आजचा अग्रलेख – आजोबांच्या छातीवर नातू! कश्मीर जैसे थे!

6689

कश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी आणि कारवाया सुरूच आहेत. पुन्हा दहशतवादी हल्ल्यात जवानांबरोबर स्थानिक नागरिकांनाही लक्ष्य केले जात आहे. सोपोरमधील दहशतवादी हल्ल्यात बशीर अहमद खान या आजोबांचा मृत्यू झाला तो त्यातूनच. म्हणजे कश्मीर ‘जैसे थे’च आहे. जवानांनी आपला जीव धोक्यात घालून आजोबांच्या छातीवर बसून रडणार्‍या नातवाला वाचविले हे खरेच, पण त्या नातवाचे भविष्य काय? सरकारकडे या प्रश्नाचे काय उत्तर आहे?

लडाखमध्ये चीनच्या आणि कश्मीर खोर्‍यात पाकड्यांच्या कुरापती सुरूच आहेत. हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने बघणे हा त्यांचा धंदा असला तरी आता त्यांना उलथवून टाकावेच लागेल. बुधवारी सोपोर जिल्ह्यात अतिरेक्यांनी हल्ला केला. त्यात ‘सीआरपीएफ’चा एक जवान हुतात्मा झाला. या हल्ल्यात त्याच परिसरातील एक ज्येष्ठ नागरिक मारला गेला. कश्मीर खोर्‍यात असे रक्ताचे सडे रोजच पडत आहेत व निरपराध लोकांचे प्राणही जात आहेत. नोटाबंदी केल्याने कश्मीर खोर्‍यातील अतिरेकी चळवळीस लगाम बसेल, बनावट नोटांचा सुळसुळाट थांबेल, असे ठासून सांगितले गेले ते फोल ठरले. कश्मीर खोर्‍यात अतिरेक्यांच्या कारवाया व बनावट नोटांचा सुळसुळाट जास्तच वाढला आहे. गृहखात्याला हे सगळ्यात मोठे आव्हान आहे. 370 कलम हटवून आणि कश्मीरचे विभाजन करूनही प्रश्न जैसे थे आहेत. सोपोरमध्ये झालेल्या हल्ल्यात एक जवान व एक ज्येष्ठ नागरिक मृत झाला. त्यात चटका लावणारी गोष्ट अशी की, हे ज्येष्ठ नागरिक म्हणजे आजोबा आपल्या नातवाला घेऊन घराकडे निघाले होते, पण अतिरेक्यांच्या गोळीबारात ते रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्या परिस्थितीत त्यांचा चिमुरडा नातू अयाद आजोबांना टाकून पळून गेला नाही. तो तेथेच थांबला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आजोबांच्या छातीवर बसून त्यांना उठवत राहिला. गोळीबारात आजोबा अहमद खान मरण पावले व चिमुरडा नातू अयादला जवानांनी वाचवले. मृत आजोबांच्या छातीवर बसून रडणार्‍या अयादचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. ते पाहून देशभरात हळहळ व्यक्त झाली. केंद्रातील काही मंत्र्यांनी हे छायाचित्र त्यांच्या ट्विटर हँडलवर टाकून अश्रुधारांना वाट मोकळी करून दिली. दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला.

त्या चिमुरड्याविषयी सहानुभूती

व्यक्त केली. हे सर्व ठीक आहे, पण मुळात दिल्लीत इतके मजबूत सरकार असूनही कश्मीर खोर्‍यात शांततेचा चोथा का झाला आहे? मृत आजोबांच्या छातीवर रडणार्‍या नातवाचे चित्र प्रसिद्ध करणार्‍या केंद्रीय मंत्र्यांना एक कळायला हवे, हे चित्र म्हणजे केंद्र सरकारची नामुष्की ठरू शकेल. हे चित्र जेव्हा सरकारचा अधिकृत मंत्रीच त्याच्या ट्विटर हँडलवर टाकतो तेव्हा कश्मीर खोर्‍यातील अशा रक्तपाताची जबाबदारी सरकारवर येते. आजोबा मेले आहेत व ते आता कधीच उठणार नाहीत हे न समजणारा नातू त्यांना जागे करण्याचा प्रयत्न करत आहे इतकी विदारक छायाचित्रे सीरिया, इजिप्त, सोमालिया, अफगाणिस्तानसारख्या देशांतील विध्वंसानंतरच समोर आली आहेत. कश्मीर खोर्‍यात आमच्या जवानांची बलिदाने सुरूच आहेत. 370 कलम हटवले हे खरे, पण कश्मिरी पंडितांची घरवापसी होऊ शकलेली नाही. सरपंच असलेल्या कश्मिरी पंडिताची हत्या अतिरेक्यांनी महिनाभरापूर्वीच केली. हे भयंकर आहे. कश्मीरात पाकपुरस्कृत फुटीरवाद्यांना नव्याने बळ मिळते आहे. पाकिस्तानी सैन्याच्या हालचाली सीमेवर वाढतच आहेत. लडाख सीमेवर चीन व कश्मीर सीमेवर पाकिस्तानचे सैन्य उभे राहिले आहे. सीमेवरचा तणाव कमी होईल असे आज तरी दिसत नाही. त्याचाच फायदा पाकिस्तान घेईल व कश्मीरसह हिंदुस्थानातील अनेक मोठय़ा शहरांत उत्पात घडवेल. अमित शहा यांनी गृहखात्याचे नेतृत्व हाती घेताच कश्मीर खोर्‍याचा वाजतगाजत दौरा केला. त्या दौर्‍याचे

कौतुकही खूप

झाले. आतापर्यंत जेव्हा जेव्हा देशाचे गृहमंत्री कश्मीरात गेले तेव्हा तेव्हा अतिरेकी व फुटीरतावाद्यांनी बंद पुकारला. अडथळे आणले. श्री. शहा यांच्या बाबतीत तसे घडले नाही हे खरेच आहे, पण गेल्या सहा महिन्यांत अतिरेक्यांच्या कारवाया आणि हल्लेही वाढले. घुसखोरीचे प्रमाण वाढलेच आहे. मागील काही महिन्यांत आपल्या जवानांनी बर्‍याच दहशतवाद्यांचा खात्मा केला हे खरे असले तरी या चकमकींमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांची संख्याही कमी नाही. आजही जम्मू-कश्मीरमध्ये सुमारे 170 दहशतवादी सक्रिय असल्याचे सांगण्यात येते. याचाच अर्थ कश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी आणि कारवाया सुरूच आहेत. पुन्हा दहशतवादी हल्ल्यात जवानांबरोबर स्थानिक नागरिकांनाही लक्ष्य केले जात आहे. सोपोरमधील दहशतवादी हल्ल्यात बशीर अहमद खान या आजोबांचा मृत्यू झाला तो त्यातूनच. म्हणजे कश्मीर ‘जैसे थे’च आहे. तेव्हा सरकारने कश्मीरातून फुटीरतावादी, घुसखोरांना बाहेर काढायलाच हवे. लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांनाही हाकलून दिले पाहिजे. कश्मीर खोर्‍यात एका मृत आजोबांच्या छातीवर बसून चिमुरडा नातू रडत आहे, बाजूला बंदुकांच्या फैरी झडत आहेत हे चित्र देशाच्या इभ्रतीला व हिंमतबाज सरकारच्या प्रतिष्ठेला डाग लावणारे आहे. जवानांनी आपला जीव धोक्यात घालून आजोबांच्या छातीवर बसून रडणार्‍या नातवाला वाचविले हे खरेच, पण त्या नातवाचे भविष्य काय? सरकारकडे या प्रश्नाचे काय उत्तर आहे?

आपली प्रतिक्रिया द्या