सामना अग्रलेख – अरे, भल्या माणसा! मुंबई मराठी माणसाची नाही काय?

मुंबई धनिकांच्या हस्तकांसाठी काय असेल ती असेल, पण मुंबई सगळ्यात आधी महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईवर पहिला हक्क मराठी माणसाचाच आहे. शिंदे यांचा पक्ष अमित शहांच्या मालकीचा आहे. त्यामुळे मुंबईवरील मराठी माणसांचे ‘स्वामित्व’ शिंदे यांच्या मिंध्या खासदारांना मान्य नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा त्यांना अधिकार नाही. जरांगे-पाटील म्हणतात त्याप्रमाणे शिंदे हा भला माणूस असेल तर या भल्या माणसाने त्याच्या मराठीद्वेष्ट्या खासदाराची हकालपट्टी करायला हवी. कारण मराठा समाजाच्या आंदोलनास, मराठी माणूस मुंबईत एकवटण्यास त्याने विरोध केला. भला माणूस त्याच्या खासदारावर ही कारवाई करेल काय?

मनोज जरांगे-पाटील यांनी सांगितले आहे की, ‘‘एकनाथ शिंदे हा भला माणूस आहे.’’ अर्थात जरांगे-पाटील तसे म्हणत आहेत त्यामुळे शिंदे हे भला माणूस ठरत नाहीत. त्यासाठी भल्या माणसांसंदर्भातील व्याख्या बदलावी लागेल किंवा भल्या माणसांच्या व्याख्येसंदर्भात फडणवीसांना आणखी एका उपसमितीचे गठन करावे लागेल. आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे-पाटलांनी मुंबईत येऊन उपोषण, आंदोलन केले. ते यशस्वी झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठ्यांचे आंदोलन संयमी पद्धतीने हाताळले. त्यांच्यावर चौफेर शिव्यांचा वर्षाव होत असतानाही मुख्यमंत्री फडणवीस विचलित झाले नाहीत हे मान्य करावे लागेल व शेवटी ज्या गोष्टी मान्य करता येणे शक्य होते त्या सर्व मागण्या मान्य करून पाटील व त्यांच्या हजारो समर्थकांना गावाकडे परतण्याची वाट निर्माण करून दिली. जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी स्वतःचे प्राण पणास लावले. जरांगे-पाटील हा नक्कीच भला माणूस आहे. त्यांनी मनावर घेतले नसते तर मराठा समाजाला काहीच हाती लागले नसते. त्यामुळे जरांगे-पाटील यांचे या लढ्यातील श्रेय मोलाचे आहे, पण हे श्रेय जितके जरांगेंचे आहे, तितकेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आहे. मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढला व आंदोलनाचा शेवट गोड झाला. हायकोर्टाने जरांगे यांना मुंबई सोडण्याची अंतिम मुदत दिल्यावर कोणाच्याच हाती काही राहिले नव्हते. पाटलांच्या समर्थकांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता तर तो उच्च न्यायालयाचा अवमान ठरला असता व दुसरेच कायदेशीर त्रांगडे निर्माण झाले असते. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी धावाधाव करून आंदोलकांच्या बहुतेक मागण्या मान्य केल्या. मुख्यमंत्री म्हणजे शेवटी सरकारच असतात. मंत्री वगैरे कितीही पॉवरफुल असले तरी सरकार हे मुख्यमंत्र्यांच्याच हुकुमाने चालते. याचा अर्थ शिंदे, अजितदादा पवार वगैरे लोकांना कमी लेखावे असे नाही, पण शिंदे हे भले आहेत हे सांगताना मनोज जरांगे-पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी

अतिजहाल भाषेचा

वापर केला. या सर्व प्रकरणात टीकेचे धनी मुख्यमंत्री झाले व भलतेच लोक ‘भले’ ठरले. हे अनाकलनीय आहे. प्रश्न भल्या माणसाचा नसून त्याच्या विचारसरणीचा आहे. मराठा समाजाच्या आंदोलनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांतला मराठी तरुण एकवटला. चार-पाच दिवस मुंबईच्या रस्त्यावर, समुद्रावर तो फिरला. गावाकडून आणलेली चटणी-भाकर त्याने रस्त्यावर बसूनच खाल्ली. त्यामुळे दक्षिण मुंबईतील धनिक मंडळाने आता आक्षेप घेतला आहे व त्या धनिक मंडळाचे प्रतिनिधी खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आंदोलनासंबंधी आक्षेप नोंदवला आहे. दक्षिण मुंबईत मंत्रालय परिसरात कोणत्याही आंदोलनास यापुढे परवानगी देऊ नये असा ‘पियानो’ खासदार देवरा यांनी वाजवला. खासदार देवरा हे अमित शहा पुरस्कृत शिंदे गटाचे खासदार आहेत व त्यामुळेच दक्षिण मुंबईत झालेल्या मराठी जनांच्या आंदोलनास त्यांनी अशा प्रकारे विरोध केला. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी, उद्योग-व्यवसायाची कार्यालये वगैरेंची जागा असल्याचे खा. देवरा म्हणतात. जगातल्या कोणत्याही प्रमुख राजधानीच्या शहरात अशा प्रकारच्या आंदोलनांना परवानगी मिळत नाही, असेही खा. देवरा यांचे म्हणणे आहे, पण ते सपशेल चुकीचे आहे. प्रे. ट्रम्प यांच्या हुकूमशाहीविरोधात अमेरिकन जनता रस्त्यावर उतरली व तब्बल 1600 ठिकाणी आंदोलन झाले. शिकागो हे व्यापारी शहर आणि राज्य या आंदोलनाचे मुख्य केंद्र होते. अटलांटा, सेंट लुईस, कॅलिफोर्निया, मेरीलॅण्ड आणि न्यूयॉर्क, वॉशिंग्टन येथेही ट्रम्प यांच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले. इतकेच नव्हे, तर अमेरिकन लोकशाहीचे प्रतीक समजल्या जाणाऱया ‘कॅपिटल हिल’ इमारतीमध्ये प्रे. ट्रम्प यांच्या समर्थकांनी आंदोलनाच्या नावाखाली हिंसाचार केला होता. युरोपातील अनेक राष्ट्रांत राजधानीच्या शहरात

नेहमीच आंदोलने

होतात. राजधानीच्या शहरात आंदोलन करणे हा लोकशाहीने नागरिकांना दिलेला अधिकार आहे. त्यामुळे मुंबईत येऊन मराठी माणसाने आंदोलन करू नये, अशी भाषा करणे, त्यातही खास करून धनिकांचे बंगले असलेल्या दक्षिण मुंबईत आंदोलने वगैरेवर बंदी आणा, अशी मागणी करणे हे समस्त मराठी बांधवांसाठी अन्याय करणारे आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा सगळ्यात मोठा वणवा याच दक्षिण मुंबईतून पेटला होता. त्या वेळी मराठी माणसांचे मोर्चे ‘फोर्टा’त निघाले व मोरारजींचा गोळीबारही ‘फोर्टा’तल्या मोर्चावर झाला. 106 हुतात्म्यांतील बहुसंख्य हुतात्मे याच दक्षिण मुंबईत धारातीर्थी पडले. त्या हुतात्म्यांचे स्मारकदेखील दक्षिण मुंबईतच आहे. महात्मा गांधींनी इंग्रजांना ‘चले जाव’चा नारा याच दक्षिण मुंबईतून दिला होता. मराठी माणूस, श्रमिक गिरणी कामगारांचा घाम, रक्त येथे सांडले म्हणून दक्षिण मुंबईत धनिकांचे इमले उभे राहिले, पण शिंदे सेनेचे खासदार देवरा म्हणतात, दक्षिण मुंबईत मराठी माणसांना आंदोलनास परवानगी देऊ नये. देवरा असेही म्हणतात, ‘‘आर्थिक राजधानी आंदोलनामुळे थांबायला नको.’’ श्रीमान देवरा, भयंकर बॉम्बस्फोटांनंतरही मुंबई थांबली नव्हती. हेच मुंबईचे वैशिष्ट्य आहे. मुंबई आंदोलनाने थांबणार नाही, पण मोदी-शहांचे हस्तक उद्योगपती मुंबई गिळण्याचा प्रयत्न करीत आहेत. तो गंभीर विषय आहे. मुंबई या धनिकांच्या हस्तकांसाठी काय असेल ती असेल, पण मुंबई सगळ्यात आधी महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईवर पहिला हक्क मराठी माणसाचाच आहे. शिंदे यांचा पक्ष अमित शहांच्या मालकीचा आहे. त्यामुळे मुंबईवरील मराठी माणसांचे ‘स्वामित्व’ शिंदे यांच्या मिंध्या खासदारांना मान्य नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा त्यांना अधिकार नाही. जरांगे-पाटील म्हणतात त्याप्रमाणे शिंदे हा भला माणूस असेल तर या भल्या माणसाने त्याच्या मराठीद्वेष्ट्या खासदाराची हकालपट्टी करायला हवी. कारण मराठा समाजाच्या आंदोलनास, मराठी माणूस मुंबईत एकवटण्यास त्याने विरोध केला. भला माणूस त्याच्या खासदारावर ही कारवाई करेल काय?