रोखठोक – निष्ठावंतांची पक्षांतरे, गुंड टोळ्यांची ‘राष्ट्रवादी’, मराठी माणसाला लढावे लागेल

मुंबईसह महाराष्ट्रातील 29 पालिका निवडणुकांत अजब-गजब प्रकार आणि प्रयोग घडत आहेत. निष्ठावंत म्हणून घेणाऱ्यांनी उघड पक्षांतरे केली. पुण्यात गुंडांच्या टोळ्या निवडणुकीत उतरल्या. ठाण्यात ‘नमो ठाणे’चे फलक झळकले. मुंबईत मराठी माणसाच्या अस्तित्वाची ही शेवटची लढाई आहे.  

मुंबईसह महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले आहे. ज्यांना उमेदवाऱ्या मिळाल्या नाहीत अशा सर्वच पक्षांतील ‘निष्ठावान’ कार्यकर्त्यांनी ताबडतोब ‘पक्षांतरे’ केली. काहींनी पक्ष कार्यालयासमोर उपोषणे, रडारड आणि राडेबाजी केली. नाशिक व छत्रपती संभाजीनगरात भाजपमध्ये राडेबाजी झाली, ती संपलेली नाही. निष्ठावंतांना तिकीट नाकारले म्हणून ‘पक्ष’ सोडणारे सर्वाधिक लोक भाजपचे आहेत. नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे (भाजप) यांचा मुलगा रोहित याने भाजपचा राजीनामा दिला. महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याचा हा संताप आहे. पुण्यात भाजपच्या बहुतेक बंडोबांनी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश घेऊन उमेदवाऱ्या मिळवल्या. शिंदे गटास या निवडणुकीत गळती लागली व मुंबईसह अनेक ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख लोक सोडून गेले. राखी जाधव या शरद पवारांच्या मुंबई शहर अध्यक्षा. शिवसेनेबरोबरच्या जागा वाटप चर्चेत त्या अखेरपर्यंत होत्या, पण एकेदिवशी अचानक त्या ‘भाजप’वासी झाल्या. शिवसेना-मनसे युतीची घोषणा 24 डिसेंबर, 2025 रोजी वरळीच्या ‘ब्लू सी’ हॉटेलात झाली. तेव्हा नाशकात शिवसेनेचे विनायक पांडे, त्यांचे चिरंजीव व मनसेचे नाशिकचे प्रमुख नेते दिनकर पाटील हे गुलाल उधळीत अत्यानंदाने नाचताना लोकांनी वृत्तवाहिन्यांवर पाहिले. हे लोक एकमेकांना लाडू भरवत होते. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी या ‘लाडू सम्राटांनी’ भाजपमध्ये प्रवेश केला. ही एक प्रकारची शुद्ध हरामखोरी आहे. महाराष्ट्राला अशा हरामखोरीची लागण लागली आहे.

पुण्यातला प्रयोग

पुणे, पिंपरी-चिंचवडचे सर्व नामचीन गुंड, दरोडेखोर यांनी सत्ताधारी अजित पवार पक्षाच्या उमेदवाऱ्या घेतल्या. मारणे, आंदेकर, बापू नायर अशा टोळ्यांचे प्रमुख अजित पवारांच्या पक्षातून लढत आहेत. टोळी युद्धाचे व कोयता गँगचे सर्व म्होरके अजित पवार यांच्याच पक्षातून निवडणूक लढत आहेत. गुंडांना टायरात घालून मारतो, असे सांगणाऱ्या अजित पवारांनी पुणे, पिंपरी-चिंचवडला सगळे गुंड पक्षात घेतले व स्वतःची ‘गँग’ निर्माण केली. यावर पुणेकर आता विचारीत आहेत, अजित पवार पालकमंत्री पुण्याचे की ‘गँगवार’वाल्यांचे? भाजप ज्या गुंडांना थेट उमेदवारी देऊ शकला नाही त्या सगळ्या महात्म्यांना भाजपने अजित पवारांच्या पक्षात पाठवले. पुण्यात सर्वाधिक गुंड अजित पवारांच्या पक्षातून लढत आहेत व अजित पवारांच्या शुद्ध, चारित्र्यवान पक्षाशी पुणे, पिंपरी-चिंचवड पालिकेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने युती केली. भारतीय जनता पक्षाची ही हुशारी आहे. अजित पवार यांनी शरद पवारांचा मूळ पक्ष फोडला व आमदारांसह ते भाजप आघाडीमध्ये सामील झाले. खरा राष्ट्रवादी कोणता तसेच पक्ष आणि चिन्हाबाबत अजित पवार यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात खटला सुरू आहे व पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र आले. त्यामुळे चिन्ह आणि पक्षाचा खटला सुप्रीम कोर्टात टिकेल काय? महाराष्ट्रात जागोजाग अशी त्रांगडी पालिका निवडणुकांच्या निमित्ताने दिसत आहेत. विचारधारा, भूमिका, निष्ठा याचे पुरते वाटोळे महाराष्ट्राच्या मातीत झाले व त्यास सगळेच राजकीय पक्ष जबाबदार आहेत. एकनाथ शिंदे यांनी अमित शहांच्या मदतीने शिवसेना फोडली. फोडलेला तुकडा दिल्लीत जाऊन अमित शहांच्या चरणी अर्पण केला. महाराष्ट्राच्या पाठीवरचा हा सगळ्यात मोठा वार आहे.

मराठी अस्मितेसाठी

मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांत देशाचे लक्ष मुंबईकडे लागले आहे. मराठी माणसांच्या प्रश्नांवर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले. दोघांनी राजकीय युती जाहीर केली. यानिमित्ताने मराठी माणूस एक झाला तर पालिकेवर मराठी अस्मितेचा भगवा झेंडा फडकेल, पण भाजप, शिंदे, युती व काँग्रेस-वंचित आघाडीला ते मान्य आहे काय? काँग्रेसने स्वतंत्र मांडणी वंचित आघाडीबरोबर केली. वंचितला लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसची सोबत नको होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसशी सदैव वाद राहिला. काँग्रेस हे जळके घर असल्याचे डॉ. आंबेडकर वारंवार सांगत, पण भाजपचा पराभव करण्यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी काँग्रेसबरोबर जात आहे या भूमिकेचे स्वागत, पण या सगळ्याचा फायदा भाजपला होणार नाही व मराठी माणसाच्या एकजुटीला धक्का बसणार नाही याची खात्री कोण देणार? दलित बांधवांची मते ‘मराठी’ म्हणून आतापर्यंत शिवसेनेलाच मिळत आली. हे नमूद करणे महत्त्वाचे आहे.

ठाण्यात नमो नमो

मुंबईत भाजपने परप्रांतीयांची ताकद वाढवून मराठी माणसाला मागे रेटले. मुंबईनंतर ठाणे हा मराठी माणसाचा गड. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेमुळे हा मराठी गड टिकला. या गडाचा सौदा शिंदे गटाने भाजपशी केला. आज ठाण्यात सर्वत्र ‘नमो भारत, नमो ठाणे’चे फलक भाजपने लावले. ‘नमो मुंबई’चे बोर्ड उद्या महाराष्ट्राची राजधानी मुंबईवर झळकतील. जैन, गुजराती लोक मराठी माणसाला त्यांच्या सोसायटीत घरे घेऊ देत नाहीत. अशा समाजाचे नेतृत्व भाजप करत आहे व याच समाजाच्या बिल्डरांकडून कोटय़वधींची वसुली करून शिंदे गट ‘मराठी एकजुटी’चा पराभव करण्यावर ठाम आहे. अशा लोकांना भाजप-शिंदे सरकारने मरीन ड्राइव्हवर 1,10,000 चौरस फूट म्हणजे तीन एकर जागा देऊन टाकली. तेथे आता जैन जिमखाना उभा राहिला. त्याच रस्त्यावर मराठी भाषा भवन उभे राहणार होते. त्या मराठी भवनाचे काम भाजप-शिंदे गटाने थांबवले. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयापासून गिरगावच्या साहित्य संघापर्यंत मराठी संस्था मोडून काढण्याचे तंत्र भाजपने स्वीकारले व मुंबईचा महापौर ‘मराठी’ होईल काय, असे हरामखोर प्रश्न भाजपवाले ‘ठाकरे’ बंधूंना विचारत आहेत. प्रश्न फक्त मुंबईच्या महापौरांचा नसून संपूर्ण मुंबईतल्या मराठी माणसाच्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा आहे.

ही लढाई मराठी माणसाला जिंकावीच लागेल. भाजप-शिंदे गटाची ‘युती’ अनेक ठिकाणी तुटली आहे. सर्वच पक्षांच्या निष्ठावंतांनी ‘पक्षांतरे’ केली. संभ्रमाचे वातावरण चौफेर असले तरी हे राज्य मुंबईसह मराठी माणसाचे आहे हे देशाला दाखवून द्यावे लागेल!