
‘भारत मंडपम’मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी शर्ट उतरवून आंदोलन केले म्हणून पंतप्रधान मोदी यांना राग आला. ‘काँग्रेसचे काय हे हीन दर्जाचे राजकारण,’ असा ढोल त्यांनी बडवला, पण भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला 50 कोटी मिळाले, असे उघडपणे सांगणाऱ्या भूपेन बोरांचा खेळ त्यांना हीन दर्जाचा वाटत नाही. एकंदरीत भारताच्या राजकारणात निर्लज्जपणाचा चिखल झालाच आहे. त्या चिखलात आसामच्या एका बेडकाची भर पडली. 50 कोटी घेतलेला हा बेडुक आता इमानदारीचे डराव करील व त्या डरावाचे स्वागत स्वतः पंतप्रधान मोदी आसामात येऊन करतील. आसामात विधानसभा निवडणुका आल्याच आहेत. भूपेन बोरांप्रमाणे बेडकांचा भाव ठरला आहे. 50 कोटी एकदम ओके! भाजपच्या निर्लज्ज कथेचे हे टोक आहे!
भारतीय साहित्यात इसाप कथा, वेताळ कथा वगैरे भरपूर वाचल्या गेल्या. त्या साहित्यमालेत यापुढे भाजपच्या निर्लज्ज कथांचा समावेश व्हायला हरकत नाही. या निर्लज्ज कथांत आसाममधील नव्या कथानकाची भर पडली आहे. आसाम काँग्रेसचे माजी अध्यक्ष भूपेन बोरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याआधी बराच काळ बोरा यांनी रुसवे-फुगवे सुरू केले होते. हा रुसवा घालवण्यासाठी दिल्लीतील काँग्रेसच्या हायकमांडने बऱ्याच विनवण्या केल्या. स्वतः राहुल गांधीही बोलले, पण बोरा यांचा रुसवा कायम राहिला. ते रुसव्यात धुंद असतानाच आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा हे बोरा यांच्या घरी आले व दोघांचे हसरे फोटो प्रसिद्ध झाले! बोरा यांच्या रुसव्याचा उतारा काय होता हे आता समोर आले व आपल्या हास्याची किंमत बोरा यांनी उघड केली. भाजपमध्ये प्रवेश करताच भूपेन बोरा यांनी इमानदारीने (अगदी टी.व्ही. कॅमेऱ्यांसमोर) सांगितले की, ‘‘जनहो, माझा रुसवा गेला. माझ्या चेहऱ्यावर हास्य आहे. मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी मला 50 कोटी रुपये दिले. माझ्या पूज्य पिताजींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी हे 50 कोटी स्वीकारले.’’ भूपेन बोरा यांनी हे अत्यंत दिलखुलासपणे सांगितले की, मी 50 कोटी घेतले. पैसे घेऊन खुलेआम बेशरमपणे कबूल करणारे पहिले ‘इमानदार’ भारतीय नेता म्हणून भूपेन बोरा यांचा गौरव करावा लागेल. अनेकदा नेते पक्षांतरासाठी कोट्यवधी रुपये स्वीकारतात, ढेकर देतात व नंतर छे छे, आम्ही पैसे घेतलेच नाही, विकासासाठी व राष्ट्रहितासाठी पक्षांतर केल्याचा आव आणतात. आसामचे भूपेन बोरा या सगळ्यांत वेगळे निघाले. बेइमानी करूनही इमानदारीचा डंका त्यांनी पिटला आहे.
या बेशरमपणाबद्दल
मोदी सरकारने या माणसाचा नागरी सत्कारच करायला हवा. भूपेन बोरा यांनी राजकारणात नवे पर्व सुरू केले आहे. बेइमानी करा, लुटा, त्याचा कबुलीजवाब द्या व खरे बोलल्याबद्दल स्वतःची वाहवा करून घ्या! घेणारे व देणारे दोघेही मजेत. कोण कोणाचे काय वाकडे करणार? तपास यंत्रणा तर विरोधकांचाच तपास करण्यासाठी आहेत. सत्ताधाऱ्यांसाठी तर त्या वॉशिंग मशीनप्रमाणे आहेत. ‘भारत मंडपम’मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी शर्ट उतरवून आंदोलन केले म्हणून पंतप्रधान मोदी यांना राग आला. ‘काँग्रेसचे काय हे हीन दर्जाचे राजकारण,’ असा ढोल त्यांनी बडवला, पण भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला 50 कोटी मिळाले, असे उघडपणे सांगणाऱ्या भूपेन बोरांचा खेळ त्यांना हीन दर्जाचा वाटत नाही. या बेशरम कथानकास अनेक कंगोरे आहेत व त्या कथेचे नायक आणि खलनायक हेच भूपेन बोरा आहेत. 2024 मध्ये भूपेन बोरा भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे विधान हेमंता बिस्वा सरमा यांनी करताच हेच भूपेन बोरा खवळले होते. आपल्या पक्षनिष्ठा व इमानदारीवर शंका घेतल्याचा संताप येऊन त्यांनी मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमांवर 10 कोटींचा मानहानीचा दावा ठोकला होता. आता तेच भूपेन बोरा काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झाले. अगदी अलीकडेच म्हणजे 7 फेब्रुवारीलाच हेमंता बिस्वा सरमा यांनी आसामच्या पोलीस महासंचालकांना आदेश दिला होता, काय? तर सार्वजनिक ठिकाणी अश्लील इशारे, अभद्र हातवारे केल्याबद्दल भूपेन बोरांवर कठोर कारवाई करा. सरमा यांचे म्हणणे होते की, ‘भूपेन बोरांच्या
या घाणेरड्या कृत्यामुळे
आसामच्या माता-भगिनींच्या आत्मसन्मानास ठेच पोहोचली आहे.’ मग आता तेच भूपेन भय्या भाजपमध्ये आल्यावर आसामच्या माता-भगिनींच्या आत्मसन्मानाची झेप उंचावली काय? काय हा खोटारडेपणा! माते कामाख्या देवी, आसाममधील भाजपचे हे चाळे पाहतेस ना? भूपेन बोरा यांना 50 कोटी मिळाले. म्हणजे 50 कोटींचे भाव आजही कायम आणि स्थिर आहेत. साडेतीन वर्षांपूर्वी त्याच आसामात महाराष्ट्रातील 40 गद्दार ठोक 50 कोटींच्या भावाला विकले गेल्याची चर्चा त्यावेळी झाली होती. आता आसामचा नेतादेखील 50 कोटींत वाहून गेला. या निर्लज्ज कथेतील रहस्यमय भाग असा की, पंधरा दिवसांपूर्वी ‘50 खोके’ फेम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री हे आसामला आले व मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांना भेटले. त्यानंतर लगेच भूपेन बोरा 50 कोटींत विकले गेले. आपण आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 50 कोटी घेतले आणि भाजपमध्ये प्रवेश केला, असे भूपेन बोरा स्वतःच सांगत आहेत. मग महाराष्ट्राच्या 40 गद्दारांनीही याच पद्धतीने त्यांच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 50-50 खोके स्वीकारले होते काय, असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. या 40 गद्दारांनी वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी हे 50 खोके कोठे खर्च केले हेसुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या. एकंदरीत भारताच्या राजकारणात निर्लज्जपणाचा चिखल झालाच आहे. त्या चिखलात आसामच्या एका बेडकाची भर पडली. 50 कोटी घेतलेला हा बेडुक आता इमानदारीचे डराव करील व त्या डरावाचे स्वागत स्वतः पंतप्रधान मोदी आसामात येऊन करतील. आसामात विधानसभा निवडणुका आल्याच आहेत. भूपेन बोरांप्रमाणे बेडकांचा भाव ठरला आहे. 50 कोटी एकदम ओके! भाजपच्या निर्लज्ज कथेचे हे टोक आहे!
































































