सामना अग्रलेख – ओला दुष्काळ, शेतकर्‍यांची कोंडी फोडा!

या वर्षी पाऊस बरा झाल्यामुळे भातशेती जोमात आली. शेतकरी आनंदी होता. दोन दिवस कोरडे वातावरण असल्याने अनेकांनी आपली पिके कापून खळ्यावर टाकली होती, पण अवकाळी पावसाने खाण्याइतके लावलेले पीकही उद्ध्वस्त झाले. अवकाळी पावसाने उद्ध्वस्त केलेल्या शेतकर्‍यांना पडेल ती किंमत मोजून जगवायला हवे. ओल्या दुष्काळावर मात व्हावी. शेतकर्‍यांच्या डोळ्यांतील पाणी थांबावे यासाठी आम्ही जे जे शक्य आहे ते सर्व करीत आहोत. सरकारने अवकाळी ओल्या दुष्काळाने केलेली शेतकर्‍यांची कोंडी आधी फोडावी. सरकार बनविण्याच्या पेचात शेतकर्‍यांना जगण्याचापेचपडू नये. 

महाराष्ट्रात सत्तेची कोंडी असली तरी शेतकर्‍यांवर आलेल्या संकटाची कोंडी फुटणे आवश्यक आहे. जो बळीराजा राजकारण्यांना सत्तेच्या खुर्चीवर बसवतो त्याची अवस्था अनेकदा लाचारासारखी होते. राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर न्याय कुणाकडे मागायचा? अशी अवस्था राज्यातील शेतकर्‍यांची झाली आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. कोकणात भातशेती, इतरत्र खरिपाची पिके, द्राक्ष, ऊस, कापूस, सोयाबीन, फळबागा असे हातातोंडाशी आलेले पीक अवकाळी पावसाने झोपवले आहे. शेतकरी हवालदिल आहेच, पण जगायचे कसे आणि मरायचे कसे या विवंचनेत आहे. पालघर जिल्हय़ातील धर्मा जाधव या शेतकर्‍याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली आहे. धर्मा जाधववर कोणत्याही बँकेचे कर्ज नव्हते, पण अवकाळी पावसाने त्याची भातशेती नष्ट झाली. त्याच धक्क्याने धर्मा जाधवने जीवन संपवले. मराठवाडा, विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्र असा सर्वच भाग अवकाळी पावसाच्या मार्‍यातून सुटलेला नाही. आम्ही मराठवाडय़ात प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकर्‍यांची दैना पाहून आलो. सारे खरीप पीक वाया गेले आहे. जिथे पीक काढून टाकले, तिथेच कोंब उगवले. सोयाबीन, तूर, ज्वारी, फुलांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. हा ओला दुष्काळ आहे तो दोन अर्थाने. पिके पाण्याखाली गेलीच आहेत, पण शेतकरी, त्यांच्या कुटुंबाच्या डोळ्यांतील पाणीही थांबत नाही. अनेक भागांतील पाण्याचे टँकर थांबले, पण अति पाण्याचे

नवे संकट

उपटले. देश आर्थिक संकटात आहे. आर्थिक मंदीमुळे लाखो लोकांनी नोकर्‍या गमावल्या आहेत. उद्योग बंद पडत आहेत. त्यात शेतीवर अवलंबून असलेल्या कोट्यवधी लोकांची ही अशी अवस्था अवकाळी पावसाने केली. राज्यातील 358 तालुक्यांपैकी 325 तालुक्यांना अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. 54 लाख हेक्टरवरील पिकाला फटका बसला आहे आणि सरकारने ‘दात कोरून’ मदत करावी तसे 10 हजार कोटी अवकाळीग्रस्तांना जाहीर केले. किमान 25 ते 30 हजार कोटींची मदत हवी आहे व त्यासाठी केंद्र सरकारने स्वतःच्या खिशात हात घालावा अशी आमची त्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. राज्यातील 50 लाख शेतकर्‍यांनी पीक विमा घेतला आहे हे खरे, पण या विमा कंपन्यांच्या विरोधात शिवसेनेला रस्त्यावर उतरावे लागलेच होते. आता या विमा कंपन्यांनी अवकाळीग्रस्तांना  पुन्हा अडचणीत टाकले तर  त्यांची गाठ शिवसेनेशी आहे हे पीक विमा कंपन्यांनी लक्षात ठेवावे. सरकार काळजीवाहू असो किंवा आणखी कसे, अवकाळीग्रस्त शेतकर्‍याला दर हेक्टरी किमान 25 हजार रुपये तातडीची मदत सरकारने द्यायलाच हवी, जेणेकरून त्याला तोंडावर आलेल्या रब्बी हंगामासाठी तयारी करणे शक्य होईल. त्यामुळे प्रशासनाने पंचनाम्याच्या भानगडीत शेतकर्‍यांना न गुंतवता

थेट मदत

पोहोचवायला हवी. शेतकर्‍यांच्या डोक्यावर कर्ज आहेच. कर्जमाफीच्या बाबतीत झालेला गोंधळ संपलेला नाही. आम्ही बांधावर असताना शेतकर्‍यांनी कर्जमाफीबाबत त्यांना आलेले विदारक अनुभव कथन केले. त्यामुळे सातबारा संपूर्ण कोरा करण्याशिवाय तरणोपाय नाही. पाऊस नाही पडला तरी नुकसान व पडला तरी नुकसान अशा फेर्‍यात शेतकरी गुदमरला आहे. कोकणातील परिस्थितीही यावेळी भयंकर झाली आहे. भातशेतीचे नुकसान शेतकर्‍यास मरणयातनाच देणारे आहे. वाढती महागाई व त्यामुळे शेतीत येत असलेल्या अनंत अडचणी यामुळे अनेक शेतकरी हल्ली फक्त खाण्याइतकीच शेती लावतात. या वर्षी पाऊस बरा झाल्यामुळे भातशेती जोमात आली. शेतकरी आनंदी होता. दोन दिवस कोरडे वातावरण असल्याने अनेकांनी आपली पिके कापून खळ्यावर टाकली होती, पण अवकाळी पावसाने खाण्याइतके लावलेले पीकही उद्ध्वस्त झाले. अवकाळी पावसाने उद्ध्वस्त केलेल्या शेतकर्‍यांना पडेल ती किंमत मोजून जगवायला हवे. ओल्या दुष्काळावर मात व्हावी. शेतकर्‍यांच्या डोळ्यांतील पाणी थांबावे यासाठी आम्ही जे जे शक्य आहे ते सर्व करीत आहोत. सरकारने अवकाळी ओल्या दुष्काळाने केलेली शेतकर्‍यांची कोंडी आधी फोडावी. सरकार बनविण्याच्या पेचात शेतकर्‍यांना जगण्याचा ‘पेच’ पडू नये.

आपली प्रतिक्रिया द्या