
प्रे. ट्रम्प यांना अमेरिकेचाच नव्हे तर जगाचा हुकूमशहा व्हायचे आहे. रशियाचे पुतीन आणि चीनचे शी जिनपिंग यांचेही स्वप्न तेच आहे. भारतातही मोदी यांना त्यांच्या अंधभक्तांनी ‘विश्वगुरू’पदी बसवून ठेवलेच आहे. प्रश्न इतकाच आहे की, अमेरिकेत जनतेने ट्रम्प यांच्या विरोधात रविवारी जसा तिसऱ्यांदा ‘एल्गार’ पुकारला तसे इतर हुकूमशाही राजवटींमध्ये कधी घडेल? ट्रम्प महाशय जागतिक शांततेची कबुतरे रोज उडवीत असले तरी त्यांच्याच विरोधात अमेरिकन जनता प्रचंड अशांत आहे. याच अशांततेची आग आता ट्रम्प यांच्या बुडाला लागली आहे. जगभरात कोठेही हुकूमशाही उतू-मातू लागली की लोकशाहीचा आत्मा जागा होतो. हा इतिहास आहे!
जगातील वेगवेगळ्या देशांमधील युद्धे आणि संघर्ष आपणच थांबवले, असे दावे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उठताबसता करीत असतात. जागतिक शांततेचे आपणच एकमेव ठेकेदार आहोत, नियतीने ती जबाबदारी फक्त आपल्या एकट्यावरच सोपवली आहे, अशाच तोऱ्यात ते तोंडाच्या वाफा दवडत असतात. प्रत्यक्षात आता ट्रम्प यांच्याच बुडाखाली अशांततेची आग लागली आहे. रविवारी अमेरिकेत ट्रम्प यांच्या विरोधात आतापर्यंतचे सर्वात मोठे जनआंदोलन झाले. तेथील 2600 शहरांमध्ये अमेरिकन जनतेने ट्रम्प यांच्या विरोधात भव्य मोर्चे काढले. सुमारे 70 लाख लोक ‘नो किंग्ज प्रोटेस्ट’ या ट्रम्पविरोधी निदर्शनात सहभागी झाले होते. ट्रम्प हे हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत, असा आरोप करीत रविवारी संपूर्ण अमेरिकेत जनतेने निदर्शने केली. खरे तर ट्रम्प महाशयांना फक्त अमेरिकेचाच नव्हे तर संपूर्ण जगाचाच हुकूमशहा व्हायचे आहे. त्यासाठीच त्यांनी जगावर ‘टॅरिफ युद्ध’ लादले. त्या माध्यमातून जागतिक व्यापार युद्ध सुरू केले. एकीकडे विविध देशांतील युद्धे आपण थांबवली असे तारे तोडायचे आणि दुसरीकडे स्वतःच जगाला व्यापार युद्धात ढकलायचे. जगाची
शांतता आणि अर्थव्यवस्था
धोक्यात आणायची. ट्रम्प महाशय त्यांच्या या निर्णयांना ‘अमेरिका फर्स्ट’ असा राष्ट्रवादी वगैरे मुलामा देत असले तरी प्रत्यक्षात त्यांच्या अनेक निर्णयांचा फटका अमेरिकन जनतेलाही बसत आहे. त्यात स्वतःच्याच आडमुठेपणामुळे त्यांच्या सरकारवर ‘शटडाऊन’ची आफत आली आहे. त्यामुळेही अमेरिकन जनतेत संताप आहे. त्याचा उद्रेक रविवारी झाला. ट्रम्प यांच्या विरोधात गेल्या जून आणि जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली होती. आता रविवारी तिसऱ्यांदा जनतेने रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला. अर्थात तरीही ट्रम्प यांचा तोरा कमी होण्याची आणि त्यांचे पाय जमिनीवर येण्याची चिन्हे नाहीत. देशातील जनता आपल्याविरोधात रस्त्यावर उतरली असताना हे महाशय फ्लोरिडा येथे ‘वीकेंड’ साजरा करीत आहेत. रविवारच्या ‘नो किंग्ज प्रोटेस्ट’ निदर्शनांबद्दल त्यांनी ‘मी राजा नाही’ असे म्हटले असले तरी दुसऱ्या बाजूला ‘गिरे तो भी उपर’ ही त्यांची मस्ती एका व्हिडीओमधून दाखवलीच आहे. ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केलेल्या एका एआय जनरेटेड व्हिडीओमध्ये ट्रम्प यांनी स्वतःला मुकूट घातलेल्या लढाऊ विमानाच्या
पायलटच्या रूपात
दाखवले आहे. तसेच त्यांच्या जेटवर ‘किंग ट्रम्प’ असे लिहिले आहे. ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकन जनतेत प्रचंड खदखद का आहे, याचे उत्तर ट्रम्प यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये त्यांनी दाखविलेल्या मुजोरपणात आणि आडमुठेपणात आहे. आपल्या दुसऱ्या कार्यकाळात ट्रम्प यांनी लोकशाही मूल्ये, न्याय वगैरे खुंटीवर टांगून ठेवले आहेत. सत्तेचा आणि अधिकारांचा ते सर्रास गैरवापर करीत आहेत. त्याविरोधातील जनआक्रोशाकडे दुर्लक्ष करीत आहेत. अमेरिकेपासून भारतापर्यंत जगाच्या वेगवेगळय़ा देशांमध्ये यापेक्षा वेगळे काय घडत आहे? प्रे. ट्रम्प यांना अमेरिकेचाच नव्हे तर जगाचा हुकूमशहा व्हायचे आहे. रशियाचे पुतीन आणि चीनचे शी जिनपिंग यांचेही स्वप्न तेच आहे. भारतातही मोदी यांना त्यांच्या अंधभक्तांनी ‘विश्वगुरू’पदी बसवून ठेवलेच आहे. प्रश्न इतकाच आहे की, अमेरिकेत जनतेने ट्रम्प यांच्या विरोधात रविवारी जसा तिसऱ्यांदा ‘एल्गार’ पुकारला तसे इतर हुकूमशाही राजवटींमध्ये कधी घडेल? ट्रम्प महाशय जागतिक शांततेची कबुतरे रोज उडवीत असले तरी त्यांच्याच विरोधात अमेरिकन जनता प्रचंड अशांत आहे. याच अशांततेची आग आता ट्रम्प यांच्या बुडाला लागली आहे. जगभरात कोठेही हुकूमशाही उतू-मातू लागली की लोकशाहीचा आत्मा जागा होतो. हा इतिहास आहे!