सामना अग्रलेख – बदललेली वादळवाट… ‘निसर्ग’ आहे साथीला!

चक्रीवादळाने मुंबईची वाट सोडून ठाणे, नाशिक, पुणे, नगरमार्गे उत्तर महाराष्ट्र असा मार्ग निवडल्याने मुंबईला निर्माण झालेला संभाव्य धोका टळला. कोरोनापाठोपाठ मुंबई-कोकणवर ओढवलेल्या चक्रीवादळाच्या संकटात निसर्गाची साथ महाराष्ट्राला मिळाली. वादळवाटेवर आरूढ होऊन काम करणार्‍या सरकारच्या मार्गावरून चक्रीवादळानेही वाट बदलली. अचानक बदललेली वादळवाट हा महाराष्ट्रासाठी शुभसंकेतच म्हणायला हवा!

मुंबईवर ओढवलेले शंभर वर्षांतील सर्वात मोठे संकट अखेर टळले आहे. आधीच मुंबईसह अवघा महाराष्ट्र कोरोनाच्या वैश्विक संकटाशी झुंज देत आहे. त्यातच ‘निसर्ग’ या शक्तिशाली चक्रीवादळाचे संकट मुंबईवर चाल करून आल्याने काय होणार, कसे होणार यावरून भलताच कोलाहल माजवला गेला. वादळापेक्षाही कानांवर 24 तास  आदळणार्‍या बातम्यांच्या तडाख्यांनीच भयावह वातावरण निर्माण केले. अरबी समुद्रात तयार झालेले ‘निसर्ग’ हे चक्रीवादळ मुंबई आणि कोकणला जबर तडाखा देणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. हा अंदाज काळ आणि वेळेच्या बाबतीत बर्‍याच अंशी खरा ठरला. तथापि, अलिबागच्या किनारपट्टीला ताशी 120 कि.मी.च्या वेगाने धडकल्यानंतर चक्रीवादळ सुमारे 50 किलोमीटर दक्षिणेकडे सरकले. समुद्रावरून प्रचंड वेगाने घोंघावत येणारे चक्रीवादळ जमिनीशी स्पर्श झाल्यानंतर आपोआपच मंदावते आणि किनारपट्टीपेक्षा जमिनी भागात संहार अथवा विनाश करण्याची त्याची क्षमता कमी होते, हा शास्त्रीय सिद्धांत आहे. तो निश्चितच महाराष्ट्राच्या पथ्यावर पडला, असे म्हणावे लागेल. अलिबाग, रायगड, रत्नागिरी या कोकणातील जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाने आपले रौद्ररूप नक्कीच दाखवले. वादळी वारे आणि मुसळधार पाऊस यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले, विजेचे खांब, मोबाईल टॉवर्स कोसळले. अनेक कच्च्या घरांचे नुकसान झाले. वेगवेगळ्या घटनांत तीन जणांचा मृत्यू झाला. मुंबई, पालघरमध्येही वादळी पाऊस झाला, पण हे शक्तिशाली ‘निसर्ग’ चक्रीवादळ मुंबई आणि उपनगरांत

महासंहार घडविण्याची भीती

व्यक्त केली जात होती. ती खोटी ठरली, हे सुदैवच म्हणावे लागेल. कोकण किनारपट्टीला धडकल्यानंतर चक्रीवादळाने मुंबईची वाट सोडून ठाणे, नाशिक, पुणे, नगरमार्गे उत्तर महाराष्ट्र असा मार्ग निवडल्याने मुंबईला निर्माण झालेला संभाव्य धोका टळला. एका बाजूला समुद्र आणि दुसर्‍या बाजूला कमी जागेत 2 कोटींची दाट लोकवस्ती. अशा परिस्थितीत कुठलीही आपत्ती मुंबईच्या मुळावर आली तर ती धोकादायकच ठरू शकते. निसर्गानेही हा धोका ओळखला असावा. त्यामुळेच कोकण, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक-खान्देशात वेगवान वार्‍यासह धो धो पाऊस पाडून निसर्ग चक्रीवादळ उत्तरेकडे मार्गस्थ झाले. दैव बलवत्तर म्हणा, देवादिकांची साथ म्हणा, साफ नियतीची पुण्याई म्हणा किंवा काही, पण अगदी उंबरठ्यापर्यंत आलेले हे महाकाय संकट धडकी भरवून पण केवळ दारावर धडक देऊनच निघून गेले. अर्थात पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आदी राज्यांमध्ये चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर जो भयंकर विनाश होतो, तसा महाराष्ट्रात होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे जे नियोजनबद्ध जाळे विणले होते, त्यालाही पैकीच्या पैकी गुण द्यावेच लागतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मुंबईपासून कोकणपर्यंत संपूर्ण किनारपट्टीवर आपत्ती निवारणाची सारी यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज ठेवली होती. राज्य सरकारने मुंबईतील सुमारे 25 हजार लोकांना आणि पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत कोकणातील शेकडो गावांतील

हजारो लोकांना सुरक्षित स्थळी

हलविले होते. मुंबई महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग पाच हजार कॅमेर्‍यांच्या माध्यमातून डोळ्यांत तेल घालून या आस्मानी संकटावर नजर ठेवून होता. मुसळधार पावसाने पाणी साचलेच तर पाणी उपसण्यासाठी 300 पंप सज्ज ठेवले होते. 1 हजार पोलीस, अग्निशमन दल आणि बचाव कार्यासाठी तात्काळ धाव घेणारी 96 पथके मुंबईभर तैनात होती. केंद्रीय सरकारनेही तातडीने एनडीआरएफच्या तुकड्या पाठवून मोलाचे सहकार्य केले. मुंबई व कोकणच्या रक्षणासाठी सरकारने केलेली सगळी पूर्वतयारी, सज्जता आणि खबरदारीच्या उपाययोजना यात कोणतीही कसूर नव्हती. सुदैवाने या सज्जतेची फारशी गरज भासली नाही. चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर अलिबाग, मुरुड, श्रीवर्धनपासून जिथे जिथे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई देण्याच्या दृष्टीने पंचनामेही तातडीने सुरू झाले आहेत. सरकार चक्रीवादळाचे संकट संवेदनशीलतेने हाताळत असतानाच काही असंवेदनशील मंडळींनी मुंबईचे किती नुकसान होते आणि आपण कशी तावातावाने आणि किंचाळून वगैरे टीका करायची, याची रंगीत तालीमही करून ठेवली होती. वादळ धडकण्यापूर्वीच दांडेकर मंडळींशी त्यांच्या धडका म्हणा किंवा जोरबैठका सुरूही झाल्या होत्या. तथापि, वादळावरून ‘चक्री’ फिरविण्याचे त्यांचे मनसुबे इथेही सपशेल फसलेच. कोरोनापाठोपाठ मुंबई-कोकणवर ओढवलेल्या चक्रीवादळाच्या संकटात ‘निसर्गा’ची साथ महाराष्ट्राला मिळाली. वादळवाटेवर आरूढ होऊन काम करणार्‍या सरकारच्या मार्गावरून चक्रीवादळानेही वाट बदलली. अचानक बदललेली वादळवाट हा महाराष्ट्रासाठी शुभसंकेतच म्हणायला हवा!

आपली प्रतिक्रिया द्या