब्ध करून देणे आणि पूरस्थिती ओसरल्यावर उद्ध्वस्त कुटुंबांना पुन्हा उभे राहण्यासाठी आधार देणे हीच असली पाहिजे. सरकारी यंत्रणांनीही मोफत अन्नधान्याची मदत करताना ‘अटी व शर्ती लागू’ हा नेहमीचा ‘कंडू’ निदान अशा वेळी तरी बाजूला ठेवण्याचा सुज्ञपणा दाखवायला हवा. सरकारी भाषा वगैरे ठीक असली तरी त्यामुळे आधीच बेहाल झालेल्या आपत्तीग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळले जाणार नाही याचे भान ठेवायला हवे. विरोधकांनीही फक्त टीकेच्या पाण्यात आपल्या राजकीय स्वार्थाच्या बोटी वल्हवू नयेत. ही वेळ महाप्रलयाने उद्ध्वस्त झालेल्या कोल्हापूर-सांगलीतील लाखो लोकांना मदत करण्याची, त्यांना धीर देत पुन्हा भक्कमपणे उभे करण्यासाठी काय करता येईल हे पाहण्याची आहे.




























































