आजचा अग्रलेख : तिसऱ्या टप्प्यातील सुप्त लाट

पंतप्रधान श्री. मोदी हे जवानांची कुर्बानी व शौर्य यावर लोकांत राष्ट्रभक्तीची चेतना जागवीत आहेत आणि त्याच वेळी हुतात्म्यांच्या शौर्यास देशद्रोह म्हणणे यामुळे पंतप्रधानांच्या प्रतिमेस धक्का बसतो. आज पंतप्रधानांची प्रतिमा व चेहरा हेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे भांडवल आहे. फडणवीस म्हणतात, मोदी नामाची सुप्त लाट आहे. होय, लाट मतदारांच्या अंतरंगात आहे. तिसऱ्या टप्प्यास सामोरे जाताना ही लाट उसळताना आम्हीही पाहात आहोत.

निवडणुकांचे मैदान पेटले आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी देश व महाराष्ट्र सज्ज झाला आहे. देशात 115 व महाराष्ट्रात 14 जागांवर आज मतदान होत आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असे बोलण्याची प्रथा आहे. ज्या पद्धतीने प्रचाराची पातळी घसरली आहे त्यास तोफा म्हणायचे की गटारी पाण्याच्या पिचकाऱ्या म्हणायचे, हा प्रश्न मतदार राजाला नक्कीच पडला असेल. निवडणूक संसदेची आहे, पण असंसदीय शब्दांचाच चिखल उडवला आणि तुडवला जात आहे. या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची सुप्त लाट आहे. या लाटेची गाज जाणवत नसली, तिचा आवाज ऐकू येत नसला तरी या लाटेची प्रचीती मतदानात निश्चित येईल, असा आत्मविश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे तो सार्थच आहे. राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, बारामती, माढा, संभाजीनगर, जळगाव, रावेर, सातारा, नगर, कोल्हापूर, सांगली, हातकणंगले अशा मतदारसंघांत आज मतदान होईल. देशपातळीवरही अनेक बडय़ा नेत्यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. त्यात अमित शहा व राहुल गांधी आहेत. कोणी काही म्हणोत, पण मोदी यांच्या सुप्त लाटेचे पाणी उसळताना मुख्यमंत्र्यांनी पाहिले आहे. त्याच सुप्त लाटेवर महाराष्ट्रातील ‘युती’चे उमेदवार विजयी होतील, असा मुख्यमंत्र्यांना विश्वास वाटतो. तिसऱ्या टप्प्यात शरद पवार व फडणवीस यांच्यात संघाच्या हाफ चड्डीवरून

भांडण झाले

आहे. अमित शहा बारामतीत प्रचारास गेले व शरद पवारांचा तंबू उखडण्याची भाषा त्यांनी केली. यावर ‘हे माझी काय उखडणार? काय उखडायची ती उखडा,’ असे पवारांनी बजावले आहे. कुणाला रुजवायचे व कुणाला उखडायचे हे शेवटी जनतेने ठरवायचे आहे व जनता आपल्या खिशात आहे या भ्रमात कोणी राहू नये. मतदारांनी गेल्या 70 वर्षांत अनेकांच्या भ्रमाचे भोपळे फोडले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी आता घोषणा केली आहे की, लोकसभा निकालानंतर नरेंद्र मोदी हे फक्त तुरुंगात नसतील तर अंडा सेलमध्ये असतील. पंतप्रधानांच्या बाबतीत अशी भाषा वापरणे योग्य नाही. आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचे ‘अंडे’ अद्यापि फुटायचे आहे. त्यामुळे त्यांनी अंडे पूर्ण उबवून त्यातून कोंबडी बाहेर येईपर्यंत संयमाने बोलायला हवे. निवडणूक प्रचारात पूर्वी शब्दांचा धुरळा उडत होता. आता गटारी पिचकाऱ्या उडत आहेत. लोकशाहीत हे कुणी जिवंतपणाचे वगैरे लक्षण मानत असतील तर या लोकशाहीचे भविष्य कठीण आहे हे मान्य करायला हवे. भोपाळमधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार प्रज्ञासिंग ठाकूर यांनी हेमंत करकरे यांच्यावर मारलेल्या पिचकाऱ्यांचेही समर्थन करता येणार नाही. मालेगाव बॉम्बस्फोट तपासाबाबत आम्हीही काही शंका उपस्थित केल्या होत्या. हिंदूंना बदनाम करू नका व

हिंदू दहशतवादया शब्दावर

जोर देऊ नका ही आमची भूमिका होती. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास राजकीय दबावाखाली होत असल्याचे आम्ही तेव्हा म्हटले होते व या प्रश्नी साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित यांची उघड बाजू घेऊन लढणारा फक्त ‘सामना’च होता, पण तेच हेमंत करकरे पुढे ‘26/11’च्या दहशतवादी हल्ल्यात पाकडय़ा अतिरेक्यांच्या गोळय़ांना बळी पडले व त्यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले. त्यांना देशाने सर्वोच्च ‘अशोक चक्र’ मरणोत्तर बहाल केले. अशा करकरे यांचा उल्लेख ‘देशद्रोही’ वगैरे करणे घृणास्पद आहे. देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या सर्वच वीर जवानांचा तो अपमान ठरेल. निवडणुकांच्या गदारोळात निदान देशासाठी बलिदाने देणाऱ्यांवर अशी चिखलफेक होऊ नये. प्रज्ञासिंग या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आहेत व पंतप्रधान श्री. मोदी हे जवानांची कुर्बानी व शौर्य यावर लोकांत राष्ट्रभक्तीची चेतना जागवीत आहेत आणि त्याच वेळी हुतात्म्यांच्या शौर्यास देशद्रोह म्हणणे यामुळे पंतप्रधानांच्या प्रतिमेस धक्का बसतो. आज पंतप्रधानांची प्रतिमा व चेहरा हेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे भांडवल आहे. फडणवीस म्हणतात, मोदी नामाची सुप्त लाट आहे. होय, लाट मतदारांच्या अंतरंगात आहे. तिसऱ्या टप्प्यास सामोरे जाताना ही लाट उसळताना आम्हीही पाहात आहोत.