सामना अग्रलेख – ममतांची छापेमारी! एकच मारली, पण जोरात बसली!

पंजाब, तामीळनाडू, कर्नाटक या राज्यांतील बिगर भाजप सरकारांवर तसेच त्याआधी महाराष्ट्रातील विरोधी पक्ष आणि नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव सातत्याने टाकण्यात आला. केजरीवाल व हेमंत सोरेन या बिगर भाजप मुख्यमंत्र्यांना अटक केली. मात्र त्याच वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेतील ज्या वादग्रस्त आणि भ्रष्ट नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्या सर्व भ्रष्टाचाऱ्यांना ‘ईडी’ने क्लीन चिट दिली. अशा ‘ईडी’ला धडा शिकविण्याचे काम ममता बॅनर्जी यांनी केले. कोलकाता येथे प. बंगाल निवडणुकीच्या आधी ‘आईपॅक’वर छापेमारी म्हणजे अमित शहा स्पूल ऑफ पॉलिटिक्सचा नमुना आहे. ममता बॅनर्जी त्या शाळेत घुसल्या व हेडमास्तरच्या कानाखाली आवाज काढून बाहेर पडल्या. ही सुरुवात आहे!

पश्चिम बंगालमध्ये पुढील चारेक महिन्यांत विधानसभा निवडणुका आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी गर्जना केली आहे की, ‘‘या वेळी प. बंगाल जिंकणार म्हणजे जिंकणार!’’ अर्थात बिहारात तेजस्वी यादवांना ज्या पद्धतीने निपटले व लपेटले त्याच पद्धतीने प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना गुंडाळण्याचा डाव अमित शहा आणि भाजपवरच उलटला आहे व त्याबाबत बंगालच्या वाघीण ममता दीदींचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच! अमित शहा यांनी कोलकात्यात ‘ईडी’चे विशेष पथक खास सूचना देऊन पाठवले. या भाजपच्या ईडी हस्तकांनी तृणमूल काँग्रेसच्या निवडणुका स्ट्रटेजी, सर्व्हे वगैरेंचे काम करणाऱ्या इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटीच्या (आईपॅक) दोन ठिकाणांवर छापेमारी केली. ‘ईडी’चे म्हणणे असे की, ती 2020 च्या कोळसा घोटाळ्यांसंदर्भात मनी लॉण्डरिंग केसचा तपास करीत आहे. ‘ईडी’च्या पथकाने ‘आईपॅक’चे संचालक प्रतीक जैन यांच्या घरावर छापा टाकला व तृणमूल काँग्रेसने निवडणुकीसाठी सुरू केलेल्या सर्व्हेच्या फाईल्स ताब्यात घेतल्या. प्रतीक जैन यांनी विधानसभा निवडणुकीची प्रत्येक मतदारसंघाची स्वतंत्र ‘स्टॅटेजी’ तयार केली. ते स्वतः तृणमूलच्या आयटी सेलचे प्रमुख आहेत. तृणमूलने निवडणुका जिंकण्यासाठी केलेली मेहनत व प्लॅन आयतेच पळविण्याचा हा डाव भाजपने ‘ईडी’ला पुढे करून टाकला, पण मुख्यमंत्री ममता एखाद्या जखमी वाघिणीसारख्या प्रतीक जैन यांच्या निवासस्थानी पोहोचल्या व पक्षाच्या सर्व फाईल्स ‘ईडी’ अधिकाऱ्यांच्या हातून हिसकावून घेतल्या. अमित शहांच्या नियंत्रणाखाली काम करणाऱ्या ‘ईडी’ने वारंवार स्वतःच्या प्रतिष्ठsची लक्तरे स्वतःच काढून घेतली आहेत. कोलकात्याच्या ‘आईपॅक’ छापेमारीच्या प्रकरणातही ‘ईडी’ उघडी पडली. ‘ईडी’चा दावा आहे की, 2022 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत

‘आईपॅक’ला बेकायदेशीर

पद्धतीने निधी मिळाला. त्याचा तपास आम्ही करीत आहोत. मग 2022, 2023, 2024 आणि 2025 पर्यंत ‘ईडी’ काय करीत होती? चार वर्षे झाली. ‘ईडी’ने त्याबाबत कधीच चौकशी केली नाही, पण प. बंगालची विधानसभा निवडणूक जवळ येताच ‘ईडी’ला 2022 मध्ये गोव्यात खर्च झालेल्या पैशांचा तपास करावासा वाटला आणि त्यासाठी धाडी घातल्या. हा प्रकार म्हणजे ‘ईडी’ भाजपची हस्तक असल्याचा पुरावाच आहे. प. बंगालमध्ये भाजपने निवडणुका जिंकण्यासाठी जो मार्ग अवलंबला तो लोकशाहीविरोधी, भ्रष्ट आहे. भाजप याच पद्धतीने महाराष्ट्र आणि बिहारच्या निवडणुका जिंकला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून निवडणुका जिंकणे हा एक प्रकारे षंढपणा आहे. अमित शहा व त्यांचा पक्ष हा मार्ग वारंवार स्वीकारीत आहेत. ‘ईडी’, सीबीआय, निवडणूक आयोग व सुप्रीम कोर्ट हे भाजप विजयाचे चार स्तंभ आहेत. भारतीय लोकशाहीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा या चार स्तंभांचा काळा इतिहास नोंदवावा लागेल, पण ममता बॅनर्जी यांनी अजगराच्या तोंडात हात घालून निवडणुकीचा मुद्देमाल हिसकावला व ‘ईडी’ अधिकाऱ्यांच्या घुसखोरीविरुद्ध गुन्हे दाखल केले. अमित शहांच्या झुंडशाहीस जोरदार चपराक बंगालच्या वाघिणीने मारली. भाजपचा डोलारा अशाच कपट, कारस्थानांवर उभा आहे. या घटनेनंतर एक गोष्ट समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाली ती म्हणजे नव्वदच्या दशकात ‘ड्रग्ज’चे नियमित सेवन करणाऱ्या नशेडी लोकांवर कोणत्याही अमली पदार्थांचा उपयोग होत नव्हता. मग हे लोक तासन्तास सापाच्या बिळात हात घालून बसत. सापाने डंख मारावा व त्या नशेत चूर होऊन पडावे. त्या काळात अनेकांना या प्रकारामुळे प्राण गमवावे लागले. बंगालमध्ये काल नेमके हेच झाले.

‘ईडी’ला सत्तेची नशा

इतकी चढली की, तिने सापाच्या बिळात हात घातला, पण बिळात किंग कोबरा जातीची नागीण होती. त्या नागिणीने जोरात डंख मारला आहे. ममता दीदींनी ठणकावले आहे की, ‘‘आमच्या घरात चोरी करायला घुसाल तर प्रतिकार करूच करू!’’ गेल्या दहा-बारा वर्षांत नरेंद्र मोदी व अमित शहांनी राजकीय विरोधकांना जेरबंद करण्यासाठी ‘ईडी’चा वापर केला. याबाबतीत त्यांनी व्हेनेझुएलाच्या मादुरोवर मात केली. राज्यांची प्रतिष्ठा व निवडून आलेल्या सरकार, मुख्यमंत्र्यांविरुद्ध ‘ईडी’चा वापर केला. दिल्ली सरकारच्या एसीबी म्हणजे भ्रष्टाचारविरोधी कार्यालयात केंद्रीय शस्त्र बळ घुसवून ताबा घेतला. सीबीआयच्या कार्यालयात दिल्ली पोलिसांना घुसवून सीबीआय प्रमुखांना बंदी बनवले. कारण राफेल भ्रष्टाचाराच्या तपासाची फाईल मोदी-शहांना हवी होती. अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर होताच शहांनी लगेच सीबीआयला पुढे करून केजरीवाल यांच्याविरुद्ध नवा गुन्हा नोंदवायला लावला. केजरीवाल तुरुंगातून सुटू नयेत यासाठी हा खेळ चालला होता. पंजाब, तामीळनाडू, कर्नाटक या राज्यांतील बिगर भाजप सरकारांवर तसेच त्याआधी महाराष्ट्रातील विरोधी पक्ष आणि नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव सातत्याने टाकण्यात आला. केजरीवाल व हेमंत सोरेन या बिगर भाजप मुख्यमंत्र्यांना अटक केली. मात्र त्याच वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेतील ज्या वादग्रस्त आणि भ्रष्ट नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्या सर्व भ्रष्टाचाऱ्यांना ‘ईडी’ने क्लीन चिट दिली. अशा ‘ईडी’ला धडा शिकविण्याचे काम ममता बॅनर्जी यांनी केले. कोलकाता येथे प. बंगाल निवडणुकीच्या आधी ‘आईपॅक’वर छापेमारी म्हणजे अमित शहा स्पूल ऑफ पॉलिटिक्सचा नमुना आहे. ममता बॅनर्जी त्या शाळेत घुसल्या व हेडमास्तरच्या कानाखाली आवाज काढून बाहेर पडल्या. ही सुरुवात आहे!