
राजकारणात कोणी साधू-संत नाही व कोणी स्वतःला तसे समजण्याचा प्रयत्न करू नये. पण हाती पोलीस, तपास यंत्रणा, बदनामी मोहिमेस साथ देणारी प्रसिद्धीमाध्यमे आहेत म्हणून कोणत्याही थराला जायचे या दुष्टचक्रातून आपले राजकारणी बाहेर पडणार आहेत की नाही? गेल्या 10 वर्षांत या वाळवीने राजकारणास कीड लागली आहे. न्यायालयात न्याय मिळतो, पण त्या क्षणापर्यंत होणाऱया बदनामीचे काय? छळवणूक, मानसिक यातनांच्या अंधाऱया गुहेतून श्री. थरुर बाहेर पडले, पण साडेसात वर्षांनंतर त्याची भरपाई कशी होणार? आणि सुनंदाचे काय झाले? हा प्रश्न तर तसाच राहील. अर्थात मीडिया व भाजपवाल्यांना आता त्याचे काहीच पडलेले नाही.
सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणातून शशी थरुर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना आरोपमुक्त केले. म्हणजे राजकीय भाषेत ‘क्लीन चिट’ दिली. शशी थरुर हे काँग्रेसचे एक विद्वान नेते आहेत. राजकारणात प्रवेश करण्याआधी थरुर हे संयुक्त राष्ट्रसंघात हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करीत होते. शशी थरुर हे लेखक, व्याख्याते, विचारवंत म्हणून परिचित आहेत. 17 जानेवारी 2014 मध्ये ज्यांचा दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलात मृत्यू झाला त्या सुनंदा पुष्कर या थरुर यांच्या पत्नी होत्या. थरुर हे राजकारणात असल्यामुळे व खासकरून सध्याच्या विरोधी पक्षात असल्यामुळे सुनंदा यांचा मृत्यू झाल्यापासून एक संशयाचे रहस्यमय जाळे निर्माण करण्यात आले. हे जाळे निर्माण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या अनेक मंडळींनी जे अथक परिश्रम घेतले तो प्रकार आपल्या संस्कार व संस्कृतीत बसत नाही. श्री. थरुर यांनी आपल्या पत्नीवर विषप्रयोग केला, तिला वैफल्यग्रस्त अवस्थेत चुकीची औषधे दिली, तिच्यावर जारण मारण मंत्र मारले. इतकेच काय, सुनंदाच्या खोलीचा दरवाजा बंद असला तरी त्या दिवशी थरुर हे रूप पालटून, वेष बदलून हॉटेलात आले व सुनंदाच्या खोलीत गुप्तपणे शिरले असे रंगकाम पुढे अनेक महिने करण्यात आले. सुनंदा यांचा पोस्टमार्टेम रिपोर्टही बदलण्यात आला, असे आरोप झाले. भारतीय जनता पक्षाने या मृत्यूचे राजकीय भांडवल करण्याची एकही संधी सोडली नाही. जाहीर सभांतून सुनंदाप्रकरणी टोमणे मारले जाऊ लागले. अंधभक्तांच्या कृपेने ‘मीडिया ट्रायल’ चालवून थरुर यांना फासावर लटकविण्याची तारीखच काय ते जाहीर करणे बाकी होते. या सर्व प्रकरणात
पोलीस व तपास यंत्रणांवर
जणू दबाव टाकण्याचाच प्रयत्न झाला. दबाव असा की, ‘सत्य शोधाल तर याद राखा, आम्ही सांगतोय तेच सत्य!’ असे भाजप, त्यांचा आय.टी. सेल व भाजपच्या प्रभावाखालील मीडियाने ठरवूनच टाकले. आता साडेसात वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल न्यायालयातच लागला असून सुनंदाप्रकरणी ‘मीडिया ट्रायल’चे मनोरे कोसळून पडले व थरुर हे पूर्णतः आरोपमुक्त झाले. प्रश्न एका थरुर यांचा नाही, तर एक महिला म्हणून सुनंदा पुष्कर यांच्या प्रतिष्ठेचाही आहे. या सर्व प्रकरणात सुनंदा यांच्या प्रतिष्ठेचेही धिंडवडे काढण्यात आले. जितक्या वृत्तवाहिन्या तितक्या याप्रकरणी दंतकथा. रोज नवी कथा. हे सर्व लिहिणारे कथा-पटकथाकार कायदा, तपास यंत्रणा, न्यायालयांना मानत नाहीत आणि शेवटी न्यायालयाचा निकाल लागून ते तोंडावर पडले तरी सुधारत नाहीत. श्रीदेवीच्या दुबईतील मृत्यूप्रकरणातही तेच घडले. पती बोनी कपूर यांचा शशी थरुर करण्याचा आटोकाट प्रयत्न झाला. सुशांत राजपूत प्रकरणात तर कथा, पटकथा व दंतकथांचा रोज पाऊसच पडत होता. शेवटी हाती काय लागले? आरुषी तलवार मृत्यूप्रकरणातही सत्य काय याची पर्वा न करता ‘मीडिया’ने नको नको ते पतंग उडवले व स्वतःच पोलीस, सीबीआय असल्यासारखे पुरावे सादर करू लागले. सुनंदा प्रकरणात 2018 मध्ये दिल्ली पोलिसांकडून कोर्टात तीन हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. या आरोपपत्रात दिल्ली पोलिसांनी सुनंदाचे पती म्हणजे खासदार थरुर यांच्या नावाचा समावेश केला होता. म्हणजे सुनंदा पुष्कर यांची
हत्या की आत्महत्या?
त्या नक्की कशाने मृत्यू पावल्या, याबाबत ‘मीडिया’ने किंवा भाजपच्या गोटातून प्रसवलेल्या प्रभावाखालीच थरुर यांना फासावर लटकविण्याचा प्रयत्न झाला! 2014 मध्ये दिल्लीतील हॉटेल लीलामध्ये रूम नंबर 345 मध्ये सुनंदा मृतावस्थेत आढळल्या. तेव्हापासून थरुर हे पत्नीच्या खुनाचा ‘डाग’ घेऊन समाजात वावरत होते. आता ते आरोपमुक्त झाले. राजकारण, वैयक्तिक द्वेषांतून बदनामी मोहिमा किती खालच्या पातळीवर राबविल्या जातात त्याचे हे एक उदाहरण आहे. सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूबाबात सहानुभूती बाळगण्याचे राहिले बाजूला, ‘बरा सापडला, शशी थरुर’ याच द्वेषभावनेने भुई धोपटून थरुर यांना मारण्याचे प्रयत्न केले. राजकारणात कोणी साधू-संत नाही व कोणी स्वतःला तसे समजण्याचा प्रयत्न करू नये. पण हाती पोलीस, तपास यंत्रणा, बदनामी मोहिमेस साथ देणारी प्रसिद्धीमाध्यमे आहेत म्हणून कोणत्याही थराला जायचे, या दुष्टचक्रातून आपले राजकारणी बाहेर पडणार आहेत की नाही? हार्दिक पटेलपासून प्रमोद महाजनांपर्यंत कोणीही या ‘मीडिया ट्रायल’मधून सुटले नाही. हे थांबणे व थांबवणे हे सभ्य, सुसंस्कृत समाजाचे लक्षण आहे. गेल्या 10 वर्षांत या वाळवीने राजकारणास कीड लागली आहे. न्यायालयात न्याय मिळतो, पण त्या क्षणापर्यंत होणाऱया बदनामीचे काय? छळवणूक, मानसिक यातनांच्या अंधाऱया गुहेतून श्री. थरुर बाहेर पडले, पण साडेसात वर्षांनंतर त्याची भरपाई कशी होणार? आणि सुनंदाचे काय झाले? हा प्रश्न तर तसाच राहील. अर्थात मीडिया व भाजपवाल्यांना आता त्याचे काहीच पडलेले नाही.

































































