
मुंबईतील धोकादायक 11 एनटीसी गिरण्यांच्या चाळींचे ताबडतोब पुनर्वसन झाले पाहिजे. नाहीतर एनटीसी चाळीतील कामगार रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील, असा इशारा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी चाळ भाडेकरूंच्या सभेत बोलताना दिला.
मुंबईतील अत्यंत धोकादायक स्थितीत राहणाऱया भाडेकरू कामगारांची सभा नुकतीच परळच्या मजदूर मंझीलमध्ये पार पडली. यावेळी आमदार सचिन अहिर म्हणाले, एनटीसी गिरण्यांच्या चाळींच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव एनटीसी विभागीय कार्यालयाने म्हाडाकडे पाठविला आहे. म्हाडाने हा प्रस्ताव अभियंत्यांशी चर्चा करून राज्य सरकारकडे पाठविला आहे. तरीही हा प्रश्न लवकरच मार्गी लागला नाहीतर कामगारांना रस्त्यावर उतरावे लागेल.
या सभेला सरचिटणीस गोविंदराव मोहिते, माजी नगरसेवक सुनील मोरे, खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, सुनील बोरकर, भाऊसाहेब आंग्रे, किरण गावडे आदी उपस्थित होते. एनटीसी गिरण्यांच्या चाळीतील कामगारांना 405 चौरस फुटांऐवजी आता 500 चौरस फुटांची घरे मिळाली पाहिजेत, असे गोविंदराव मोहिते यांनी सांगितले.































































