
संयुक्त महाराष्ट्र लढ्यात शाहीर अमरशेखांची ललकारी आजही महाराष्ट्राच्या कणाकणांत घुमते आहे, पण हिंदुत्वास विकृत स्वरूप देऊन काहींना राजकीय आगी लावायच्या आहेत. त्यांच्या पार्श्वभागास सरसंघचालकांच्या भूमिकेने आग लागली आहे. हिंदुस्थानातील हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच आहे. त्यामुळे दोन्ही समाजांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे. आपण सगळे एकाच बोटीत आहोत. बोट बुडाली तर सगळेच बुडतील ही सरसंघचालकांची भूमिका राष्ट्र निर्माणाची आहे. त्याबद्दल त्यांचे स्वागत करावे तेवढे थोडेच!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील सत्तरहून अधिक मौलवी आणि मुस्लिम विचारवंतांची भेट घेतली. श्री. भागवत यांनी या सगळ्या मंडळींशी सविस्तर चर्चा करून चहापान केले. त्यांचे मनोगत समजून घेतले. देशात भाजपमधील काही मंडळींकडून जे धार्मिक तणावाचे वातावरण निर्माण केले जात आहे, मुस्लिम समाजास लक्ष्य केले जात आहे, त्यावर या बैठकीत चर्चा झाली. श्री. भागवत व या मंडळींची बैठक तब्बल तीन तास चालली. सरसंघचालकांनी मुस्लिम विचारवंतांची वेदना आणि भूमिका समजून घेतली. अर्थात, मुसलमान समुदायासोबत संघाने जवळीक साधण्याचा केलेला हा प्रयत्न भाजपमधील बाटग्या हिंदुत्ववाद्यांना रुचेल काय? विशेषतः उत्तर प्रदेश, आसाम, महाराष्ट्र, दिल्लीतील भाजपमधील नवहिंदुत्ववाद्यांनी अलीकडे हिंदुत्वाच्या नावाने जो हैदोस घातला आहे, त्यांना सरसंघचालकांचे हे पाऊल पटणार नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील नवे टिळेधारी नितेश राणे यांना तर भागवत यांच्या भूमिकेमुळे धक्काच बसला असेल व त्यामुळे मंत्री राणे हे राजीनामाच देतील. कारण मुसलमानांच्या बाबतीत या महाशयांनी गेल्या काही दिवसांत जी गरळ ओकली, ती पाहता सरसंघचालकांची सध्याची भूमिका अशा मंडळींना पटणार नाही. राजकीय स्वार्थ व मतांच्या धुवीकरणासाठी मुसलमानांना ‘लक्ष्य’ करून हिंदू समाजाला उचकवायचे व तेढ निर्माण करण्यात, ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ यांसारख्या घोषणा विधानसभा निवडणुकांत देऊन हिंदू-मुसलमान अशी दरी निर्माण करण्यात हे लोक पुढे होते. या सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, महाराष्ट्रात संतोष देशमुख, महादेव मुंडे, हर्षल पाटील यांच्यासह गेल्या तीन महिन्यांत
700 शेतकऱ्यांचे बळी
गेले. ते काही मुसलमानांनी घेतले नाहीत, तर स्वतःला महान हिंदुत्ववादी समजणाऱ्या ढोंगी मंडळींनी घेतले. भारतात सध्या जे घडत आहे त्यास मोदींचेच सरकार जबाबदार आहे. पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. त्यात 26 महिलांचे कपाळ उजाड झाले. ते बळी पाकड्यांनी घेतले, पण 26 निरपराध्यांच्या मारेकऱ्यांना हिंदुत्ववादी गृहमंत्री अमित शहा अद्याप पकडू शकलेले नाहीत. पंतप्रधान मोदी हे तर समाधी अवस्थेत असल्याने या सगळ्यांवर मौन बाळगून आहेत. हिंदूंचे बळी सरकारनेच घ्यायचे व पुन्हा ‘बटेंगे तो कटेंगे’ वगैरे घोषणा करत सुटायचे. हीच मंडळी वक्फ बोर्डाच्या कायद्यात सुधारणा करीत आहे. त्यावरही मुस्लिमांचे नेते नाराज आहेत. वक्फ बोर्डाच्या मोक्याच्या जमिनी भाजपला त्यांच्या उद्योगपती मित्रांना विकायच्या आहेत. हे झाले तर भाजपच्या कारस्थानी चेहऱ्यावरचा आणखी एक मुखवटा गळून पडेल. महाराष्ट्रातील काही बनावट हिंदुत्ववाद्यांनी गुवाहाटीच्या मंदिरात जाऊन रेडे कापले. हे असे कर्मकांड हिंदू धर्मात सांगितलेले नाही. हिंदू धर्मात हजारो दोष असतील, परंतु त्या दोषांवर प्रहार करणारे विचारवंत आणि सुधारक याच समाजातून उदयास आले. त्यांनी केलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे हिंदू धर्मातील दुष्ट रुढींची चौकट खिळखिळी होऊ शकली. आजही जातीयवाद आहे आणि अंधश्रद्धा, कर्मकांडाचे स्तोम माजवले जाते. त्यास विरोध करणारे नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी यांचे खून कर्मकांडी लोकांनी केले. त्यामुळे सर्वच धर्मांतील व समाजातील धर्मांधता नष्ट होणे हेच राष्ट्रहिताचे आहे. सध्याचे
हिंदुत्ववादी मर्त्य मानव
नरेंद्र मोदी यांना ईश्वर, विष्णूचा अवतार मानू लागले. हेसुद्धा कर्मकांडाचे रूप आहे. पुन्हा हे विष्णूचे अवतार रोज उठून खोटे बोलतात व भक्त त्या खोटेपणावर टाळ्या वाजवतात. हे असले हिंदुत्व घातक व राष्ट्रविघातक आहे. भारतात फक्त आम्हीच राहू व इतर धर्मीयांना ‘मत’ देण्याचाही अधिकार नाही हे ठरवून आधी महाराष्ट्रातून व आता बिहारमधून मुसलमान, ख्रिश्चन व दलितांची नावे वगळली जात आहेत. सरसंघचालक भागवत व मुस्लिम विचारवंतांमधील हाच खरा चिंतनाचा विषय असावा. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व देश उभारणीत मुस्लिम समुदायाचा सहभाग महत्त्वाचा होता. मुस्लिमांनी क्रांतीत सहभाग घेतला व हौतात्म्य पत्करले तेव्हा आजचा ‘भाजप’ जन्मास आला नव्हता. पाकिस्तानबरोबरच्या प्रत्येक युद्धात मुसलमान सैनिकांनी बलिदान दिले. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या दरम्यान पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात पुंछ’, राजौरीतील 16 भारतीय नागरिक मरण पावले. तेदेखील मुसलमान होते. महाराष्ट्रात हमीद दलवाई, युसूफ मेहेरअली यांची नावे बाटग्यांच्या कानावरून गेली नसतील तर त्यांनी कान साफ करून घेतले पाहिजेत. संयुक्त महाराष्ट्र लढय़ात शाहीर अमरशेखांची ललकारी आजही महाराष्ट्राच्या कणाकणांत घुमते आहे, पण हिंदुत्वास विकृत स्वरूप देऊन काहींना राजकीय आगी लावायच्या आहेत. त्यांच्या पार्श्वभागास सरसंघचालकांच्या भूमिकेने आग लागली आहे. हिंदुस्थानातील हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच आहे. त्यामुळे दोन्ही समाजांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे. आपण सगळे एकाच बोटीत आहोत. बोट बुडाली तर सगळेच बुडतील ही सरसंघचालकांची भूमिका राष्ट्र निर्माणाची आहे. त्याबद्दल त्यांचे स्वागत करावे तेवढे थोडेच!