
गृहमंत्री अमित शहा भाजप कार्यालयाच्या भूमिपूजनासाठी मुंबईत आले व अभद्र बोलून गेले. ”महाराष्ट्रातील विरोधकांना पूर्ण संपवा,” असे ते म्हणाले, पण नागपूरपासून मुंबईपर्यंत जनता सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरली आहे. या विरोधाचे तुम्ही काय करणार?
महाराष्ट्रात सर्व काही आलबेल नाही हे आता उघड झाले आहे. गृहमंत्री अमित शहा भाजप कार्यालयाच्या भूमिपूजनासाठी मुंबईत आले. ते काहीतरी शुभ बोलतील असे वाटले होते, पण “विरोधकांना संपवा. विरोधक दुर्बिणीतूनही दिसणार नाहीत असे करा,” असे अभद्र बोलून ते निघून गेले. कोणत्या विरोधकांना अमित शहा पूर्णपणे संपवायला निघाले आहेत? भाजप हा सध्या दोन खांबी तंबू आहे. दोन्ही खांबांना भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे. एक खांब कलंडला तरी संपूर्ण भाजप पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळून पडेल. भाजप कार्यालयाची कुदळ मारताना भाजपचे सर्व ‘सावजी चिकन’ म्हणजे बाहेरून आलेले लोक व्यासपीठावर होते, पण ज्यांनी महाराष्ट्रातील भाजपसाठी खस्ता खाल्ल्या ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या महत्त्वाच्या सोहळ्यात कोठेच दिसले नाहीत. राण्यांपासून नार्वेकरांपर्यंत, राम शिंद्यांपासून विखे पाटलांपर्यंत सगळ्या उपऱ्यांची मांदियाळी तेथे होती. हे सर्व काँग्रेस, शिवसेनेतून गेलेले लोक. त्यांच्या सतरंज्या उचलण्याचे काम आता मूळ भाजपवाल्यांना करावे लागेल. गडकरी व्यासपीठावर नव्हते हा भाजपचा अंतर्गत कलह आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत भाजपच्या आशीष शेलार यांना स्थान मिळू नये म्हणून मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’वरून सूत्रे हलवली जात आहेत. ‘भाजप विरुद्ध भाजप’ हे जागोजागचे चित्र आहे. त्यामुळे श्री. शहा हे कोणत्या दुर्बिणीतून विरोधकांचे अस्तित्व संपवणार आहेत.
हे काय सुरू आहे?
महाराष्ट्रात काय चालले आहे हे दुर्बिणीतून पाहिले तर शहांना कळेल की, भाजपच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरून संघर्ष करीत आहेत व पोलिसांच्या दंडुकेशाहीला ते घाबरत नाहीत. राज्यात सर्वत्र आंदोलने सुरू आहेत. मुख्यमंत्री त्यावर काय करतात?
मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या मागण्यांसाठी हजारो लोकांसह मुंबईत आले. आझाद मैदानावर त्यांनी तंबू ठोकला. पाच दिवस आंदोलकांनी मुंबई विस्कळीत केली. मराठी माणूस मुंबईत एकवटला तर काय घडेल याचे प्रात्यक्षिक जरांगे पाटलांनी दाखवले. या आंदोलनास सामोरे जाण्याची हिंमत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेवटपर्यंत दाखवली नाही. अमित शहांनी त्यांच्या दुर्बिणीतून हा शौर्य प्रसंग अनुभवायला हवा होता.
ओबीसी, धनगर, बंजारा समाजाचे मोर्चे व आंदोलने जागोजाग सुरूच आहेत.
बच्चू कडू हे हजारो शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरले व फडणवीसांच्या नागपुरात घुसून त्यांनी सगळ्यांचीच दाणादाण उडवली. “शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, कर्जमाफी करा” अशी त्यांची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांच्या वतीने बावनकुळे व महाजन हे दोन मंत्री कडूंशी चर्चा करीत राहिले. कडू यांनी रक्तपाताची भाषा केली तेव्हा भाजप मंत्र्यांच्या पायाखालची वाळू सरकली. शहांनी हे सर्व दुर्बिणीतून टिपलेच असेल.
मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांचा ‘हंबरडा मोर्चा’ शिवसेनेने छत्रपती संभाजीनगरात काढला व शेतकरी त्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत पोहोचली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस सांगतात ते सपशेल खोटे आहे. मराठवाड्यातला शेतकरी संघर्षाच्या तयारीत आहे.
सोलापुरातील अक्कलकोट येथे शिवसेनेचे आनंद बुक्कानुरे हे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी उपोषणास बसले आहेत.
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम गरज नसताना काढले ते ठेकेदारांना पैसा मिळावा म्हणून. त्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतकऱ्यांची अधिकृत घरे व वस्त्यांवर बुलडोझर फिरवले. नाशिक एमएमआरडीएचे हे प्रताप. शेतकऱ्यांच्या शेतावर, घरावर बुलडोझर फिरवून सिंहस्थ साजरा करणे म्हणजे हिंदुत्व नव्हे. शेतकरी येथेही आंदोलनाला उतरला व उपोषणाला बसला आहे. हा विरोध दुर्बिणीतून पाहावा असाच आहे.
गेल्या 25 दिवसांपासून पालघर जिल्ह्यातील वाडा येथील शेतकरी आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यांच्या, आदिवासींच्या जमिनीतून विजेचे मनोरे व लाइन्स टाकण्याचे काम जबरदस्तीने सुरू आहे. त्यामुळे हजारो शेतकरी बाधित झाले व त्यांना मोबदला मिळाला नाही. अदानीच्या वीज कंपन्यांच्या फायद्यासाठी हे सर्व माजोरडेपणाने सुरू आहे, पण येथील आदिवासी, शेतकरी ठामपणे या माजोरडेपणाच्या विरोधात उतरला आहे.
निवडणूक आयोगाच्या मनमानीविरुद्ध आणि भाजपच्या निवडणूक भ्रष्टाचाराविरुद्ध सर्वपक्षीय प्रचंड मोर्चा मुंबईत निघाला. तो भाजप व आयोगाच्या दुर्बिणीत मावणार नव्हता. भाजपचा निवडणूक आणि मतदार याद्यांतला घोटाळा अनेकांनी दुर्बीण लावून शोधला व भाजपला उघडे नागडे केले. त्या नागड्यांच्या सभेत देशाचे गृहमंत्री “महाराष्ट्रातील विरोधकांना संपवू” असे सांगतात. आधी पक्षातील विरोधकांकडे त्यांनी लक्ष द्यायला हवे. पाकिस्तानसारख्या शत्रूला अमेरिका आणि चीन बळ देत आहे. तेथपर्यंत त्यांच्या दुर्बिणी पोहोचत नाहीत याचे आश्चर्य वाटते.
नेपाळशी तुलना
भारतीय जनता पक्षाला लोकशाही व्यवस्थेत विरोधक नको आहेत. त्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे की आमदार, खासदार किंवा राजकीय पक्षांनाच विरोधी पक्ष म्हणायला हवे असे नाही. विविध आंदोलने, मोर्चे, संघर्ष यांच्या माध्यमातून रोज हजारो लोक सरकारी धोरणांना विरोध करण्यासाठी आता रस्त्यावर उतरले आहेत. “महाराष्ट्राचा नेपाळ होईल” असे कोणी बोलतात तेव्हा भाजप व त्यांचे सरकार चालवणाऱ्यांना मिरच्या झोंबतात, पण नेपाळमध्ये एक भ्रष्ट सरकार अशाच आंदोलकांनी उलथवून लावले व नवे सरकार आणले. आज नेपाळ भारतापेक्षा शांत आहे. नेपाळातील जनतेने राज्यकर्त्यांच्या दुर्बिणी आणि बंदुकांची पर्वा न करता आंदोलन केले. ते यशस्वी झाले. दुर्बीण लावून विरोधकांना संपवण्याची भाषा करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे. विरोधकांना संपवणे म्हणजे लोकशाही संपवणे. सत्ताधाऱ्यांचे हे मनोरथ भारतात कधीच पूर्ण होणार नाहीत.
Twitter – @rautsanjay61
Gmail- [email protected]





























































