
राज्याचे व देशाचेही वैचारिक दिवाळे वाजले आहे. माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकावर पंतप्रधान कार्यालयाने अघोषित बंदी टाकली. त्याच वेळी व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया मचाडो यांना नोबेल शांती पुरस्कार जाहीर झाला. हुकूमशाहीविरोधी लढणाऱ्या जगातील कार्यकर्त्याचा हा विजय आहे.
कितीही दिवाळं वाजलं तरी दिवाळी होईल. दिवाळी येईल आणि जाईल, पण प्रश्न काही संपत नाहीत. दिल्लीत मोदी-शहांनी आणि महाराष्ट्रात श्री. फडणवीस वगैरे लोकांनी राज्याचे वैचारिक व एकंदरीत अकलेचे जे दिवाळे काढले आहे ते धक्कादायक आहे. आपले माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी एक आत्मचरित्रपर पुस्तक लिहिले. एक वर्षापेक्षा जास्त काळ हे पुस्तक प्रधानमंत्री कार्यालयात पडून आहे. पुस्तक प्रसिद्ध करण्यास पंतप्रधान मोदी हे मंजुरी द्यायला तयार नाहीत. ही एक प्रकारची सेन्सारशिप आहे. श्री. नरवणे यांनी 2020 मध्ये हिंदुस्थान व चीनमध्ये झालेल्या संघर्षाचे सत्यकथन पुस्तकात मांडले. त्यामुळे हे सत्य दडपण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून सुरू आहे. हे सर्व प्रकार हुकूमशाही राजवटीत मोडतात. अशा हुकूमशहांनी व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया मचाडो यांच्या संघर्षाकडे पाहायला हवे. मारिया यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. त्यामुळे या पुरस्काराचाच सन्मान झाला. व्हेनेझुएलाचा हुकूमशहा राष्ट्रपती निकोलस मडुरो याचीही त्याच्या देशात एक `गोदी मीडिया’ आहेच व तेथील गोदी मीडियाने मारिया यांच्या बदनामीची मोहीम सुरू केली आहे. त्या देशातील टीव्ही वाहिन्यांवर मारिया या परकीय हस्तक आहेत, राष्ट्रविरोधी आहेत अशा चर्चासत्रांची लाट आली आहे. भारतात श्री. राहुल गांधींबाबत झाले तेच मारिया मचाडोंच्या बाबतीत त्यांच्या देशात घडले. हुकूमशहा निकोलस मडुरोने मारिया यांचे संसद सदस्यत्व रद्द केले. त्यांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लावला. शेकडो खोटे गुन्हे लादले. व्हेनेझुएलाच्या सुप्रीम कोर्टाने हुकूमशहाच्या दबावाखाली मारिया यांना शिक्षा ठोठावल्या व त्यांना देशद्रोही ठरवले. तरीही मारिया लढत राहिल्या. हुकूमशहाविरुद्ध लढण्याचा एक नवा मार्ग त्यांनी निर्माण केला व आता त्यांना त्यांच्या संघर्षाचा सन्मान करणारा ‘शांती’चा नोबेल पुरस्कार मिळाला. जगात हुकूमशाही राजवटीत प्रसिद्धीचे ढोल पिटणाऱ्यांना कधीच सन्मान मिळत नाही हे मारिया यांच्या नोबेल पुरस्काराने दाखवून दिले. मारिया यांना मिळालेला नोबेल शांती पुरस्कार म्हणजे हुकूमशाहीविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येकाला दिवाळी भेट आहे.
श्रीमंतांचा क्लब
भारतासारख्या देशात दिवाळी कोणी साजरी करायची? भारत हा श्रीमंतांना अतिश्रीमंत करणारा देश बनला आहे. सरकारचे प्रत्येक मोठे काम हे फक्त एकाच व्यक्तीला मिळते. त्याचे नाव `अदानी’. स्वारगेट-कात्रज मेट्रोचे कामही आता अदानीलाच मिळाले. 1,643.88 कोटींची निविदा मंजूर केली आहे. अदानीची निविदा सगळ्यात कमी किमतीची होती. इतर कुणाला येऊच दिले गेले नाही. संपूर्ण भारतभर अदानी व मोजक्या उद्योगपतींची ही अशी दिवाळी सुरू आहे. भारत हा अब्जोपतींचा नवा अड्डा बनत आहे. अब्जोपतींच्या क्लबमध्ये मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर आहेत. 9.55 लाख कोटी इतकी त्यांची संपत्ती आहे. अभिनेता शाहरुख खानची संपत्ती 12,490 कोटी रुपये आहे व तोही आता या अतिश्रीमंतांच्या क्लबमध्ये सामील झाला. अंबानी, अदानी, शशी नाडर, सायरस पुनावाला, कुमार मंगलम बिर्ला, दिलीप संघवी, अजीज प्रेमजी, गोपीचंद हिंदुजा, राधाकिशन दमानी, नीरज बजाज कुटुंबीय. 1687 कुटुंबांकडे भारताची अर्धी संपत्ती आहे. यांच्या श्रीमंतीचा भारतातील गरीबांना काय उपयोग? देशाची 80 कोटी जनता आजही सरकार महिन्याला देत असलेल्या 10 किलो राशनवर जगते. अंबानी, अदानी, बिर्ला, नाडरची संपत्ती वाढली म्हणून त्यांच्या जीवनात दिवाळी येणार नाही. सोन्याचा दर आता 1 लाख 30 हजारांवर पोहोचला. चांदीने 1 लाख 94 हजारांचे शिखर गाठले. गरीबांना सोने-चांदी आता नकोच आहे. दोन वेळचे जेवण आणि हाताला काम इतकीच त्यांची अपेक्षा आहे. ती पूर्ण करण्यासाठी ही 1687 अब्जाधीश कुटुंबे नक्की काय करणार आहेत? स्वत:चे आर्थिक साम्राज्य वाढवण्यासाठी त्यांना सरासरी लाखभर मजूर लागतात. हीच आमची देशसेवा असे या सगळ्यांना वाटते. दानशूरतेचा आव आणून मोठेपणाची प्रतिष्ठा मिळवायची हे देशातील श्रीमंतांचे काम बनलेच आहे. निर्धनता वाढली की, जगणे नकोसे होते व त्यातून आत्महत्या वाढतात. एका संस्कृत नाटकातील नायक म्हणतो, “दारिद्र्य की मरण यापैकी एकाची निवड करायची झाली तर मी मरणच निवडेन. कारण मरणात दु:ख थोडे आहे, पण `दारिद्र्य’ हे दु:ख न संपणारे आहे.” दिवाळीच्या आधी धनत्रयोदशी व नंतर लक्ष्मीपूजन होते. त्या दिवशी निर्धनही लक्ष्मीची पूजा करतो. भरपूर प्रयत्न करावेत, ज्ञानप्राप्ती करून परिश्रम करावेत आणि धन मिळवावे. जगात धनावाचून कुठेही पुढे पाऊल पडत नाही. धनाची उपेक्षा करू नये. शेवटी आपली संस्कृती `लक्ष्मीपूजन’ करणारी आहे. वेदातही श्री देवी म्हणून लक्ष्मीची स्तुती गायली आहे. धन, वैभव, लक्ष्मी ही पापातूनच मिळते असे नाही. ज्ञानसंपन्न, शीलसंपन्न व्यक्तीही धनंजय होतात. अशा धनंजयाचीच दिवाळी वैभवाची. मारिया मचाडो यांना मिळालेला नोबेल पुरस्कार ही अनेकांसाठी दिवाळीच आहे. प्रत्येक वेळी लक्ष्मीच कशाला? सरस्वती, शांती व त्यासाठी संघर्षातून मिळणाऱ्या सुखातही दिवाळी आहेच.
Twitter – @rautsanjay61
Gmail- [email protected]