सामना अग्रलेख – पाटण्यातील मेळा, सुरुवात तर होऊ द्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2024 नंतर देशात लोकशाही संपवायची नसेल तर आज पाटण्यात जमणाऱ्या सर्व नेत्यांनी राष्ट्रहितासाठी विशाल मनाचे राजकारण करणे गरजेचे आहे. सगळे एकत्र येतील तेव्हाच मतदारांत आत्मविश्वासाची वावटळ उठेल. किमान 450 जागांवर एकास एक लढत होऊ शकेल व याच लढतीत भाजपचा पराभव होईल. कायदा, घटना, न्यायपालिका यांना न जुमानता सत्ता गाजवणाऱ्यांचे राज्य घालवायचेच या ईर्षेने पाटण्याच्या बैठकीत थोडे चिंतन–मंथन झाले आणि वज्रमूठ उगारली तर 2024 ला मोदी यांना ‘झोला’ खांद्यास लटकवून जावेच लागेल. पाटण्यात त्यासाठीच एकीचा नारा द्यायचा आहे!

आज रोजी बिहार राज्यातील पाटणा येथे देशातील प्रमुख राजकीय पक्षांची बैठक होत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे. आम्ही स्वतः या बैठकीस उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहेच, पण स्वतः श्री. राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, श्रीमान शरद पवार, डावे-उजवे-मधले वगैरे सर्वच विचारसरणीचे नेते या बैठकीत सामील होत आहेत. भाजप विरोधक पाटण्यात एकवटणार असे बोलणे चुकीचे आहे. लोकशाही, संविधानाच्या रक्षणासाठी देशभक्त पक्ष एकत्र येत आहेत, असेच बोलणे संयुक्तिक ठरेल. 1975 साली याच पाटण्याच्या भूमीवरून जयप्रकाश नारायण यांनी दुसऱ्या स्वातंत्र्याचा व क्रांतीचा नारा दिला होता व देशात क्रांतीचा वणवा पेटला होता. काँग्रेसच्या विरोधात त्यावेळी सर्वच राजकीय पक्ष एकवटले आणि एकमेकांत विलीन झाले होते. त्या एकीच्या वज्रमुठीने इंदिरा गांधींचाही पराभव झाला. त्या क्रांतीची ठिणगी पाटण्यातूनच पडली. म्हणून देशभक्त पक्षांच्या आजच्या पहिल्याच बैठकीसाठी पाटण्याची भूमी निवडली हे योग्यच झाले. आज देश हुकूमशाहीच्या मार्गाने नव्या गुलामगिरीकडे वाटचाल करीत आहे. पै. विष्णुशास्त्र्ााr चिपळूणकरांनी ‘आमच्या देशाची स्थिती’ या निबंधात तेव्हाच्या परदास्याबद्दल खंत व्यक्त केली होती. हे दास्य का आले याचे विवेचन केले होते, परंतु या देशाची मूळ प्रकृती बिघडली नसल्याचा निर्वाळा दिला होता. ते परदास्य म्हणजे गुलामी गेली, स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे पार झाली. नवे संसद भवन मोदींनी देशाला दिले, पण संसद भवनाच्या उद्घाटन सोहळय़ापासून देशाच्या महिला आदिवासी

राष्ट्रपतींनाच ठरवून दूर

ठेवले. संसदेतील विरोधी पक्षाने यावर टीका केली तेव्हा पंतप्रधानांना त्यात विरोधकांचेच कारस्थान दिसले. सध्या देशात एक प्रकारे बजबजपुरीच माजली आहे. मणिपूरसारखे पेटलेले राज्य मागे ठेवून पंतप्रधान मोदी अमेरिकेत ‘योग’ करीत आहेत. म्हणजे देशात सर्व बरे चालले आहे असेच त्यांना वाटत असावे. देशात लोकशाही, स्वातंत्र्य संकटात आहे. आपल्या राजकीय विरोधकांना श्वासही घेऊ द्यायचा नाही. सर्व सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना संपवून टाकायचे असे मोदी व त्यांच्या पक्षाचे ठाम मत आहे. त्यामुळे आपल्या देशाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होताना दिसत आहे. पण पंतप्रधान मोदी व त्यांच्या लोकांना ती तशी वाटत नाही. सध्या विरोधकांची जी गळचेपी व मुस्कटदाबी सुरू आहे त्यासाठी मोदी यांनी केंद्रीय यंत्रणांना खुली सूट दिली व तसे त्यांनी जाहीररीत्या बोलून दाखवले. पण यंत्रणांच्या कारवाईतून त्यांच्या पक्षात प्रवेश करून शुद्ध होणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांना, गुन्हेगारांना अभय मिळत आहे. हेच हुकूमशाहीचे पाऊल आहे. हे असेच सुरू राहिले तर 2024 ची लोकसभा निवडणूक ही देशातील शेवटची निवडणूक ठरेल व या देशात कधीकाळी लोकशाही होती यावर पुढची पिढी फक्त संशोधन करीत बसेल. त्यामुळे आज होणारा पाटण्यातील ‘मेळा’ हे ‘देश बचावो’ आंदोलन आहे. देशातील जनतेची मने पुरती मेलेली नाहीत हे कालच्या कर्नाटक विधानसभेच्या निकालांनी स्पष्ट केले. लोकांनी कर्नाटकात जो सुज्ञपणा दाखवला तो संपूर्ण देशात दाखवला पाहिजे व त्यासाठी आधी अठरापगड पक्षांनी ऐक्याची मोट बांधली पाहिजे. पाटण्याच्या पहिल्याच बैठकीत फार मोठय़ा चमत्काराची आशा धरता येणार नाही, पण सुरुवात होत आहे व अनेक तोंडे एकत्र बसून विचार करतील हे महत्त्वाचे. देशातील

बहुतेक राज्यांत

भाजप नाही. तेथे प्रादेशिक पक्षांचीच सरकारे आहेत. त्यांना केंद्राशी काम पडते व केंद्र त्या माध्यमातून राज्यांचे व तेथील सरकारांचे शोषण करते. तामीळनाडूच्या ऊर्जा मंत्र्यांना ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी फरफटत नेले. दिल्लीतील ‘आप’चे दोन मंत्री तुरुंगात आहेत. महाराष्ट्रात नवाब मलिक आजही तुरुंगात आहेत. प. बंगालात तृणमूलचे मंत्री व आमदार तुरुंगात आहेत. मुंबईत महापालिकेच्या लुटमारीविरोधात शिवसेना मोर्चा काढणार हे जाहीर करताच लगेच ‘ईडी’वाले भाजपच्या गणवेशात घुसतात व धाडी घालतात. या दडपशाहीविरोधात ‘ऐक्य’ दाखवायला हवे. आधी एकत्र या व मग पुढचे बोलू. आप, केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीसारख्या पक्षांना राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेचे धुमारे फुटले आहेत. पण त्यामुळे अप्रत्यक्षपणे मोदी व त्यांच्या हुकूमशाहीलाच पाठबळ मिळणार आहे. 2024 नंतर देशात लोकशाही संपवायची नसेल तर आज पाटण्यात जमणाऱ्या सर्व नेत्यांनी राष्ट्रहितासाठी विशाल मनाचे राजकारण करणे गरजेचे आहे. सगळे एकत्र येतील तेव्हाच मतदारांत आत्मविश्वासाची वावटळ उठेल. मोदींचा प्रयत्न या ना त्या मार्गाने भाजप विरोधकांची एकजूट तोडण्याचा आहे. किमान 450 जागांवर एकास एक लढत होऊ शकेल व याच लढतीत भाजपचा पराभव होईल. मोदी यांनी कितीही नाटय़प्रयोग केले तरी त्यांचा दारुण पराभव होऊ शकतो हे देशातील अनेक राज्यांनी दाखवून दिले. कायदा, घटना, न्यायपालिका यांना न जुमानता सत्ता गाजवणाऱ्यांचे राज्य घालवायचेच या ईर्षेने पाटण्याच्या बैठकीत थोडे चिंतन-मंथन झाले आणि वज्रमूठ उगारली तर 2024 ला मोदी यांना ‘झोला’ खांद्यास लटकवून जावेच लागेल. पाटण्यात त्यासाठीच एकीचा नारा द्यायचा आहे!