
2020 या वर्षात पाकिस्तानने आतापर्यंत सुमारे 2700 पेक्षा जास्त वेळेस शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार केला. त्यात 21 निरपराध हिंदुस्थानी नागरिक मारले गेले, तर 94 जखमी झाले. त्यात नेपाळी गोळीबाराची भर पडली आहे. म्हणजे आधी पाकिस्तानच सीमेपलीकडून गोळीबार करीत होता. आता नेपाळी बंदुकाही धडाडू लागल्या आहेत आणि निरपराध हिंदुस्थानींचे जीव घेत आहेत. पाकड्यांच्या बंदुका आपण थांबवू शकलो नाही, तसे नेपाळबाबत होऊ नये. नेपाळी बंदुकांच्या नळ्या आताच मोडल्या पाहिजेत. अन्यथा पाकिस्तानसोबतच नेपाळ सीमेवर गोळीबार हीदेखील नेहमीची डोकेदुखी होऊन बसेल.
हिंदुस्थान-चीन सीमेवर तूर्त तणावपूर्ण शांतता असली तरी पाकिस्तान आणि नेपाळ सीमा मात्र पलीकडून होणार्या गोळीबाराच्या फैरींनी अशांत आहेत. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार करणे हा नेहमीचाच प्रकार आहे, परंतु आता नेपाळकडून होणार्या गोळीबाराचे प्रकारही वाढू लागले आहेत. हे जास्त चिंताजनक आहे. गेल्या महिन्यात नेपाळच्या सशस्त्र दलाकडून बिहारमधील सीतामढी या सीमावर्ती गावात गोळीबार करण्यात आला होता. त्यात शेतात काम करणार्या एका हिंदुस्थानी नागरिकाचा मृत्यू झाला होता. ही घटना नारायणपूर आणि लालबंदी सीमाभागात घडली होती. आता पुन्हा तीच आगळीक नेपाळी पोलिसांनी केली आहे. बिहारमधीलच किशनगंज भागातील नेपाळ सीमेवर हा प्रकार घडला आहे. या गोळीबारातही एक हिंदुस्थानी नागरिक जखमी झाला आहे. नेपाळकडून एका महिन्यात दुसर्यांदा हिंदुस्थानी भागात अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. आधी नेपाळने हिंदुस्थानचा काही भूभाग आपलाच म्हणून दावा ठोकला. त्यानुसार आपला नवीन नकाशा बनवून त्यात बदल होणार नाही अशा गमजा केल्या. त्यासाठी घटनादुरुस्तीही केली. पुन्हा नेपाळी सत्ताधार्यांचे हिंदुस्थानविरोधी गरळ ओकणे सुरूच आहे. त्यात आता दुसर्यांदा हिंदुस्थानी सीमेवर गोळीबार करून आपण
चीन आणि पाकिस्तानचे बोट
धरूनच चालणार हे नेपाळने पुन्हा दाखवून दिले आहे. एक हात चिन्यांच्या हातात तर दुसरा पाकड्यांच्या हातात. लडाख सीमेवर चीन तूर्त शांत असला तरी नेपाळ आणि पाकिस्तानला सीमेवर गोळीबार करायला लावून हिंदुस्थानी सीमा अशांत ठेवण्याचा डाव तो देश खेळत आहे. नेपाळ सीमेवर नेपाळने आणि जम्मू-कश्मीर सीमेवर पाकिस्तानने गोळीबार करणे हा याच डावाचा भाग आहे. 17 जुलै रोजी पाकड्यांनी पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. जम्मू- कश्मीर सीमेवरील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाक सैन्याने गोळीबार केला. त्यात एका लहान मुलासह तीन निरपराध हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाला. हे तिघेही एकाच कुटुंबातील होते. वर्षानुवर्षे हे सुरू आहे. जम्मू-कश्मीरमधील सीमावर्ती नागरी वस्त्यांवर बेछूट गोळीबार करायचा, उखळी तोफांचा मारा करायचा हे पाकड्यांचे उद्योग थांबायला तयार नाहीत. आपले सैनिक या प्रत्येक हल्ल्याला मूँहतोड जबाब देतात. कधी सर्जिकल स्ट्राइक करून जबरदस्त बदला घेतात. जम्मू-कश्मीरमधील दहशतवाद्यांचा खात्मा करतात हे सगळे ठीकच आहे, पण पाकिस्तानचे शस्त्रसंधी उल्लंघन आणि सीमेपलीकडून गोळीबार कधी थांबणार, तो थांबविण्यात आमचे राज्यकर्ते
कधी यशस्वी होणार
हे प्रश्न आहेतच. याच महिन्यात कश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला होता आणि अहमद खान हे आजोबा ठार झाले होते. त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या अयाद या नातवाला आपल्या जवानांनी वाचवले होते. मात्र अहमद खान यांच्या छातीवर बसून रडणार्या अयादचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि 370 कलम हटविल्यानंतरही कश्मीरमधील अंतर्गत सुरक्षा नेमकी कशी आहे यावर चर्चा झाली होती. म्हणजे कश्मीरही अशांत आणि कश्मीरची सीमादेखील अशांत. 2020 या वर्षात पाकिस्तानने आतापर्यंत सुमारे 2700 पेक्षा जास्त वेळेस शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार केला. त्यात 21 निरपराध हिंदुस्थानी नागरिक मारले गेले, तर 94 जखमी झाले. त्यात नेपाळी गोळीबाराची भर पडली आहे. म्हणजे आधी पाकिस्तानच सीमेपलीकडून गोळीबार करीत होता. आता नेपाळी बंदुकाही धडाडू लागल्या आहेत आणि निरपराध हिंदुस्थानींचे जीव घेत आहेत. पाकड्यांच्या बंदुका आपण थांबवू शकलो नाही, तसे नेपाळबाबत होऊ नये. नेपाळी बंदुकांच्या नळ्या आताच मोडल्या पाहिजेत. अन्यथा पाकिस्तानसोबतच नेपाळ सीमेवर गोळीबार हीदेखील नेहमीची डोकेदुखी होऊन बसेल.






























































