आजचा अग्रलेख : मान्सूनचे स्वागत!

137

मुंबई, कोकण परिसरात धबधब्याप्रमाणे कोसळणाऱ्या पावसाची महाराष्ट्राच्या अन्य भागांत मात्र अजूनही प्रतीक्षा आहे. मान्सूनचा पाऊस सर्व जिह्यांत पोहचला असला, तरी अजूनही 100 टक्के पेरण्यांसाठी तो पुरेसा नाही. मराठवाड्यासह राज्याच्या अनेक जिह्यांत टँकर्सची संख्या पावसाळ्यातही वाढतेच आहे. मुंबई, कोकणात दणक्यात आलेल्या पावसाचे स्वागत करतानाच दुष्काळग्रस्त मराठवाडा व राज्याच्या सर्वच भागांत मान्सूनने मुक्त हस्ते बरसात करावी आणि राज्यातील शेतकरी जगवावा, हीच त्या वरुणराजाकडे प्रार्थना!

महाराष्ट्राच्या सर्वच भागांमध्ये मान्सून आता सक्रिय झाला आहे. तीन आठवडे उशिराने का होईना, पण मान्सूनच्या ढगांनी महाराष्ट्राच्या सर्वच जिह्यांवर आता गर्दी केली आहे. कोकण, मुंबई, ठाणे येथे धो धो पाऊस कोसळत आहे. तथापि, राज्याच्या अन्य भागांत मात्र पावसाचा जोर तुलनेने कमी आहे. खास करून मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी आहे. अधूनमधून हलक्या, मध्यम सरी कोसळतात आणि जमीन भिजवून अर्ध्या तासात पाऊस गायब होतो. म्हणजे व्यवस्थेने जसा विकासाच्या बाबतीत प्रादेशिक भेदभाव केल्याची टीका होत असते, त्याच धर्तीवर निसर्गानेही पावसाच्या बाबतीत प्रादेशिक असमतोलाचे हे दुष्टचक्र कायम ठेवले आहे असेच म्हणावे लागेल. मुंबईत पावसाची वानवा अशी कधी नसतेच. पुन्हा कोकण आणि मुंबईतील पावसाचा थाट आणि डौलही काही औरच. समुद्राला लागूनच असल्यामुळे पावसाची पहिली हजेरीही इथेच लागते. एकदा सुरू झाला की, संततधार थांबता थांबत नाही. आताही तसेच झाले. महिनाभर वाट पाहायला लावणाऱ्या पावसाने मुंबई आणि कोकणावर अशी काही बरसात केली की, एकाच पावसात कोकणातील नदीनाल्यांना पूर आले. उन्हाची काहिली आणि घामाच्या धारांनी त्रस्त झालेल्या मुंबईकरांना मान्सूनच्या

पहिल्याच जलधारांनी

तृप्त केले. वास्तविक पावसाळ्याचा पहिला महिना असलेल्या जून महिन्याचे पहिले 25 दिवस कोरडे गेल्यामुळे मुंबईकरांनाही कधी नव्हे ती पावसाची ओढ लागली होती. जून महिन्याच्या सुरुवातीला धडकलेल्या ‘वायू’ चक्रीवादळाच्या तडाख्यातून मुंबई वाचली खरी, पण या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातील मान्सूनची गती रोखून धरली होती. मान्सूनच्या या विलंबामुळे अवघ्या मुंबईवर यंदा प्रथमच जलसंकट निर्माण झाले होते. मात्र, शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पहिल्याच पावसाने कोकण आणि मुंबईला चिंबचिंब केले. पावसासोबत समुद्राला येणारे उधाण, दर्यातून उसळणाऱ्या आणि वेगाने रोरावत काठावर येऊन आदळणाऱ्या अजस्र लाटा, याचे मुंबईकरांनाच नव्हे तर उभ्या देशाला आकर्षण असते. मुंबईतील पावसाच्या या धसमुसळेपणाचा मराठवाड्यासारख्या अत्यंत कमी पर्जन्यमान असलेल्या दुष्काळग्रस्त भागाला तर सदैव हेवा वाटतो. गेले चार दिवस कोकण किनारपट्टी, मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाचे धुमशान सुरू आहे. मुंबईत शनिवारी एकाच दिवसात तब्बल 234 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दहा वर्षांतील पावसाची ही

दुसरी विक्रमी नोंद

आहे. अजिबात विश्रांती न घेता पाऊस कोसळत राहिला तर निसर्गनियमाप्रमाणे सखल भागांत पाणी साचतेच आणि पावसाचा जोर कमी होऊ लागतो, तसा पाण्याचा निचराही होऊ लागतो. मात्र, धो धो कोसळणाऱ्या पावसात ‘ब्रेकिंग न्यूज’वाले ठराविक दोन-चार सखल भाग निवडून तिथे पोहोचतात आणि घसा कोरडा करू लागतात. देशात सर्वाधिक पाऊस झेलणाऱ्या या महानगरातील साचलेल्या पाण्याचा विक्रमी वेळेत जो निचरा होतो आणि महापालिकेचे कर्मचारी त्यासाठी कसे कष्ट घेतात, त्याचे ‘थेट प्रक्षेपण’ मात्र मीडिया दाखवत नाही. मुंबई, कोकण परिसरात धबधब्याप्रमाणे कोसळणाऱ्या पावसाची महाराष्ट्राच्या अन्य भागांत मात्र अजूनही प्रतीक्षा आहे. मान्सूनचा पाऊस सर्व जिह्यांत पोहचला असला, तरी अजूनही 100 टक्के पेरण्यांसाठी तो पुरेसा नाही. जमिनीतील पाण्याची पातळीही जैसे थे आहे. मराठवाड्यासह राज्याच्या अनेक जिह्यांत टँकर्सची संख्या पावसाळ्यातही वाढतेच आहे. मुंबई, कोकणात दणक्यात आलेल्या पावसाचे स्वागत करतानाच दुष्काळग्रस्त मराठवाडा व राज्याच्या सर्वच भागांत मान्सूनने मुक्त हस्ते बरसात करावी आणि राज्यातील शेतकरी जगवावा, हीच त्या वरुणराजाकडे प्रार्थना!

आपली प्रतिक्रिया द्या